नाथसंप्रदाय : उदय आणि विस्तार
नाथसंप्रदाय हा संप्रदाय स्वरूपात केव्हापासून प्रचलित झाला हे सांगणे अवघड आहे. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांचा काळ हा नाथसंप्रदायाच्या प्रवर्तनाचा काळ मानला जातो. नाथसंप्रदाय हा शिवोपासक असून, त्या सांप्रदायिकांची श्रद्धा ‘शिव’ हा सर्वांचा ‘गुरू’ अशी आहे. गुरू गोरक्षनाथ ‘सिद्धसिद्धांत पद्धती’ या दिव्य ग्रंथाच्या आरंभी म्हणतात, “ज्याप्रमाणे दोन टिपऱ्यांचा नाद एकच, दोन स्वजातीय फुलांचा गंध एकच, दोन ज्योतींचा प्रकाश एकच, दोन नेत्रांतील दृष्टी एकच, त्याचप्रमाणे या विश्वाच्या पसाऱ्यात ‘शिव-शक्ती’ या नामद्वयाने नटलेले तत्त्व नि:संशय एकच आहे (आदिनाथं नमस्कृत्यं शक्तियुक्तं जगद्गुरूम् | वेक्ष्ये गोरक्षनाथोऽ हं सिद्धसिद्धांत पद्धतिम् ||).”