युवराज घोगरे यांचा एकच ध्यास- शाळेचा सर्वांगीण विकास! (Yuvraj Ghogre)
युवराज घोगरे यांच्या शिक्षक म्हणून नोकरीची सुरुवात 12 मार्च 2005 रोजी जळगाव जिल्ह्यातील विवरे या लहानशा गावी जिल्हा परिषद शाळेत झाली. त्या गावात येण्या-जाण्याची साधी सुविधाही नव्हती. शाळेची पटसंख्या छत्तीस होती, परंतु मुले त्यांना शिक्षणात रस नसल्याने शेतात, रानात जायची. त्यामुळे रोज दहा-बारा मुले तरी गैरहजर असायची. वस्ती मुख्यत: भिल्ल, आदिवासी लोकांची; युवराज यांनी तशा घरांतील मुलांना शाळेचा लळा लावण्याचे ठरवले. त्यांनी मुलांना ती जेथे शेतात, रानात असतात, तेथे जाऊन त्यांना शिक्षणाची गोडी लावण्याचे काम सुरू केले; मुलांना आणि त्यांच्या पालकांना शिक्षणाचे महत्त्व सांगितले. युवराज यांनी विद्यार्थ्यांची व गावकऱ्यांची रुची हेरून त्यांना सांस्कृतिक कार्यक्रमांत गुंतवून घेतले. मुलांना शिक्षकांच्या गोष्टीगप्पा आवडू लागल्या. ती शाळेत येऊ लागली. तेवढेच नव्हे तर ती शाळा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमुळे तालुक्यात हळुहळू नावाजली जाऊ लागली.