साहित्य संमेलन - उस्मानाबादने धडा शिकवला! (Literary Conferance - Osmanabad teaches a lesson)
साहित्य संमेलनाच्या संयोजनाचा सुवर्णमध्य गाठण्याची जरूरी आहे असा निष्कर्ष चर्चेअखेरीस निघाला. चर्चा उस्मानाबादमधील संमेलनानिमित्ताने ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ व ‘ग्रंथाली’ यांनी योजली होती. मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्याध्यक्ष, लेखक उषा तांबे आणि कवी-लेखक-पत्रकार विजय चोरमारे हे चर्चेच्या केंद्रस्थानी होते. चर्चेस किरण येले, संजीवनी खेर, संध्या जोशी अशी साहित्य क्षेत्रातील मातब्बर मंडळी उपस्थित होती. संमेलनाविषयीच्या चर्चेत सहभाग विशेष अहमहमिकेने झाला. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ व ‘ग्रंथाली’ यांच्या वतीने महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एका प्रासंगिक विषयावर असे चर्चामंडळ योजले जाते. तांबे व चोरमारे या दोघांनीही उस्मानाबादचे संमेलन यशस्वी रीत्या पार पडले असाच अभिप्राय दिला. व्यासपीठावर राजकारणी आहेत वा नाहीत हा मुद्दा बिनमहत्त्वाचा आहे असे चोरमारे यांनी सांगितले. ते म्हणाले, “साहित्यबाह्य कोणाही व्यक्तीला मुद्दाम मानपान देणे हे अनुचित होय. पण राजकारणी वा अन्य कोणी व्यावसायिक साहित्यप्रेमी असेल तर त्याला संमेलनात स्थान असलेच पाहिजे. एक पथ्य जरूर पाळले गेले पाहिजे, की स्थानिक संयोजन समितीत राजकीय पुढाऱ्याचा अथवा धनाढ्याचा वरचष्मा असता कामा नये.”