गाजलेले जळगाव अधिवेशन !

प्रतिनिधी 15/04/2010

संयुक्त महाराष्ट्र परिषदेच्या प्रतिनिधी सभेचे अधिवेशन 13 व 14 एप्रिल 1947 रोजी जळगाव इथे भरले. त्या अधिवेशनात व-हाडचा मुद्दा खूप गाजला. अधिवेशन महाराष्ट्रातली तीन संस्थाने गुजरातमधील संस्थानांच्या गटात समाविष्ट करण्याच्या मुंबई सरकारच्या निषेधानेही गाजले.

या अधिवेशनाच्या सुमारास व-हाड प्रांत निजामाला परत देण्याच्या गुप्त वाटाघाटी ब्रिटिश सरकार व हैदराबादचा निजाम यांच्यात सुरू असल्याच्या बातम्या सर्वत्र पसरल्या. त्यामुळे सगळे वातावरण ढवळून निघाले. संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे कार्यकर्ते आणि पुरस्कर्ते अस्वस्थ झाले.

नागपूर उच्च न्यायालयाचे सरन्याधीश (तत्कालीन) फ्रेडरिक गिल यांनी 'व-हाड निजामाच्या ताब्यात दिला जाण्याचा संभव अधिक आहे' असे मत व्यक्त केले, त्यामुळे चर्चेत अजूनच भर पडली. तशात, निजाम पंजाबराव देशमुखांनी अमरावतीत सुरू केलेल्या महाविद्यालयाला दोन लाखांची देणगी देणार असून, त्यांची कोनशिला बसवण्यासाठी दिवाण सर मिर्झा इस्माईल येणार असल्याच्या बातम्या वृत्तपत्रांत प्रसिध्द झाल्या.

या घटनाक्रमामुळे जळगाव अधिवेशनात व-हाडचा प्रश्न महत्त्वाचा ठरणे हे क्रमप्राप्त होते.

व-हाडच्या मुद्यावर बोलताना स्वागताध्यक्ष ह.वि.पाटसकर यांनी 'व-हाड परत मिळवण्याचे निजामाचे सारे प्रयत्न हाणून पाडले जातील' असे स्वच्छ व स्पष्ट शब्दांत सुनावले.

शंकरराव देव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात, सर मिर्झा इस्माईलच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला. 'व-हाडात आमचे निशाण, आमचा कायदा आणि आमचं राज्य सुरू झाले पाहिजे' ही मिर्झांची मागणी फेटाळून लावली. आणि व-हाड किंवा विदर्भ हा महाराष्ट्राचा अवयव असल्याचे जाहीर केले.

महाविदर्भ सभेची स्थापना !

प्रतिनिधी 08/04/2010

महाविदर्भाची स्थापना ही संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेचे पहिले पाऊल ठरेल हा विचार त्या वेळच्या नेत्यांना तत्त्वत: मान्य होता. तरी पण संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला तर त्यात पश्चिम महाराष्ट्राचे वर्चस्व असेल अशी भीती विदर्भातल्या नेत्यांना त्या वेळेपासून वाटली असावी. त्याकाळी तीन तुकड्यांत विभागलेल्या महाराष्ट्रातल्या प्रांतांवर भिन्न भिन्न शक्तींचे वर्चस्व होते. मराठवाडयावर निजामाचे वर्चस्व होते, त्यामुळे मराठवाड्याचा किंवा मध्यप्रांतात असलेल्या विदर्भावर हिंदी भाषिक नेत्यांचा वरचष्मा होता. म्हणून मराठवाड्याचा व विदर्भाचा विकास पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत तोकडा होता. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्रात विदर्भाची गळचेपी होईल असे वैदर्भियांना वाटणे स्वाभाविक होते.

अशा स्थितीत, महाविदर्भाच्या हितसंबंधांच्या रक्षणासाठी व संवर्धनासाठी 1940 च्या ऑगस्टमध्ये, वर्धा येथे बॅ. रामराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली महाविदर्भ सभेची स्थापना करण्यात आली. तिचे सूत्रधार बापुजी अणे हेच होते. महाविदर्भ सभेच्या चिटणीसपदाची जबाबदारी ग.त्र्यं. माडखोलकर यांनी स्वीकारावी अशी अणे यांची इच्छा होती, पण माडखोलकरांनी त्यास नकार दिला. मात्र महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर महाविदर्भ सभेचे विसर्जन होईपर्यंत, म्हणजे जवळ जवळ वीस वर्षे माडखोलकर महाविदर्भ सभेचे काम करत होते.

महाराष्ट्रातील जैवविविधता


 

सह्याद्रीतील जैववैविध्य

राज्य समितीच्या प्रतीक्षेत!

 

महाराष्ट्रातील जैवविविधता

जैवविविधतेच्या दृष्टीने अतिमहत्त्वाच्या अशा जगभरातील चौतीस प्रदेशांमध्ये महाराष्ट्राचा, विशेषत: सह्याद्री घाटभागाचा समावेश केला जातो. राज्यातील गोदावरी, तापी, कृष्णा, नर्मदेसारख्या नद्यांची खोरी, समुद्रकिनारे, सातपुडा-अजिंठा-सह्याद्री अशा पर्वतरांगा, पाणथळ व गवताळ प्रदेशांचे विस्तृत भाग ह्यांचा ह्या संदर्भात विशेष उल्लेख केला जातो.

जैवविविधता संवर्धन करण्यासाठी केंद्रीय पातळीवर 2002मध्ये जैवविविधता कायदा पास झाला. त्यानंतर राज्याराज्यात तदर्थ मंडऴे स्थापण्यात आली, मात्र महाराष्ट्रात तशी हालचाल नाही! मंत्रिमंडळाने मंडळ स्थापण्याचा निर्णय गेल्या वर्षी घेतला, परंतु त्याचा पाठपुरावा झालेला नाही. जैविक विविधतेचे संरक्षण करणे, जैवविविधता साधनसंपत्तीबाबत राज्य सरकारला सल्ला देण्याचे काम मंडळाकडून अपेक्षित आहे. तशा आशयाचे अधिसूचनेचे प्रारूप 2008 साली प्रसृत करण्यात आले आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने जैवविविधतेचा विचार व कृती करण्यासाठी माधव गाडगीळ ह्यांच्या अध्यक्षतेखाली समिती निर्माण केली असून, तीबाबबची घोषणा गेल्या आठवड्यात झाली.

सह्याद्री घाटातील जैववैविध्य टिपण्याचा एक प्रयत्न गेली काही वर्षे बाँबे नॅचरल हिस्टरी सोसायटीतर्फे चालू आहे. त्यांनी कोल्हापूर-सातारा परिसरात सरड्याच्या एक प्रजातीचा शोध लावल्याची बातमी वर्तमानपत्रांत आली. ‘ थिंक महाराष्ट्र’ने या प्रकल्पाचे प्रमुख वरद गिरी ह्यांना लेख लिहिण्याची विनंती केली. त्यांनी सादर केलेल्या मूळ इंग्रजी लेखाचे ज्योती शेट्ये ह्यांनी केलेलं हे संक्षिप्त मराठी रूप....

 

सातारा कोल्हापूर घाटभागात सरड्याच्या नव्या प्रजाती...

- वरद गिरी

 

 
“वरद, ही सरड्याची नवीन जात बघ !” माझा एक जाणकार, जिज्ञासू आणि निसर्गप्रेमी मित्र, हरिष कुलकर्णी मला म्हणाला. मी त्याला म्हटलं,हा “Cnemaspis” आहे आणि मला त्याबद्दल फारशी माहिती नाही ; माझं हे उत्तर ऎकून तो निराश झाला, कारण आम्ही ज्या “Caecilians” वर लक्ष केंद्रित केलं होतं ते “Caecilians” आम्हाला छोट्यामोठ्या दगडाखाली, पाळापाचोळ्यात, दोन दिवस खूप शोधाशोध करुनही सापडत नव्हते. आमची ही मोहीम प्रामुख्यानं पश्चिम घाटातल्या “Cnemaspis” च्या अभ्यासासाठीच्या प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग होती. ह्या प्रकल्पाला 'सफोर्ड स्माँल ग्रॅट' चे आर्थिक पाठबळ लाभलं आहे. ह्या प्रकल्पाच्या उद्दिष्टांपैकी एक महत्त्वाचं उद्दिष्ट होतं की स्थानिकांना,  स्वयंसेवी संस्थान. Caeeilian, Reptiles आणि Anphian ह्या प्राण्यांच्या अभ्यासासाठी जरूरीचं प्रशिक्षण देणं.

प्रत्यक्ष, जंगलात कसं काम करायचं ह्याचं शिक्षण आम्ही ‘ ग्रीन गार्ड , कोल्हापूर’ ह्या संस्थेच्या कार्यकर्त्यांना देत होतो.

सुमारे पंधरा मिनिटांनी मी आणि हरिषने एक मोठा दगड हलवला आणि अजून एक “Cnemaspis” दिसला.  हा प्राणी अगोदर मिळालेल्या प्रकारापेक्षा वेगळा होता. हा चपळ होता आणि झटक्यात पालापाचोळ्यांमध्ये दिसेनासा झाला. त्याचं जवळून निरीक्षण करण्यासाठी महत्प्रयासानं आम्ही त्याला पकडला आणि असं आढळून आलं, की तो “Cnemaspis” ची पोटजात असलेला गावठी प्रकार आहे.

Cnemaspis” जातीचे सरडे लांबीला लहानमोठे असतात. ते बुटके सरडे म्हणून ओळखले जातात. विशेष म्हणजे हे सरडे भारताच्या ग्रामीण भागात, खेड्यापाड्यात आढळणा-या इतर सरड्यांपेक्षा डोळ्यांच्या बाबतीत  वेगळे असतात. ह्यांच्या डोळ्यांच्या बाहुल्या ‘गोल’ असतात आणि ह्यांच्या ह्या वैशिष्ट्यामुळे काहीजण ह्यांना ‘दिवसा वावरणारे’ (Diwrnal) म्हणतात. पण मला हे मान्य नाही, कारण मी ह्यांना दिवसा आराम करुन रात्री वावरताना पाहिलं आहे. ह्याशिवाय ह्यांचे पंजे निमुळते असून पंज्यांवर थोडे उंचवटे असतात. जेव्हा मी ह्यांच्या वैज्ञानिक वर्गीकरणाचा विचार केला तेव्हा मला अमेरिकेतील व्हिलोनोवा विद्यापीठाचे विख्यात डाँ. अँरान बाऊर ह्यांची आठवण आली. ते ह्या विषयातले तज्ञ आहेत. त्यांनी मला एकदा म्हटलं होतं, की “ कोणत्याही गोष्टीची सुरुवात अगदी सूक्ष्म निरीक्षणानं करावी !” तसा माझा “Caecilians” चा अभ्यास करण्याचा उत्साह मावळला.

हरिषने तो सरडा हातात धरून ठॆवला आणि मी त्याचं अधिक तपशिलवार निरीक्षण करू लागलो. माझं कुतूहल वाढत चाललं, कारण त्या भागात आढळणा-या इतर सरड्यांपेक्षा तो खूप वेगळा होता. त्या जातीच्या सरड्यांच्या वर्गीकरणाचा मी थोडाफार, प्राथमिक म्हणता येईल असा अभ्यास केलाच होता आणि म्हणून मग जास्त खोलात जाऊन मला त्याचं निरीक्षण करणं भाग पडलं. ह्या सरड्याचं वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून निरीक्षण करताना मला अजून एक अपरिचित असं लक्षण आढळलं.त्याच्यावरचे खवल्याप्रमाणे असणारे उंचवटे इंद्रधनुष्यासारखे रंगीत दिसत होते! एका ठरावीक कोनातून हे वैशिष्ट्य जास्त ठळकपणे जाणवत होतं.

दरम्यान, आमच्याबरोबरचे आमचे इतर सहकारी म्हणजे रवींद्र आंधुरे, धनंजय जाधव व स्वप्नील पवार ह्यांना आणखी एक नमुना सापडला. मग आणखी निरीक्षणात अजून काही अशी लक्षणं आढळली, की ती नेहमी आढळणा-या “Caecilians” मध्ये सहसा दिसत नाहीत. ह्या सरड्यांमध्ये वर-वर चढण्याची क्षमता नव्हती आणि आमच्यापासून सुटका करून घेण्यासाठी तो पालापाचोळ्यात किंवा दगडाखाली जाऊ पाहात होता. ह्या सरड्याची मान इतरांच्या मानेपेक्षा जरा लांबट होती आणि लांबट व लवचीक मानेमुळे हा डोकं वळवत असताना छान कमान करत होता.

सर्व सहका-यांमध्ये  उत्साह संचारला.  तेवढ्यात फरुक मेहता व  रमण कुलकर्णी यांनी अजून दोन नमुने आणले. फरुक कोल्हापूर जिल्ह्यातल्या वनांचा प्रचंड अभ्यास असलेला निस्रर्गज्ञानी आहे. ह्यांच्यापैकी कोणताही सरडा झाडावर किंवा मोठ्या दगडावर चढून जाताना आढळला नाही. प्रत्येक सरड्यावर रंगांच चमकणं चालू होतं आणि प्रत्येकजण जमिनीवर सरकत जाताना जमिनीच्या दिशेनं खालीवर जिभेनं फलकारत होता. ह्याची प्रत्येक गोष्ट अगदी खास होती, ‘वेगळी’ही होती.

एक प्रश्न राहिलाच होता की ह्यांची जात कोणती आहे? जरी मी “Caecilians” च्या कामात खूप गुंतलो होतो, तरी हा सरडा मनातून जात नव्हता. मी बाँबे नॅचरल हिस्ट्री सोसायटीमध्ये जमवलेल्या सर्व नमुन्यांबरोबर त्याची तुलना करून बघितली, पण कुठेही साम्य आढळलं नाही. नेहमीप्रमाणे, मी वैज्ञानिक वर्गीकरणाची विस्तृत माहिती आणि सर्व छायाचित्रं डॉ. अँरान बाऊर ह्यांना ईमेल केली डॉ. अँरान म्हणजे सरड्यांच्या अभ्यासातले तज्ञ आणि माझ्या संशोधनात मदत करणारे अनुभवी सल्लागार व मार्गदर्शक.  डॉ. अँराऩ ह्यांचं मला आलेलं उत्तर माझा उत्साह द्विगुणित करणारं होतं. त्यानी कळवलं होतं, की हा सरडा विशेषच वाटतो !

क्षमता गायकवाड ही आमच्या ग्रूपमध्ये 2007 साली सामील झाली. क्षमता बॉंबे नॅचरल हिस्टरी सोसायटीमध्ये संशोधन सहाय्यक आहे. क्षमता मला निरीक्षण वगैरे करण्यास मदत करत होती आणि मदत करताना, ती मला सतत प्रश्न विचारत असे. ह्या सर्व कामाची परिणती अजून चांगली निरीक्षणं आणि परीक्षणं करण्यात झाली. ह्या सरड्यांवर खवल्यांसारखे उंचवटे सर्वांना सारखे होते, पण फुगवटे गाठीसारखे नव्हते आणि सर्वात जास्त लक्षवेधक गोष्ट होती, ती series of precloacal femoral pores. ह्या सर्व गोष्टींवर आणि निरीक्षणांवर आधारित, आम्ही एक नवीन संशोधनपर निबंध लिहायला सुरुवात केली. मी त्याच भागाला  एका पाठोपाठ एक अशा अनेक भेटी दिल्या, पण कधीही ते सरडे मला परत सापडले नाहीत. मात्र पुढच्याच पावसाळ्यात गेलेल्या रवींद्र आणि हरिष ह्यांना त्या भागात परत एकदा हेच सरडे दिसले आणि म्हणून आम्ही ह्या निष्कर्षाप्रत आलो, की हे सरडे बहुधा पावसाळ्यात दिसत असावेत.

आमच्या पुढच्या भेटीत स्वप्निलला अजून एक विशेष गोष्ट आढळून आली. ती ही की ह्या सरड्यांची पिल्ले ही मोठ्या सरड्यांपेक्षा वेगळ्या रंगाची असतात. त्यानं काही चांगली छायाचित्रं काढली. आम्ही सर्व माहितीचं संकलन करून, त्या हस्तलिखिताची एक प्रत डॉ. अँरान ह्यांना त्यांच्या टिका /टिप्पणीसाठी पाठवली. एक प्रत Journal Zootaxa साठी सादर केली. अलिकडेच तत्संबंधी एक पेपर प्रसिद्ध झाला आणि एक नवीन जात, “Cnemspis kolhapurensis” ह्या नावानं भारतीय सरपटणा-या प्राण्यांच्या नावांच्या यादीत प्रविष्ट झाली! ह्या भागातल्या वनांची अद्वितीयता अधोरेखित करण्यासाठी आम्ही त्यास कोल्हापूर जिल्ह्याचं नाव दिलं.

मला पश्चिम घाटाचं पूर्वीपासून खूप आकर्षण आहे. माझं आकर्षण प्रत्येक भेटीबरोबर वाढत गेले आहे. माझ्या विचारांवर पूर्वी ‘सौदर्यदृष्टीचा’ प्रभाव होता. “मला इथलं सौदर्य खूप भावलं होतं”. पण आता दहा वर्षांच्या काळात ह्या भागात केलेल्या कामामुळे इथल्या ‘जैविक मूल्यांचा’ माझ्यावरचा प्रभाव वाढला आहे. हा भाग सरपटणारे प्राणी आणि जलचर ह्यांच्या राहण्यासाठी योग्य आहे. पैकी खूप प्राणी इथे आढळतात आणि बरेच काही अजून शोधले गेले नाहीत. मागच्या दशकात पश्चिम घाटातल्या Reptiles आणि Amphibians च्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. इथं अभ्यास आणि संशोधन खूप व्हायला हवं. अशा प्रकारे आम्ही महाराष्ट्रातल्या पश्चिम घाटातल्या प्राणिजीवनाच्या अभ्यासाचं दस्ताऐवजीकरण सुरू केलं.सात वर्षांच्या ह्या भागातल्या वनांच्या प्राणिजीवनाच्या अभ्यासानंतर आम्ही Caecilians च्या दोन नवीन जातींचा शोध लावला. त्यांची नावं Gegeneophis daniei आणि Indotyphlus maharashrasensis . ह्या बरोबरच ह्या भागात आम्ही दोन नवीन प्रजाती शोधून काढल्या. त्या म्हणजे 1. Hemidactylus aarobauer आणि Hemidaetylus satapraensis.

नवीन जातीचा शोध हा माणसांच्या वस्तीपासून जवळ आणि सहज जाऊ शकू अशा भागात लागला आहे. अजून खूप प्राणिजीवन दूरवर व खोलवर असणार. danieli ही प्रजात सिधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या जंगलात आढळणारी म्हणून ओळखली जाते. दुसरी Cacilian Indotyphlus Maharashtraensis ही प्रजात प्रामुख्याने सातारा जिल्ह्याच्या काही पठारी भागात आढळते. Hemidactylus Sataraensis ही जात मात्र फक्त सातारा जिल्ह्यात पठारी भागात आढळते आणि ते प्राणी जमिनीवर वस्ती करणारे असतात.

 

जेजुरी


पुण्याजवळचं जेजुरी हे महाराष्ट्रातलं महत्त्वाचं दैवत आहे. जेजुरीच्या खंडोबाला मनोकामना पूर्ण होण्यासाठी, विशेषतः पुत्रप्राप्तीसाठी नवस करतात. तो नवसाला पावतो अशी अनेकांची मान्यता आहे. दैत्यांचा पराभव करण्यासाठी शंकराने मल्हारी मार्तंड हा अवतार घेतला.

या पाय-यांवर वाद्य वाजवून देवाची आळवणीही केली जाते.चित्रात लहान मुलगी तुणतुणं वाजवते आहे.आणि टोपी घातलेला माणूस संबळ वाजवत आहे. मी लहान असताना माझ्या आतेभावाच्या लग्नानिमित्त्य घातलेल्या गोंधळात तुणतुणे आणि संबळ ऐकली होती. तेव्हा या वाद्यानं वेड लावलं होतं.आजही ती कोणी

वाजवत असलं तर तिथ थांबल्याशिवाय चैन पडत नाही. मी नंतर तबला वाजवायला शिकलो. तबला ऎकतोही खूप! संबळ वाजवायला शिकायची इच्छा आहे पण तिचे क्लास नसतात. सनईबरोबर वाजवला जाणारा चौघडा तिच्यापेक्षा मोठा असतो.तो बसून वाजवावा लागतो. संबळ गळयात अडकवून वाजवता येते.

गळयात घालून वाजवण्याची वाद्ये अनेक राज्यांत आढळतात. केरळातील कालीकतला पाहिलेले हे 'चेंडा' नावाचे वाद्य वाजवणारे वादक. वाद्य खोल आणि मोठे असल्याने ताशापेक्षा गंभीर वाजते.

कोणी तीच ती गोष्ट सांगत असला तर 'काय तुणतुणं लावलंयस' म्हणून हेटाळणी केली जाते. पण तुणतुण्याची तार खुंटीनं पिळून एका बोटाने गाणा-याच्या सुरात वाजवायला लागलं की याचा अवर्णनीय संतत नाद ऐकत राहावासा वाटतो. अवर्णनीय! प्रकृतीनं लहान वाटणारं हे गुणी वाद्य आहे.एकच तार असल्यानं इतर तंतुवाद्यांप्रमाणे यातून वेगवेगळे आवाज काढता येत नाहीत. ती त्याची मर्यादा आहे.

दीपमाळ आणि हळद म्हणजे भंडारा. त्याची उधळण हे जेजुरीचे  वैशिष्टय. तसं दुसरीकडे पाहायला मिळत नाही. काळा दगड आणि हळद यांच्या संगतीत झेंडूची फुले आणि दैत्याची लाल मूर्ती डोळयांत भरतात. चिरेबंदी कमानीतून दिसणारे मंदिराचे रूप.

जेजुरीचे दुसरे महत्त्व असे, की तेथे शिवाजी व शहाजी यांची भेट झाली होती. तेव्हा त्यांनी मोगलांच पारिपत्य कस करावे याबाबत खल केला होता. मुसलमानही या दैवताला मानतात. मंदिराच्या मुख्य घुमटाच्या चार बाजूंना असलेल्या लहान घुमटींमध्ये विजापूर शैलीची छाप दिसते.खंडोबा हा देव, विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रप्रदेशातील लोकांना जवळचा वाटतो. दर्शनासाठी जाऊ पाहाणा-या भक्तांच्या लांबलचक रांगेची झलक.

जेजुरीला जाऊन आल्यावर .फक्त हळद .भव्य दगडी दीपमाळा. वाटेवर बसलेले लोक आणि डोंगरावरून दिसणारा परिसर इतक्याच गोष्टी लक्षात राहातात. खंडोबा आठवत नाही. याचं कारण त्याच्या दर्शनासाठी लावलेली लांबलचक रांग. त्यानंतर झालेलं ओझरतं दर्शन. ते झाले, की जो तो पायऱ्या उतरून परततो. देवाचं तसंच असतं .गर्दीत देव नसतो.मग तुम्ही तिरूपतीला जा नाहीतर पंढरपूरला जा.

'सुंदर ते ध्यान उभे विटेवरी' आपल्यासाठी नसतं.ते सुंदर ध्यान पाहायला सवड मिळत नाही. देव म्हणजे गौडबंगाल आहे देव आहे हे सांगणारे त्याला दाखवू शकत नाहीत. नाही म्हणणारे पटवून देऊ शकत नाहीत. त्यामुळे तुम्ही आम्ही देव आहे की नाही या फंदात न पडलेलं बरं. मग आपल्या हाती काय उरतं? तो आहे असं मानणारे त्याला अशा स्वरूपात उभा करतात की वाटतं कल्पनांमधे का होईना देव आहे. रम्य आविष्कारात तो इथे तिथे भेटतो.मग तो खंडोबा असो की वेरूळचा कैलास.

- प्रकाश पेठे  pprakashpethe@gmail.com

 

Last Updated On 04 April 2019

पाटसकरांचा बारगळलेला ठराव!

प्रतिनिधी 04/03/2010

स्वातंत्र्योत्तर दंगली, काश्मीर प्रश्न युनोमध्ये अशा सगळ्या घडामोडी घडत असताना, भाषावार प्रांतरचनेचा प्रश्न सोडवण्यापेक्षा लांबणीवर टाकण्याचा काँग्रेस नेत्यांचा विचार अधिक बळकट झाला. त्याला अनुसरुन, संघराज्याच्या जडणघडणीविषयीच्या समितीची आणि प्रांताच्या घटनेबद्दलच्या समितीची संयुक्त बैठक होऊन, त्या बैठकीत भाषिक आणि सांस्कृतिक आधारावर नवे प्रांत निर्माण करण्याच्या प्रश्नाचा विचार करण्यासाठी भारत सरकारने आयोग नेमावा अशी शिफारस करण्यात आली. त्याच सुमारास, हरिभाऊ पाटसकरांनी 'आपण पाच नवे भाषावांर प्रांत निर्माण करण्याबाबतचा ठराव घटना परिषदेत मांडणार असल्याचे' जाहीर केले, आणि ठरावाच्या मसुद्याला पूर्व प्रसिध्दी दिली. पाटसकरांच्या ठरावावर 27 नोव्हेंबर 1947 रोजी चर्चा होईल असे सर्वांना वाटत होते.

''आज मुंबई प्रांतात गुजरातचा जो भाग आहे त्याच्या प्रांतिक असेंब्लीतील प्रतिनिधींनी तो भाग नव्या संयुक्त महाराष्ट्र प्रांतात सामील करुन घ्यावा अशी इच्छा जर व्यक्त केली तरच त्यांचा अंर्तभाव महाराष्ट्रात करुन घ्यावा ही पाटसकरांच्या ठरावातली तरतूद मंजूर होणे म्हणजे द्विभाषिक मुंबई राज्याच्या निर्मितीला पाठिंबा देण्यासारखे होते. पाटसकरांच्या ठरावातला हा मुद्दा भाषावार प्रांतरचनेच्या तत्त्वाशी मूलत: विसंगत होता व व्यावहारिक दृष्टीने महागुजरातची मागणी करणा-या गुजराती भाषिकांनाही पटण्यासारखा नव्हता.

मोरारजींचा वाढदिवस…

प्रतिनिधी 04/03/2010

अत्रे टीका करताना विरोधकांची सालडी सोलत असले तरी त्यांच्या स्वभावात दीर्घ द्वेष नव्हता. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात पंडित नेहरूंची रेवडी उडवणारे अत्रे, नेहरूंच्या निधनानंतर अग्रलेखांची मालिका लिहितात, ज्यातून 'सूर्यास्त' सारखे ह्रदयस्पर्शी पुस्तक तयार झाले, पण अत्र्यांचा शेवटपर्यंत राग राहिला तो मोरारजी देसाईंवर.

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात आचार्य अत्रे यांना तुरुंगवास घडला. ते अडीच महिने तुरूंगात होते. 29 फेब्रुवारी हा मोरारजींचा वाढदिवस. मोरारजींचा साठावा वाढदिवस 1956 साली होता. 29 फेब्रुवारी ही तारीख दर चार वर्षांनी येते. त्यामुळे साठ वर्षांच्या आयुष्यात मोरारजींचे पंधरा वेळा वाढदिवस झाले. त्याचा अर्थ अत्र्यांनी काढला तो अफलातून. मोरारजींचे शरीर जरी साठ वर्षांचे असले, तरी बौध्दिक वय पंधरा वर्षोंचे आहे! तेंव्हा त्यांचा वाढदिवस साजरा केलाच पाहिजे' असे अत्र्यांनी ठरवले. पण त्या वेळी ते ठाण्याच्या तुरुंगात होते. म्हणून अत्र्यांनी आणि त्यांच्या सहका-यांनी कावळ्यांना जिलबी खायला घालून वाढदिवस साजरा करायचे ठरवले!

त्याप्रमाणे तुरुंगाच्या कँटिनमधून ताटभर जिलेबी विकत आणली, त्यानंतर अत्र्यांनी त्या कावळयांसमोर जे भाषण केले ते वाचण्यासारखे आहे. (काव!काव!!, किलकिलटासह) त्या नंतर कावळ्यांच्या दिशेने जिलेब्या फेकल्या गेल्या. ताटभर जिलेबी त्या काक मंडळींनी फस्त करून टाकली.

Last Updated On - 1 May 2016

दिनेश वैद्य - जुन्‍या पोथ्‍यांच्‍या जतनासाठी कार्यरत


दिनेश वैद्य धर्मक्षेत्र असणा-या नाशिक शहरात याज्ञिकी करणारा दिनेश वैद्य पोथ्यांच्या डिजिटायझेशनचे काम झपाटल्यासारखा करत असून, त्याने आठ हजार तीनशे पोथ्यांमधील सात लाख अठ्ठावन्‍न हजार फोलिओंचे (दोन पाने मिळून एक फोलिओ) डिजिटायझेशन केले आहे. तेही सर्व साधनसामग्री स्वखर्चाने खरेदी करून! दिनेश वैद्य याचे नाव DIGITIZATION OF MANUSCREEPTS अर्थात जुन्‍या पोथ्‍यांच्‍या छायांकनासाठी ‘लिम्‍का बुक ऑफ वर्ल्‍ड रेकॉर्ड’मध्‍ये सलग नऊ वर्षे नोंदवले गेले आहे.

अकोला करार - 1 प्रगट, 2 गुप्त !

प्रतिनिधी 19/02/2010

पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातल्या सोळा नेत्यांनी 8 ऑगस्ट 1947 रोजी अकोल्यात वाटाघाटी करुन एका करारावर सह्या केल्या. तोच हा अकोला करार. शंकरराव देव, शेषराव वानखेडे, मा.श्री.तथा बापुजी अणे, पंढरीनाथ पाटील, पंजाबराव देशमुख, पुनमचंद रांका, श्रीमन्नारायण अग्रवाल, रामराव देशमुख, दा.वि. गोखले, ध.रा.गाडगीळ, ब्रिजलाल बियाणी, गोपाळराव खेडकर, द.वा.पोतदार, प्रमिला ओक, ग.त्र्यं.माडखोलकर, आणि जी.आर. कुलकर्णी हे ते सोळा नेते.तो करार धनंजयराव गाडगीळांनी सुचवलेल्या उपप्रांताबाबत आणि त्यांच्या अधिकारांबाबतच्या योजनेवर आधारित आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या एका प्रांतात पश्चिम महाराष्ट्र आणि महाविदर्भ असे दोन प्रांत असावेत, त्यांना स्वतंत्र कायदेमंडळे आणि मंत्रिमंडळे द्यावीत, उपप्रांतांसाठी दोन वरिष्ठ न्यायालये स्थापन करावीत, उपप्रांतांच्या कायदे मंडळांच्या निवडणुका स्वतंत्रपणे घ्याव्यात, त्याच बरोबर सबंध प्रांतासाठी एक गव्हर्नर असावा; तसेच, एक लोकसेवा आयोग असावा आणि विशिष्ट बाबींपुरते एक सामाजिक न्यायमंडळ स्थापन करावे, अशी तरतूद 'अकोला करारा'त करण्यात आली होती.

मुक्ताई: मेहूण येथील समाधी

प्रतिनिधी 19/02/2010

हातून सारखं पाप घडतच असतं.ते नाहीसं करायला हरिद्वारला 'महाकुंभ' चालू आहे.पण पाप घालवायला तापीचं स्मरण सोपं. असं मानलं जातं की गंगेत स्नान करावं लागतं. नर्मदेचं दर्शन केलं तरी पुरेसं असतं आणि तापीनदीची आठवण काढली की पाप साफ होतं.

हे सगळं ठीक आहे.पण भुसावळपासून जवळ जवळ चाळीस किलोमीटर अंतरावर मुक्ताईनगर आहे.तिथं तापी नदीच्या किना-यावर निवृत्ती, ज्ञानेश्वर आणि सोपानाची धाकटी बहीण मुक्ताबाईचं मंदिर आहे. वरच्या अंगाला तापी आणि पूर्णा नदीचा देखणा संगम आहे.

मुक्ताबाई निवृत्त्विनाथाची शिष्य तिचे व्यक्तिमत्व स्वतंत्र किंवा जणू स्वयंभू होते.एका कवितेत ती म्हणते

तापी आणि पूर्णा नदीचा संगम''सर्वरूपी निर्गुण संपले पै सर्वदा. आकार संपदा नाही तया.

आकारिती भक्त मायामय काम.सर्वत्र निःसीम अंतरी आहे''.

''नाही सुखदुःख. पापपुण्य नाही.

नाही कर्मधर्म. कल्पना नाही.

नाही मोक्ष ना भावबंधन नाही.

म्हणे वटेश्वरा ब्रह्म नाही. सहजसिध्द बोले मुक्ताई ''

तापीच्या शुभ्र वाळूच्या पटात वैशाख वद्य द्वादशीच्या दिवशी मध्यान्ही एकाएकी वीज कडाडली आणि त्या झगमगाटात मुक्ताबाई एकाएकी अद्दश्य झाली.''

तापी नदीकाठचे मुक्ताबाईचे मंदिरसंदर्भ : भारतीय संस्कृतिकोश, सातवा खंड.पं.महादेवशास्त्री जोशी.

नदीकाठी उभं राहिलं आणि मुक्ताईच्या अदृश्य होण्याचा प्रसंग डोळयासमोर प्रसंग आणला की पोटात गोळा येतो. त्यावेळी मुक्ताईचं वय जेमतेम अठरा-वीस वर्षां होतं आणि ज्ञान इतकं होतं की चांगदेवासारख्या विद्वानानं तिचं शिष्यत्व पत्करलं! थोडं दूर चांगदेवाचं भग्न देऊळ आहे.

मुक्ताबाई ही निवृत्ती-ज्ञानदेवाही भावंडांची धाकटी बहीण असून, तिच्याबाबत त्यांच्या रचनांमध्ये उल्लेख आढळत नाहीत. संशोधक ते शोधून काढतात चांगदेव-नामदेव ह्यांच्या अभंगांतून. मुक्ताबाईने त्या दोघांचा मानीपणाचा नकशा उतरवला होता. मुक्ताबाईंचे तापी नदीकाठी मेहुणला समाधी घेतली. त्याबाबतचा उल्लेख नामदेवांच्या आत्मचरित्रपर अभंगांत आढळतो. तापीकाठचे चांगदेवाचे मंदिरमुक्ताबाई देखील अठरा-वीस वर्षेच जगली व तिचे ज्येष्ठ बंधू, निवृत्तीनाथांच्या आधी समाधी घेतली असे म्हणतात. मुक्ताबाई एक की दोन होत्या ह्याबद्दलही संशोधकांत वेगवेगळी मते आहेत.

मुक्ताबाईची समाधी कल्पना देखील वैशिष्ट्यपूर्ण आहे. तापी-नदीच्या काठी ती विजेच्या लोळात नाहीशी झाली अशी दंतकथा आहे. 

अकोला करार कशासाठी?

प्रतिनिधी 11/02/2010

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात अकोला कराराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत विदर्भातले नेते सहभागी झाले असले तरी त्यांना महाविदर्भाच्या मागणीबाबत विशेष प्रेम वाटत होते. ते स्वाभाविकही होते. त्यामुळेच त्यांची संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीला नि:संदिग्ध शब्दांत नि:संकोच पाठिंबा द्यायची तयारी नव्हती.

शंकरराव देवांच्या दिल्लीतील निवासस्थानी देव, न.वि.तथा काकासाहेब गाडगीळ, दा.वि.गोखले या पुण्यातल्या मंडळींची आणि रामराव देशमुख, दादा धर्माधिकारी, गोपाळराव काळे, ह.वि.कामथ आणि ग.त्र्यं.माडखोलकर या महाविदर्भातल्या नेत्यांची खाजगी बैठक 11 जुलै 1947 रोजी झाली. त्यात उभय पक्षांमध्ये काही वाटाघाटी झाल्या.

‘व-हाड’वर निजामाची स्वारी होत नाही आणि व-हाड निजामाच्या हातात दिला जात नाही अशी खात्रीलायक बातमी शंकरराव देवांनी या बैठकीत दिली.

संयुक्त महाराष्ट्र निश्चित होणार असे वाटल्यामुळे महाविदर्भाचा उठाव इतक्या जोराने व एकाएकी घडून आला आणि नागपूर प्रांतातील आपल्यासारखे शेकडा पाच कार्यकर्ते सोडल्यास लोकमत संयुक्त महाराष्ट्राला अनुकूल दिसत नाही असे दादा धर्माधिकारीनी सांगितले. त्याचा खुलासा करताना ते म्हणाले,'' मी स्वत: महाविदर्भाच्या विरूध्द आहे. झाला तर संयुक्त महाराष्ट्र नाही तर आज आहे तोच मध्यप्रांत - व-हाड अशी माझी भूमिका आहे.'' दादांच्या या मुद्यावर गोपाळराव काळे आणि ह.वि. कामथ सहमत झाले.

महाराष्ट्रात ज्या प्रमाणे ब्राह्मणांनी ब्राह्मणेतरांशी समेट करून परप्रांतीयांचे वर्चस्व नाहीसे केले त्याप्रमाणे व-हाडात झाल्याशिवाय महाराष्ट्र एकीकरण होणे शक्य नाही असे आपण बापुजी अण्यांना स्पष्ट सांगितले असल्याचे काकासाहेब गाडगीळांनी नमूद केले.