नाट्यसंगीताचा वारसा जपणारी तरुण पिढी


अंधेरीच्या ‘भवन्स कल्चरल सेंटर’तर्फे मराठी नाट्यमहोस्तव आयोजित केला गेला होता. मी त्यात ‘संगीत, कोणे एके काळी’ हे नाटक पाहिले, ऐकले. ते अप्रतिम वाटले.

‘मिथक’ संस्थेतर्फे नाटक सादर केले गेले. मी त्यांच्यामधील आशुतोष गोखले याच्याशी गप्पा मारल्या.

रुपारेल कॉलेजमधून पदवीशिक्षण पूर्ण करून, बाहेर पडलेली दहा-बारा मुले. त्यांना नाटकाविषयी आवड, आस्था आहे. त्यांनी २००६ साली ‘मिथक’ची स्थापना केली. ‘स्वत:ला पटेल व आवडेल असे नाटक करणे’ हा त्यांचा उद्देश. त्यांनी आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमध्ये बर्याीच वेळा प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. त्यांनी २०११ साली, आतंरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत, प्रथमच संगीत एकांकिका सादर केली- ‘संगीत, कोणे एके काळी’. त्यात त्यांना दुसरा क्रमांक मिळाला.

‘चतुरंग’ची सवाई एकांकिका स्पर्धा असते. त्यात संपूर्ण वर्षभरात पहिला क्रमांक मिळवणा-या एकांकिकांना प्रवेश मिळतो. दुसरा क्रमांकप्राप्त ‘संगीत, कोणे एके काळी’ला अर्थातच त्यात प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे ‘मिथक’ची मुले-मुली नाराज होती. त्यावर त्यांनी, विशेषत: अद्वैत दादरकरने असा विचार केला, की आपण एकांकिकेतून बाहेर पडून, प्रायोगिक रंगभूमीवर संगीत नाटक सादर करुया! मग मंडळी उत्साहाने कामाला लागली.
एकांकिका द.मा. मिरासदारांच्या कथेवर आधारित आहे. त्याचे दोन अंकी नाटकात रूपांतर करून २९ नोव्हेंबर २०११ ला संगीत नाटकाचा पहिला प्रयोग सादर झाला.