भागवत परंपरेचे विरगाव (Virgoan)
विरगाव हे नाशिक जिल्ह्याच्या बागलाण तालुक्यातील पाच हजार लोकवस्तीचे गाव. ते विंचूर - प्रकाशा या महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक 17 वर वसलेले आहे. गावची लोकसंख्या सातहजार आहे. सटाणा- ताहाराबाद या दोन गावांच्या दरम्यान विरगाव सटाणापासून दहा किलोमीटर अंतरावर येते. गुजराथ राज्य गावापासून वायव्य दिशेला फक्त चाळीस किलोमीटर अंतरावर आहे. गावाजवळून वायव्य-आग्नेय या दिशेने कान्हेरी नावाची लहान नदी आहे. ती कोरडीच असते. कान्हेरी नदीत ‘रामशेर’ नावाचा डोह आहे. राम पंचवटीला वनवासात जाताना त्या डोहाजवळ थांबले होते. म्हणजे त्यांनीच तो डोह तयार केला अशी आख्यायिका सांगितली जाते. तिचा संगम पाच किलोमीटर पुढे आरम नदीशी होतो. आरम नदी पुढे गिरणा नदीला जाऊन मिळते.