कयाधू नदीकाठावर निसर्ग बहरला
हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदीच्या काठावरील तीनशेसतरा हेक्टर जमीन कुरणक्षेत्र म्हणून संरक्षित केली गेली आहे. ते जवळ जवळ बारा गावे व त्यांतील लोक यांच्या प्रयत्नातून साध्य झाले आहे. त्यापाठीमागे आहे ‘उगम’ संस्था आणि तिचे अध्यक्ष जयाजी पाईकराव. ‘उगम ग्रामीण विकास संस्थे’ने कुरणक्षेत्र संवर्धन कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. समगा, दुर्गधामणी, वसई, टाकळी, खेड, हिंगणी, पूर, कंजारा, नांदापूर, हरवाडी, सोडेगाव, सावंगी, टाकळगव्हाण या गावांमधील लोकांनी मोहिमेत सहभाग घेतला. तेथे चराईबंदी व कुऱ्हाडबंदी आहे आणि ती लोकांच्या पाठिंब्यातून यशस्वी झालेली आहे.