बॅ. मु. रा. जयकर आणि संयुक्त महाराष्ट्र

प्रतिनिधी 18/01/2010

कर्नाटक आणि आंध्र या प्रांतांमधे एकीकरणाच्या चळवळींनी आधीपासून जोर धरला होता. त्यामानाने महाराष्ट्रात एकीकरणाची चळवळ उशिरा सुरू झाली आणि धिम्या गतीने पुढे सरकत राहिली.

महाराष्ट्र एकीकरणाच्या चळवळीतली शिथिलता त्यावेळच्या ब-याच मंडळींना खटकत होती, पण त्यासाठी धडाडीने पुढे येण्याचा प्रयत्न विशेष असा कोणी केला नाही. फाजल अली कमिशनचा अहवाल प्रसिध्द झाल्यावर मात्र संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने जोम धरला. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या चळवळीने 1955 नंतर लढ्याची तीव्रता वाढवली, ती आचार्य अत्रे यांच्यामुळे, पण ती पुढची गोष्ट.

महाराष्ट्र एकीकरण चळवळीतली शिथिलता व तिची धिमी गती यावर विचार करण्यासाठी 'ज्योत्स्ना' मासिकाने निवडक चाळीस पुढा-यांना आणि लेखकांना एक प्रश्नावली पाठवली, त्यांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांच्या सारांशावर आधारित अहवाल प्रकाशित केला. हा सगळा उद्योग 'ज्योत्स्ना' मासिकाचे कर्ते ग.वि.पटवर्धन यांच्या कल्पकतेतून घडून आला. ते वर्ष होते 1938 किंवा 1939! त्या अहवालानुसार महाराष्ट्र एकीकरणाच्या चळवळीत सर्वप्रथम महाविदर्भाच्या निर्मितीला प्राधान्य द्यावे असा सूर मध्य प्रांत-व-हाडतल्या अनेक नेत्यांनी काढला.

संयुक्त महाराष्ट्र समितीत काँग्रेस नेते!

प्रतिनिधी 18/01/2010

ग.त्र्यं.माडखोलकर नागपूरच्या 'तरुण भारत'चे संपादक होते. ते अग्रलेखांद्वारे संयुक्त महाराष्ट्राची भूमिका व चळवळीस पोषक विचार पेरत होते. मुंबईत आचार्य अत्रे आणि नागपूरला ग.त्र्यं.माडखोलकर असे दोन खंदे प्रवक्ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीला लाभले होते.

ब्रिटनच्या मंत्रिमंडळातले तीन मंत्री 1946 साली एप्रिलमध्ये हिंदुस्थानात आले असताना महाविदर्भ सभेने त्यांना महाविदर्भाचा स्वतंत्र प्रांत निर्माण करण्याची विनंती केली. त्या आशयाचे निवेदन विदर्भातले नेते पंजाबराव देशमुख यांनी सर स्टॅफर्ड क्रिप्सल ह्यांना सादर केले.

त्याच सुमारास संयुक्त महाराष्ट्राची मागणी करणारे तीन ठराव बेळगावच्या साहित्य संमेलनात मांडण्यासाठी मध्यप्रांत व-हाडातील साहित्यिकांनी पाठवले. त्याला राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिला होता.

माडखोलकरांना आपले प्रश्न महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांनी महाराष्ट्र एकीकरणाबाबत आस्था दाखवल्याशिवाय सुटणार नाहीत याची खात्री होती. त्यांनी काँग्रेस नेत्यांना महाराष्ट्र एकीकरणाच्या कार्यात किंवा चळवळीत आणण्याचे प्रयत्न चिकाटीने केले.

माडखोलकरांनी हाच मुद्दा 29 जानेवारी 1946 च्या आपल्या अग्रलेखात मांडला. त्यात त्यांनी, ''देवांचे महाराष्ट्र एकीकरणाबाबतचे उदासीनतेचे आणि उपेक्षेचे धोरण अत्यंत उद्वेगजनक, अत्यंत चीड आणणारे नाही काय?'' असा सवाल विचारला.

पुढे, त्यांनी हाच प्रश्न साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात पुन्हा विचारला. शंकरराव देव, काकासाहेब गाडगीळ आणि बाळासाहेब खेर या महाराष्ट्राच्या राष्ट्रसभेतील नेत्यांना एकीकरणाची मागणी एकमुखाने करण्याइतके त्या प्रश्नाचे अगत्य कोठे वाटत आहे?''