मंगल मैत्री : एका आगळ्यावेगळ्या पुस्तकाच्या जन्माची गोष्ट

0
492

विख्यात गणितज्ज्ञ डॉ. मंगल जयंत नारळीकर यांचे 17 जुलै 2023 रोजी निधन झाले. त्यानंतर त्यांच्या आठवणी सांगणारे अनेक इमेल, व्हॉटसअप मेसेजेस, लेख, वर्तमानपत्रे, नियतकालिके आणि समाजमाध्यमातून आले. या लेखांनी, नोंदींनी डॉ मंगला नारळीकर यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक ज्ञात-अज्ञात पैलूंवर प्रकाश टाकला. त्यांच्याविषयीच्या या माहितीची नोंद व्हावी या उद्देशाने डॉ. शुभा थत्ते यांच्यासह डॉ. मंगला नारळीकर यांच्या सहा मैत्रिणींनी त्यांच्या आठवणींचे एक पुस्तक प्रकाशित करायचे ठरवले. ‘मंगलमैत्री’ नावाचे हे पुस्तक डॉ. शुभा थत्ते यांनी संपादित केले आहे. त्या या लेखात पुस्तकाच्या जन्माविषयी सांगत आहेत. रविवार, 24 जुलै 2023 च्या ‘लोकसत्ता’च्या अंकात डॉ. शुभा थत्ते यांनी डॉ. मंगला नारळीकर यांना श्रद्धांजली वाहणारा लेख लिहिला होता. त्या लेखाचा संपादित अंशही सोबत जोडला आहे, जेणेकरून वाचकांना डॉ. मंगला नारळीकर यांचा परिचय होईल आणि पुस्तक वाचावेसे वाटेल.

‘मोगरा फुलला’ या दालनातील इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

-सुनंदा भोसेकर

मंगल मैत्री : एका आगळ्यावेगळ्या पुस्तकाच्या जन्माची गोष्ट

खरे तर मी लेखिका नाही. वर्तमानपत्रात काही लेख, अनुभवकथन, माझ्या व्यवसायात  सामोरे आलेले काही प्रसंग एवढाच माझा लेखन प्रवास ! पण मी गप्पावेडी (गोष्टीवेल्हाळ) असल्यामुळे मला वारंवार पुस्तक लिहिण्याचा आग्रह होतो व मी ‘हो , आता कामातून  सवड  मिळाली तर लिहिणार आहे’, असे म्हणून वेळ मारून नेते. पण मग ‘मंगलमैत्री’ या पुस्तकाचे संपादन मी का व कसे केले ह्याची कथा चोखंदळ वाचकांना मात्र सांगावीशी वाटली.

मंगल (नारळीकर) माझी तब्बल सत्तर वर्षांची मैत्रीण. शाळेतील वर्गमैत्रिणी खूप असतात, अगदी गट्टीच्याही असतात पण पुढे मार्ग वेगवेगळे होतात. मुलींच्या बाबतीत लग्नाच्या निमित्ताने शहर बदलते वा परदेशात वास्तव्य होते. मग कधीतरी पासष्ट-सत्तरीच्या नंतर रियुनियनची टूम निघते, परत गाठीभेटी होतात; मधले अंतर पार पुसले जाते, शाळेतल्या गमती जमती, शिक्षकांच्या आठवणी परत परत आळवल्या जातात. पण मंगल व आमच्या आणखी एकदोन मैत्रिणी यांचे नाते शाळा-कॉलेज सुटल्यावरही अबाधित राहिले, सतत पत्रव्यवहार, जमेल तशा गाठीभेटी होत राहिल्या. आम्ही एकमेकींची मुलेबाळे मोठी होताना पाहिली, सुखदुःख वाटून घेत राहिलो आणि तो धागा वयाबरोबर पक्का, चिवट होत राहिला. मंगलने प्रज्ञावंत असूनही स्वतःला संसारात फारच गाडून घेतले आहे व पंखांत बळ असूनही शिक्षणक्षेत्रात पुढे भरारी मारली नाही असे वाटे. कधी, तिच्याशी त्या विषयावर बोलल्यावर तो तिचा स्वेच्छेने घेतलेला निर्णय होता असे ती म्हणाली व शिक्षणक्षेत्रातील तिची जी वाटचाल चालू होती त्याबद्दल ती अतिशय समाधानी दिसली. आमची दुसरी मैत्रीण, मराठीतली लक्षवेधी कथालेखिका अजिता दिवेकर-काळे हिच्या आयुष्याने वेगळेच वळण घेतले. त्यावर पुढे कधीतरी लिहीन.

आम्ही गेली काही वर्षे वर्षातून तीन-चारदा तरी भेटत असू- कधी तिच्या पुण्याच्या घरी, कधी माझ्या घरी, तर कधी मैत्रिणींच्या घोळक्यात ! मी 2022 च्या मे महिन्यात, तिच्या वाढदिवसाला तिच्या घरी गेले तेव्हा ती मजेत होती, पण जरा थकलेली वाटली. जूनमध्ये तिची मेल आली (ती व्हॉटसअपवर मेसेज पाठवण्यापेक्षा मेल पाठवणेच पसंत करी) की, तिला बारीक ताप येत आहे व तपासण्या चालू आहेत व त्यासाठी हॉस्पिटलच्या वाऱ्या कराव्या लागताहेत. त्यानंतर तिची खबरबात फोन आणि मेलवर मिळत होती. तिची शेवटची मेल फेब्रुवारीअखेरीस आली त्यातही तिचा उत्साह तेवढाच होता, पण आता उपचार नको असाच सूर होता. मे 23 च्या अखेरीस मी मंगेशकर हॉस्पिटलमध्ये तिला भेटायला गेले होते. तिला दम  लागत होता म्हणून ‘बोलू नको’ म्हटले तर ती म्हणाली, की ‘पण तू बोलत रहा’. 17 जुलै 23 ला ती जाण्यापूर्वी 12 तारखेला मला तिचा फोन आला, बोलवत नव्हते पण फक्त ‘मला लगेच भेटायला ये’ इतकेच म्हणाली. मी 13 तारखेस सकाळीच उठून गेले. संध्याकाळी पाचपर्यंत तिच्याबरोबर होते. मी बोलत होते, जुन्या आठवणी काढत होते, ती हसून, हुंकार देऊन, माझा हात दाबून प्रतिसाद देत होती. ती 23 तारखेला गेल्यानंतर 24 तारखेच्या ‘लोकसत्ते’त मी ‘आमची मंगल गेली’ हा लेख लिहिला, फक्त माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी ! पण त्या लेखाला प्रतिसाद म्हणून मला सुमारे 30/32 मेल आल्या. मंगलचे आम्हाला माहीत नसलेले कितीतरी पैलू त्यात दिसले, तिने किती जणांची आयुष्य समृद्ध केली, she had touched so many lives. तिच्या प्रज्ञेचे ते आविष्कार होते व म्हणून  ते इतरांसमोर यावे असे मला कळकळीने वाटले. ती केवळ जगप्रसिद्ध शास्त्रज्ञाची सहचारी नव्हती तर स्वयंप्रकाशी होती. तिचा प्रकाश दिपवणारा नव्हता तर समईच्या ज्योतीसारखा आश्वासक होता. तिच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर तिच्या मैत्रिणी असणाऱ्या तिच्या मैत्रिणींनीही तिच्याबद्दल लिहिले होते. त्यातल्या चारपाच जणींना मी गुगल मीटवर बोलावले व हे पुस्तकरूपाने लोकांपुढे आले पाहिजे हा मनोदय बोलून दाखवला. या मैत्रिणींपैकी दोघी अमेरिकेतील दोन प्रांतांत, एक कॅनडात, एक नाशिक येथे व एक मुंबईत – पण स्वतः कॅन्सरच्या शेवटच्या टप्प्यावर. आम्ही मिळून पुस्तक प्रकाशित करायचे ठरवले. मी प्रकाशकांकडे गेल्यावर त्यांनी सांगितलेला खर्च आम्हाला परवडण्यासारखा नव्हता व आम्हाला आमच्या हेतूसाठी तो गैरवाजवी वाटला. अशा वेळी माझा जावई डॉ. प्रदीप कर्णिक याने पुढाकार घेतला, याचे सुबक पुस्तक व्हावे यासाठी खूप मदत केली व त्याचे स्नेही चेतन क्षीरसागर यांनी आमची इच्छा उचलून धरली व त्यातून निघाले ‘मंगल मैत्री’ हे पुस्तक ! यात तिचे सहकारी, सासर व माहेरचे कुटुंबीय, स्वतः जयंत नारळीकर, तिच्या मुली, नाती यांनीही तिच्याबद्दल लिहिले आहे व त्यात तिने लिहिलेले काही प्रकाशित व अप्रकाशित लेखही आहेत. आमच्या प्रिय मैत्रिणीला आम्ही वाहिलेली ही आगळीवेगळी श्रद्धांजलीच आहे.

-डॉ. शुभा थत्ते 9820179109 thatteshubha@gmail.com

‘आमची मंगल गेली’ या डॉ. शुभा थत्ते यांच्या रविवार, 24 जुलै 2023 च्या ‘लोकसत्ता’च्या अंकातल्या लेखाचा संपादित अंश, साभार:

… आमची पहिली भेट सातवीच्या वर्गात. किंग जॉर्ज शाळा, दादर; त्यावेळी इं. ए. सोसायटीची मुलींची शाळा नं. 2 होती. मी त्यापूर्वी हिंदू कॉलनी पाचव्या गल्लीतील नगरपालिकेच्या शाळेत होते व मंगल ज्येष्ठाराम बाग-दादर या नगरपालिकेच्या शाळेत. त्या वयात होते तशी बडबड्या मुलींची लगेच गट्टी जमली. बोलताना कळले की तिला वडील नाहीत (तिच्या जन्मतःच मरण पावलेले) व आई पुण्याला असते व मंगल काका-काकूकडे राहाते. त्या वयात नक्कीच खूप दया वाटली असणार, पण नंतर तिच्या घरी जाणेयेणे सुरु झाल्यावर समजले की तिचे काका, काकू (तिची सख्खी मावशी) व आजी तिला व तिच्यापेक्षा दीड वर्षाने मोठा भाऊ अनिल या दोघांना खूप लाडाकोडाने वाढवताहेत, पुढे ते लाड आमच्याही वाट्याला आले. हळूहळू आमची गट्टी जमत गेली. आमचा सहा मैत्रिणींचा ग्रूप होता. त्यांतील तिघी पुढे वेगळे विषय घेतल्याने व दोघी लग्न होऊन गोव्याला गेल्यामुळे मी, मंगल व अजिता दिवेकर (काळे) यांची मैत्री अतूट राहिली. शाळेत असताना आमचा मुक्त संचार ज्येष्ठाराम बाग, अजिताचे किंग्ज सर्कलचे घर व वर्सोव्याचा बंगला, मंगलच्या आईचे पुण्याचे वसतिगृह व गोपिकाश्रमातील मंगलचं चितळ्यांकडील आजोळ येथे असे. मंगलची आई पुण्याच्या शेठ ताराचंद रामनाथ रुग्णालयात प्रसूतिशास्त्र प्रमुख व विद्यार्थिनींच्या वसतिगृहाची रेक्टर होती. त्यामुळे सुट्ट्यांमध्ये वसतिगृह रिकामे झाले की आम्ही तिथे आठवडाभर जाऊन धमाल करत असू. ती एस.एस.सी.ला अपेक्षेप्रमाणे पहिली आली व आम्ही तिघीही रुईया कॉलेजमध्ये दाखल झालो.

तो पहिला नंबर युनिव्हर्सिटीतही बी ए व एम ए ला तिचाच होता. मी मानसशास्त्र हा विषय घेतल्याने रुपारेल कॉलेजमध्ये गेले. मी माझं लग्न 1961 मध्ये ठरवलं व मी निवडलेल्या माझ्या जोडीदाराची मंगल व अजिता या दोघींनी दादरच्या फार्मर ब्रदर्समध्ये दोन तास खडसावून मुलाखत घेतली व नंतर मी घरी सांगितलं. ती जयंतबरोबरच्या विवाहानंतर केंब्रिजला गेली व तिथूनही तिची वैशिष्ट्यपूर्ण, वाचनीय पत्रं व फोटो येत असत. 1972 साली छोट्या गीताला घेऊन तिघेही तेथील सर्व प्रलोभने नाकारून केंब्रिजहून परत आले व TIFR मधील जबाबदारी घेतली.

मंगल कुलाब्याला TIFRमध्ये आल्यानंतर आमच्या परत गाठीभेटी होऊ लागल्या. जयंतला एक भाऊ आहे पण मंगलचे सासू-सासरे (तात्यासाहेब व ताई) शेवटपर्यंत मंगलबरोबरच राहिले. मी जेव्हा तिथे जात असे तेव्हा मंगलची धावपळ पाहात असे. ते दोघेही खाण्यापिण्याच्या वेळा, त्यांचा दिनक्रम या बाबतीत खूप काटेकोर होते. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुली, अतिव्यस्त नवरा यांच्या वेळा सांभाळणे ही तारेवरची कसरत व नंतर तिचे Ph D चे काम. ती कोणतेही काम नोकरांवर न सोपवता जातीने करत असे. माझ्या अशा भेटीमध्ये ताई मला त्यांच्या खोलीत बोलावून घेत असत व जयंतला मिळालेली बक्षिसे, त्याचे आलेले फोटो वगैरे दाखवून त्याचे कौतुक करत असत, पण मंगलबद्दल कौतुकाचा एकही शब्द नसे. तात्यासाहेबांना तिचे कौतुक होते. मी मंगलजवळ माझी नाराजी व्यक्त केली की ती हसून म्हणे, ‘जाऊ दे गं’  शुभा, त्यांचं त्यांच्याजवळ! त्यांच्या मुलाचं म्हणजे माझ्या नवऱ्याचंच कौतुक करताहेत ना ! छान आहे की !’ ताई 1996 साली गेल्या व त्यापूर्वी तीन वर्षे पक्षाघाताने अंथरुणात होत्या व मंगलने त्यांची मायेने सेवा केली. आमची मैत्रीण अजिता फार लवकर, बावन्नव्या वर्षी व विचित्र परिस्थितीत अमेरिकेत मरण पावली. त्यामुळे मी व मंगल, आम्ही भेटल्यावर तिची आठवण निघाली नाही व डोळे पाणावले नाहीत असे कधी झाले नाही.

मंगलची गणितशास्त्रातील पीएच डी 1982 साली झाली व योगायोग असा की माझी क्लिनिकल Psychology या विषयातील पीएच डीही त्याच वर्षी झाली व आम्ही दोघी मैत्रिणी पदवीदान समारंभाच्या मिरवणुकीत काळे डगले घालून जोडीने चाललो. त्यानंतर जयंतची स्वप्नपूर्ती ‘आयुका’च्या रूपात पुणे येथे 1988 साली झाली. त्याच्या उभारणीतही मंगलच्या अनेक मोलाच्या सूचना होत्या. पुण्यात तिच्या गणितावरील प्रेमामुळे बाल भारतीचे व भास्कराचार्य प्रतिष्ठान येथे शिकवण्याचे काम सुरू झाले. शिकवणे ही तिची पॅशन होती व त्यात ती मनापासून रमत असे. कामानिमित्ताने जयंतबरोबरच्या प्रवासातही तिचे वाचन, काम व पाहिलेल्या ठिकाणांची मूळात जाऊन माहिती जमवणे चालू असे. तिला सर्वांच्या उपयोगी पडण्याचे बाळकडू आईपासून मिळाले होतेच. निर्मलाताई राजवाडे या नामवंत वैद्य होत्या. त्यांनी ताराचंद रुग्णालयातील प्रदीर्घ सेवेनंतर गरजूंसाठी ‘आत्रेय रुग्णालय’ सुरु केले. त्यांच्या शेवटच्या काळात मंगलने त्यांच्याकडून ‘आयुर्वेदिक उपचार’ नावाचे पुस्तक लिहवून घेतले, बहुमोल सूचना देऊन ते स्वतः संगणकावर तयार केले व 1997 साली प्रकाशित केले. हे खास लिहिण्याचे कारण तिच्यातील अनेक पैलू जवळच्या माणसांनाही माहिती नाहीत व आपणहून सांगण्याचा तिचा स्वभाव नव्हता.

तिचं व जयंतचं सहजीवन खरोखर आदर्श म्हणावं असंच होतं. जयंतचा स्वभाव अतिशय मृदू, मितभाषी पण समोरच्या माणसाला बोलते करण्याचा. तिच्याकडे कधीही जेवायला गेलं, की टेबलावर ताट, वाट्या, भांडी, पाणी घेणं हे जयंतचं काम. स्वतःची सर्व कामं स्वतः करणार. गेली काही वर्षे धाकटी मुलगी लीलावती व तिच्या मुली शेजारी असल्याने तो त्या नातींमध्ये खूप रमत असे. त्याच्या आजारपणात त्याला तो मोठा विरंगुळा होता.

जाण्याच्या दोन दिवस आधी आमची दोघींची भेट ही मोठी आश्चर्याची बाब होती. कारण मला तिची प्रकृती अधिक बिघडल्याचं कळलं होतं व मी 22/23 तारखेला पुण्याला जायचा बेत करत होते व तिला तसं कळवलंही होतं. पण तिने कोणाकरवी मला तिला फोन करण्यासाठी बुधवारी निरोप पाठवला. तिला फोनवर बोलणं शक्य नव्हतं हे मला माहीत होतं. तरी मी प्रयत्न केला. ती खोल आवाजात, ‘शुभा, कधी येतेस? आत्ता लगेच ये’ असं म्हणाली व मी लगेच गुरुवारी गेले. चार तास तिच्या सोबत घालवले. तिच्या मुलीने गिरिजाने विचारलं, ‘तुम्हा दोघी मैत्रिणींचा फोटो काढू का?’ मीच नकार दिला. आमच्या आठवणीतील मंगलची छबी मला पुसायची नव्हती. तिच्या वेदना पाहावत नव्हत्या. आवाज खोल गेला होता पण तरी मला खुणेने सांगत होती, ‘तू बोल, मी ऐकते आहे.’ मी पूर्वीच्या अनेक आठवणी काढत होते आणि तिचा चेहरा फुलत होता. माझ्या सांगण्यात काही गफलत झाली तर ती दुरुस्त करत होती. तिची आठ वर्षांची लहान नात रोशनी मधून मधून येऊन आजीच्या चेहऱ्यावर हात फिरवत होती व ‘आजी, बरी हो’ असं सांगत होती. गेले काही दिवस मंगलला लिहिण्यासाठी एक वही ठेवली होती. हात सुजल्याने पेनही हातात नीट धरवत नव्हते. तिला सांभाळणाऱ्या बाईंनी तिला बसवत हातात वही दिली तर ती एकाच अक्षरावर गिरवत राहिली व आडवी झाली. गेल्या काही दिवसांत लिहिलेलं मी वाचायला लागले. अक्षर लावून लावून वाचावं लागत होतं. तीन दिवसापूर्वी लिहिलं होतं. ‘विनासायास मृत्यू प्रार्थयामि’. त्याआधी एक दिवस लिहिलं होतं, ‘काल रात्री जाग आली. कोपऱ्यात हिरवानिळा प्रकाश होता. वाटलं-मृत्यू आला. पण सकाळी जाग आली. तो पैलतीर तिला दिसत होता, जाणवत होता. तिथे जाण्याची मनाची पूर्ण तयारी झाली होती. संध्याकाळी निघताना माझा पाय निघत नव्हता. जयंतच्या चेहऱ्यावरील असहायता पाहवत नव्हती. तिच्या चेहर्‍यावर हात फिरवून तिचा मुका घेत मी तिचा निरोप घेतला. डोळे पाणावले होते पण खाली जाऊन गाडीत बसल्यावर मी माझ्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली!

– डॉ. शुभा थत्ते 9820179109 thatteshubha@gmail.com
(‘लोकसत्ता’ 23 जुलै 2023 वरून उद्धृत)

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here