स्वस्तिक - भारतीय संस्कृतीचे मंगल प्रतीक


स्वस्तिक हा शब्द सु+अस धातूपासून बनला आहे. सु=शुभ, मंगल व कल्याणप्रद आणि अस=सत्ता, अस्तित्व. म्हणून स्वस्ति= कल्याणाची सत्ता. कल्याण असो किंवा आहेच ही भावना. स्वस्तिक हे प्रसन्नतेचेही द्योतक आहे आणि म्हणूनच प्राचीन काळापासून भारतीयांनी सर्वश्रेष्ठ प्रतीक मानून त्याचा जीवनाच्या विविध अंगांत प्रयोग केला आहे.

स्वस्तिक हे भारतीय परंपरेत चतुर्विध पुरुषार्थाचेही सूचक मानले आहे. चारही युगांत स्वस्तिक चिन्ह अक्षुण्ण राहते अशी भारतीयांची श्रद्धा आहे.

स्वस्तिकाचा प्रचार भारतातच नव्हे, तर जगभरच्या बहुतेक देशांत आढळतो. सर्वांत प्राचीन अशा पाषाणयुगापासून स्वस्तिकाचा प्रयोग दृष्टीस पडतो. विदेशांत उत्खननांतून बाहेर काढलेल्या कित्येक वस्तूंवर स्वस्तिक चिन्ह आढळते. मोहेंजोदडोच्या उत्खननातही ते सापडले आहे.

श्यामची आई आणि आजची मुले

प्रतिनिधी 14/12/2011

साने गुरुजीचे ‘श्यामची आई’ हे पुस्तक म्हणजे मातृप्रेमाचे महान्मंगल स्तोत्र आहे असे आचार्य अत्रे यांनी म्हटले आहे. श्याम या शाळकरी मुलाच्या भूमिकेतून छोट्या कथा अन् प्रसंग साने गुरुजींनी लिहिले. एका छोट्या गावात संध्याकाळी श्याम आपल्या मित्रांना आपल्या आईविषयीच्या कथा सांगतो, अशी सर्व प्रसंगाची रचना आहे. कोमल हृदयाचा, भाबडा मुलगा आपल्या आईविषयी सांगतो तेव्हा त्याचा कंठ भरून येतो, डोळ्यांत अश्रू दाटतात व ऐकणार्‍या मुलांचीही तशीच स्थिती होते.
 

आज साठीच्या वयात असलेल्यांनी साने गुरुजींना पाहिले आहे, ऐकले आहे. ना.ग.गोरे, एस. एम.जोशी, प्रकाशभाई मोहाडीकर, वसंत बापट, निळू फुले व सेवादलातील सर्वच जण साने गुरुजींची वेडी मुले होती, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही सारी उदात्त तत्त्वे गुरुजींच्या आचरणातून, कथांतून त्या पिढीत उतरली. ती सर्व मंडळी स्वातंत्र्याच्या चळवळीत तर होतीच; शिवाय शिक्षण, कला, साहित्य, समाजकारणात यशस्वी ठरली. मात्र ती सर्वजण साने गुरुजींची ‘मुले’च होती.
 

आचार्य अत्रे यांनी ‘श्यामची आई’ चित्रपट काढला व त्यास चित्रपटक्षेत्रातील सर्वोच्च बहुमान अर्थात सुवर्ण कमल मिळाले.

‘ग्रंथाली वाचक दिना’निमित्त या वर्षी ‘श्यामची आई’ हेच सूत्र घेतले आहे!

सुश्रुताच्या वारसदारांची आधुनिक ज्ञानगंगा


डॉ. रविन थत्ते     निष्णात सुघटन शल्यचिकित्सक व ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक असे एका वाक्यात डॉ. रविन थत्ते ह्यांच्याबद्दल सांगता येईल. ते म्हणतात, की ज्ञानेश्वरी हे माझे प्रारब्ध आहे! डॉ. थत्ते यांनी ज्ञानेश्वरीवर सहा पुस्तके लिहून, त्या ग्रंथाचे इंग्रजीमध्ये भाषांतर केले आहे. मात्र, ‘ज्ञानेश्वरी’च्या ध्यासाने ते विरागी अथवा अध्यात्ममार्गी झाले व त्यामुळे त्यांची सुघटन शल्यक्रियेशी असलेली नाळ तुटली असे घडले नाही. त्यांची बुद्धी तेथेही अद्यावत व तत्पर आहे. त्यांचे नवे venture आहे Shortnotesinplasticsurgery.wordpress.com हा ब्लॉग!

     गेली चाळीस वर्षे प्लॉस्टिक सर्जरीच्या क्षेत्रात मोलाचे काम करणार्‍या थत्ते ह्यांचा त्‍या क्षेत्रातला अधिकार वादातीत आहे. Association of plastic surgeon of India या संस्थेचे ते मान्‍यवर आहेत. त्यांनी प्लॅपस्, क्लेफ्टस आणि तत्सम इतर अनेक विषयांसाठी, लॅंडमार्क ठरतील असे अनेक संशोधन-पेपर सादर केलेले आहेत.

छदाम

प्रतिनिधी 07/12/2011

1. छोटे नाणे

छदाम म्हणजे एक क्षुद्र किमतीचे नाणे हा अर्थ सर्वश्रुत आहे. ‘मी तुझा एक छदामही देणे लागत नाही’ या वाक्प्रचारात तो येतो. दाते–कर्वे कोश, मराठी व्युत्पत्तिकोश आदी कोशांमधून आणि हिंदी कोशांमधूनही हाच अर्थ सामान्यत: दिलेला असतो. क्‍वचित छदाम म्हणजे दोन दमड्यांचे नाणे, वा पैशाचा पाव भाग असेही अर्थ दिलेले आढळतात; पण ते कशाच्या आधारावर ते कळत नाही.

2. महदाईसांचे वस्त्र श्रीचक्रधरप्रभूंचे वास्तव्य भडेगाव (तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव) येथे असताना त्यांची भक्त महदाइसा हिला स्वामींना एक वस्त्र अर्पण करावे अशी इच्छा झाली.’ तिच्याजवळ सोळा दाम होते. तिने आपले मनोगत आपले पूर्वीचे गुरू रामदेव दादोस यांना सांगितले. रामदेव दादोस याने यात कोलदांडा घातला. (अशा रामदेवाचे मुकुंदराजांचे गुरू रघुनाथ अथवा रामचंद्र – ज्याला मुकुंदराज ‘समदृष्टि महेशानु’, ‘निष्कलंक चंद्र’ असे गौरवतात – याच्याशी ऐक्य कल्पणे हा संशोधनक्षेत्रातील मोठा विनोद होय.) दादोसाने महदाइसेला स्वामींचे ठायी उपहार कर असे उचकावले. शेवटी तिने स्वामींनाच विचारले. त्यांनी ‘वस्त्रच घ्या’ असे सांगितले. स्वामींच्या कृपाप्रसादाने तिला एक आसू किमतीचे वस्त्र सोळा दामांत मिळाले. ते तिने स्वामींना अर्पण केले. स्वामी ते वस्त्र पांघरून बसले होते. तो दादोस आले. स्वामींनी वस्त्राचा पदर त्यांच्याकडे टाकत त्यांना त्या वस्त्राची किंमत विचारली. दादोसांनी चटकन ती सोळा दाम सांगितली; कारण महदाइसांजवळ सोळा दाम होते हे दादोसांना ठाऊक होते. नंतर स्वामी आणि दादोस यांच्यात झालेला संवाद अस    

अजिंठा - एक अनमोल ठेवा


अजिंठा लेणी या अद्भुत लेणींचे महत्‍त्‍व अनन्‍यसाधारण आहे. मात्र या लेणींचे महत्‍त्‍व वेगळ्या प्रकारे नोंदवण्‍यास ‘थिंक महाराष्‍ट्र’ला आनंद होत आहे. अजिंठ्याचे महत्‍त्‍व आणि वैशिष्‍ट्य अधोरेखित करण्‍याच्‍या उद्देशाने सांस्‍कृतिक ठेवा म्‍हणून अत्‍यंत अनमोल असलेल्‍या या लेण्‍यांचेसौंदर्य, त्‍यांची रचना आणि विशेष म्‍हणजे तत्‍कालिन कलाकारांचा वास्‍तुरचनेतील खगोलशास्‍त्रीय दृष्‍टीकोन अशी त्रिवेणी माहिती आज ‘थिंक महाराष्‍ट्र’कडून प्रसिद्ध केली जात आहे.
 

अजिंठा लेणे


मानवी कला आणि सप्तकुंडांचा निसर्गचमत्कार...

अजिंठा लेण्‍याचे दूरून दिसणारे मनोहर रूपमहाराष्ट्रातली लेणी हा दृश्य इतिहासातला चमत्कार आहे! भारतात बाराशे लेणी आहेत. त्यांपैकी आठशे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्राबाहेर नाव घेण्याजोगी फक्त मध्यप्रदेशातली बाघ येथली लेणी. अजिंठ्यातील लेण्यांना तर वैश्विक ठेव्यात स्थान मिळाले आहे. एका व्यक्तीने कलेचा परमोच्च बिंदू गाठला अशी उदाहरणे आहेत. पंडित भीमसेन जोशी मंद्रसप्तकातून तारसप्तकात जाणारी लखलखती दीर्घ तान घेत तेव्हा अंगावर शहारे येत. तसाच अनुभव उस्ताद अलिअकबरखां सरोदचा टणत्कार करत तेव्हा येर्इ. एक व्यक्ती प्रतिभेने आणि परिश्रमाने लोकांना गुंगवून ठेवण्याचा चमत्कार करू शकते, त्याचेही आश्चर्य वाटते. लेखनात, चित्रकलेत आणि अन्य विषयांतही असे चमत्कार आहेत, पण अजिंठ्याची गोष्ट वेगळी आहे. झपाटलेल्या कुशल कलाकारांचा गट अजिंठ्याच्या घळीत डोंगर पोखरून त्यात चित्र-शिल्पकथा रंगवतो व ते काम पिढ्यानुपिढ्या चालू राहते तेव्हा मती गुंग होऊन जाते. त्यामुळे जो कोणी अजिंठ्याला भेट देतो तो चाट पडतो.
 

अजिंठा-वेरूळ - वेध खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून


आजच्या आधुनिक युगात अत्यंत प्रगत अशा उपकरणांचे साह्य घेऊन खगोलशास्त्राच्या अंगाने अजिंठ्यात संशोधन केल्यास काय रत्ने हाती लागतील, याबद्दल पुरातत्त्व शास्त्राचे प्राध्यापक असलेले अरविंद जामखेडकर यांच्या मनात उत्सुकता होती. त्यांचा विद्यार्थी आणि खगोल अभ्यासक म्हणून मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. अजिंठा आणि वेरूळच्या गुंफांची रचना खगोलशास्त्रीय दृष्टीने कशी आहे यावर संशोधन होणार होते. मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट चे प्राध्यापक मयंक वाहिया यांची या कामी साथ होती. मग 21 जूनचा ‘मुहूर्त’ पाहून निघालो. 21 जून म्हणजे विष्टंभ बिंदू. सूर्य त्या दिवशी जास्तीत जास्त उत्तरेकडे सरकलेला असतो. त्यामुळे तो दिवस उत्तर गोलार्धात मोठ्यात मोठा असतो. त्या दिवसाला सर्व प्राचीन वाङ्‌मयातही खूपच महत्त्व आहे. त्या दिवशी उगवत्या सूर्याचा प्रकाश सरळ आत गुंफेत बुद्ध मूर्तीवर पडतो का, याचा शोध घ्यायचे आम्ही ठरवले.

अजिंठ्याचे वैशिष्ट्य - जातककथांचे चित्रांकन


अजिंठा लेणेअजिंठा लेणी औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यात आहेत. भारतीय पुरातत्त्व खात्याने क्रमांक दिलेली एकूण ‘तीस’ लेणी आहेत. ती सर्व बौद्धधर्मीय आहेत. त्यात ‘विहार’ व ‘चैत्यगृह’ या दोन प्रकारच्या लेण्यांचा समावेश आहे. लेणी क्रमांक नऊ, दहा, अकरा, सव्वीस आणि एकोणतीस ही चैत्यगृहे म्हणजे भिक्षूंना उपासनेसाठी कोरलेली लेणी होत. बाकीची सर्व लेणी ‘विहार’ म्हणजे भिक्षूंना पावसाळ्यात राहण्यासाठी (वस्सावास-वर्षावास) कोरलेली निवास्थाने आहेत.

महाकाली


     महाकाली हे आदिशक्‍ती महामायेचे एक रूप असून ती परात्‍पर महाकालीची संहारक शक्‍ती आहे. आदिशक्‍तीच्‍या तमःप्रधान रौद्ररूपाला महाकाली असे म्‍हणतात. ती दुष्‍टांचा संहार करण्‍यासाठी प्रकट होते. मधु-कैटभ या दैत्‍यांचा नाश करण्‍यासाठी ती अवतरली, असा उल्‍लेख देवी भागवतात आढळतो. शाक्‍त संप्रदायात महाकाली या नावाने देवीची उपासना केली जाते.

     महाकालीचे रूप भयानक आहे. तिच्‍या मुखातून रक्‍त गळत असते व तिचे सुळे बाहेर आलेले असतात. तिचे केस ज्‍वालेसारखे दिसतात आणि तिच्‍या गळ्यात नररूंडमाला असते. तिला चार हात असून त्‍यांत संहारक शस्‍त्रे असतात. ‘कृष्‍णवर्ण, दशमुख, त्रिनेत्र, दशभुज, दशपाद आणि खड्ग, शर, त्रिशूळ, गदा, चक्र, पाश इत्‍यादी आयुधे धारण करणारी’ अशाप्रकारे श्रीविद्यार्णवतंत्रात तिच्‍या रूपाचे वर्णन केलेले आहे. महाकालीचे रूप उग्र असले तरी ती आपल्‍या भक्‍तांना वरदायिनी होते आणि त्‍यांचे संरक्षण करते, असे मानले जाते.

महालक्ष्मी


     महालक्ष्मी ही अतिशय जागरूक देवता मानली जाते. महालक्ष्‍मी हे जगदंबेचे एक नामरूप. दुर्गा, महिषासूरमर्दिनी ही तिची अन्‍य नावे आहेत. ही देवी म्‍हणजे विष्‍णूपत्नी नसून शिवपत्‍नी दुर्गाच होय. देवीमहात्‍म्‍य या अवतार ग्रंथात तिची कथा दिली आहे ती अशी –

     देवदानवांमध्‍ये झालेल्‍या घनघोर संग्रामात दानवांचा विजय झाला. दानवांचा मुख्‍य महिषासूर हा जगाचा स्‍वामी झाला. त्‍यास इंद्रपद प्राप्‍त झाले. पराजीत देवांनी ब्रम्‍हदेवासोबत भगवान विष्‍णू व शंकर यांकडे जाऊन त्‍यांस आपली करूण कहाणी कथन केली. हे ऐकून विष्‍णू व शंकर क्रुद्ध झाले. त्‍यांच्‍या मुखातून महान तेज बाहेर पडले. हे तेज ब्रम्‍हदेव व इंद्र या देवांच्‍या शरिरातून बाहेर पडणा-या तेजाशी एकरूप झाले आणि त्‍या दिव्‍य तेजातून एक स्‍त्रीदेवता प्रकट झाली. या देवतेने दानवांशी युद्ध करून महिषासूर व त्‍याच्‍या सैन्‍याचा वध केला. या देवतेला महिषासूरमर्दिनी किंवा महालक्ष्‍मी असे म्‍हटले गेले. महालक्ष्‍मीचे रूपध्‍यान दुर्गासप्‍तशतीत वर्णिले आहे. सप्तशती ग्रंथाचे मूळ नाव "देवी माहात्म्य' आहे. यामधील सातशे मंत्र संख्येवरून याला "सप्तशती' नाव पडले असावे. यात महालक्ष्‍मीचे केलेले वर्णन असे –