दुर्गवीर ही मुंबईस्थित संस्था. ती गडकिल्ले, मंदिर, जुन्या वास्तू संवर्धन आणि त्यांच्या परिसरातील जनतेचा विकास यासाठी कार्य करत आहे. पण तिला मुंबईची संस्था तरी का म्हणायचे? दुर्गवीर गावोगावी आहेत. त्यांचा मूळ विचार महत्त्वाचा आहे. शिवाजी महाराजांची मुद्रा तयार करताना लोककल्याण, स्वराज्याचा विस्तार या गोष्टींचा विचार केला गेला. ‘दुर्गवीर प्रतिष्ठान’तर्फे मुंबई, पुणे, नाशिक, सातारा, बीड, कोल्हापूर, बेळगाव, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, लातूर येथील तरुण-तरुणी गडकोटांच्या संवर्धनासाठी 2008 पासून झटत आहेत. ‘दुर्गवीर प्रतिष्ठान’चे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत, संतोष हासुरकर. त्यांचे मूळ गाव बेळगाव. त्यांचे वास्तव्य मुंबईमधील सांताक्रुझ येथे असते.
ठिकठिकाणचे दुर्गवीर दर शनिवार-रविवारी व सुट्ट्यांच्या इतर दिवशी किंवा आठवडाभराच्या काम-कॉलेजच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ मिळाला, की एकत्र येतात आणि गडांच्या मोहिमेवर निघतात. ‘दुर्गवीर प्रतिष्ठान’ची श्रमदान मोहीम असते, तशी दुर्गभ्रमंती मोहीमही असते. दुर्गवीर नुसते दुर्गांच्या संवर्धनाचे काम करतात असे नव्हे तर शिवाजी महाराजांच्या शौर्यशील संस्कृतीचे स्मरण करण्यासाठी विविध उपक्रमही राबवतात.
‘दुर्गवीर’ शिवजयंती असो वा शिवराज्याभिषेक, गुढीपाडवा असो वा दसरा प्रत्येक सण तितक्याच उत्साहाने व मराठमोळ्या पद्धतीने शक्य तर गड परिसरात साजरा करतात. संस्थेने दुर्ग शहरीकरणाच्या रेट्यात विस्मृतीत जाऊ नयेत म्हणून काही गडांच्या जवळच्या मार्गांवर गडांची माहिती देणारे स्थान दर्शवणारे दिशादर्शक फलक लावले आहेत.