प्रबुद्ध मूकनायक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निरतिशय सुंदर लिखाण इंग्रजी भाषेइतकेच मराठीत केले आहे. ते ‘मूकनायक’ या साप्ताहिकाचे संपादक होते. ‘मूकनायक’ हे नावच मुळात शोषित आणि पददलित वर्गाचे अस्सल वर्णन करणारे आहे. शाहुमहाराजांनी ‘मूकनायक’ वृत्तपत्र सुरू करण्यासाठी आंबेडकर यांना प्रेरणा दिली आणि त्याचा पहिला अंक 31 जानेवारी 1920 रोजी प्रकाशित झाला. आंबेडकर ‘बहिष्कृत भारत’चे संपादन 13 एप्रिल 1927 रोजी तर, ‘जनता’ या साप्ताहिकाचे संपादन डिसेंबर 1930 मध्ये करू लागले. आंबेडकर यांचे त्या तिन्ही साप्ताहिकांमधील लिखाण मूलग्राही आणि ज्वालामुखीच्या उद्रेकासारखे ज्वलज्जहाल आहे. त्यांनी लिहिले आहे, “बहिष्कृत लोक हे पशू नसून, उलट, ते आमच्याचसारखे तेजस्वी आणि न्यायप्रिय आहेत, हे त्यांना पटले म्हणजे त्यांच्यातील उच्छृंखल लोकही आमच्याशी लीनतेने वागू लागतील’, आंबेडकर यांची भाषा ही नितळ, सरळ आणि सोपी आहे. ‘मूकनायक’च्या 14 ऑगस्ट 1920 च्या अग्रलेखाचे शीर्षक आहे ‘सिंह प्रतिबिंब’.