मंदिर जीर्णोद्धारप्रसिद्ध सुभाष कर्डिले
सुभाष कर्डिले हे निफाडचे राहणारे. निफाडमध्ये जी मंदिरे आहेत त्यांपैकी कर्डिले यांचा सहभाग शनैश्वराचे मंदिर, विठ्ठल-रुक्मणी मंदिर, खंडेरायाचे मंदिर, मुंजाबाचे मंदिर व भद्रा मारुती मंदिर या पाच मंदिरांच्या जीर्णोद्धारामध्ये आहे. मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यासाठी गावातील लोकांनी पैसे जमवले होते. कर्डिले यांनी स्वत:च्या घरचे बांधकाम आहे असे समजून, जे पडेल ते काम त्यासाठी केले आहे. मुळात तो त्यांचा ध्यास आहे. किंबहुना त्यांना गावातील अशी छोटीमोठी सार्वजनिक कामे आकृष्ट करतात व ते त्यात खेचले जातात.
कर्डिले हे शनैश्वर मंदिर व विठ्ठल-रुक्मणी मंदिराचे सेक्रेटरी आहेत. ते त्या दोन्ही मंदिरात रोज जातात. ते तेथील स्वच्छता व इतर व्यवस्था नीट आहे ना तेही पाहतात.
कर्डिले यांची शेती आहे. शिवाय, त्यांचे फर्निचरचे दुकानही आहे. त्यांचे शिक्षण बी.कॉम.पर्यंत झाले आहे. त्यांच्या घरी त्यांची आई, पत्नी व दोन मुलगे आहेत. मोठा मुलगा इंजिनीयरिंगला आहे. धाकटा बारावीत आहे. दोघे शिक्षणासाठी नाशिकला राहतात.
निफाड हे गाव विनता, कादवा आणि शरयू या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसले आहे. विनता नदी तेथे दक्षिणवाहिनी होते. नदी जेथे दक्षिणवाहिनी होते ते श्रद्धेनुसार नित्यतीर्थ असते. निफाडला ते महात्म्य आहे.