चांदागडचे निसर्गवैभव- ताडोबा अभयारण्य (Tadoba Sanctury)
चांदागडला प्राचीन काळापासून घनदाट जंगले होती. त्या जंगलात राहणाऱ्या आदिवासींचा 'तारू' नावाचा राजा होता. त्या जंगलात अनेक जंगली जनावरे होती. त्यामध्ये वाघ हा प्रमुख होता. वाघाचा फार त्रास त्या परिसरात राहणाऱ्या आदिवासींना; तसेच, इतर लोकांना होत असे. वाघाचा अचानक सामना होऊन आदिवासींचे जीव जात असत. तारु हा राजा पराक्रमी होता. तो नरभक्षक वाघांना ठार करू शकत असे. तारू राजाला वनौषधींचीही माहिती होती. तो जखमी झालेल्या लोकांवर उपचार करत असे. म्हणून, परिसरात राहणारे आदिवासी राजाला तारणहार, तारणारा म्हणजेच तारुबा असे म्हणत आणि त्याला देव मानत. कालांतराने, तारुबाचा अपभ्रंश होऊन तारोबा आणि पुढे, तो परिसर 'ताडोबा' म्हणून नावारूपास आला. 'तारू' राजा लोकांचे जीव वाचवताना ताडोबात असलेल्या तलावाकाठी वाघाशी झुंज देतानाच मरण पावला. आदिवासींनी ज्या ठिकाणी राजा वाघाशी झुंज देऊन मरण पावला त्या तलावाकाठी राजाची समाधी आणि मंदिर अशा वास्तू बांधल्या. त्या मंदिराला 'ताडोबादेव मंदिर' म्हणतात.