निसर्गोपचार सेवक – (डॉ.) गिरीधर काळे (Giridhar Kale)
गिरीधर काळे हे शिक्षणाने डॉक्टर नाहीत. पण, त्यांना बिबीगाव परिसरातील समाज डॉ. गिरीधर काळे या नावाने ओळखतो. त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वसामान्य आहे, पण ते करत असलेले कार्य असामान्य आहे. त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे, परंतु त्यांच्या हातात निसर्गोपचार चिकित्सापद्धतीने अस्थिरुग्णांना उपचार करून दिलासा देण्याचे उत्तम कसब आहे. ते दररोज शंभरेक लोकांना निःशुल्क आणि निःस्वार्थ सेवा देत आहेत. त्यांच्या समाजकार्यामुळे ‘बिबी’ गावाची ओळख सर्वदूर होत आहे. त्यांचे वय फक्त एकोणपन्नास वर्षें आहे.
‘बिबी’ गाव चंद्रपूर जिल्ह्याच्या कोरपना तालुक्यात आहे. ते जिल्ह्याच्या ‘राजुरा’ तालुक्यातील गडचांदूरजवळ आहे आणि जिल्हा ठिकाणापासून पन्नास किलोमीटर अंतरावर येते. तेथे काळे राहतात. त्यांच्याकडे सकाळपासून लोकांची रांग लागलेली असते. त्यांच्याकडे कोणी हात मोडला म्हणून, कोणी पाय मोडला म्हणून, कोणी लचक भरली म्हणून, कोणी पाठ आखडली म्हणून, कोणाचा खांदा घसरला म्हणून, तर कोणी मनगट दुखावले म्हणून उपचारासाठी आलेले असतात. बहुतेकांचे दुखणे हाडाशी संबंधित असते.