कडव्या वालाची कथा आणि पोपटी


मोड आलेले कडवे वाल वालाच्या पीकाला जमीन काळी कसदार व पोयदा प्रकारची, म्हणजे तिच्यात पाणी साचणार नाही किंवा पाण्याचा निचरा त्वरित होईल अशा त-हेची लागते. मात्र जमिनीत थोडा ओलावा असावा लागतो. साधारणत: वालपेरणीचा काळ हा गणपती विसर्जन झाले, की पाऊस कमी झाल्यावर असतो. वाल भाताच्या उभ्या पीकात हाताने टाकतात. भाताच्या पीकाचा उबदारपणा वालाच्या पीकास पोषक ठरतो. दुसरा प्रकार –वालाची पेरणी साधारणत: भाताच्या पीकाची कापणी झाली, की मग जमीन नांगरून करतात.

 फोकण पद्धत म्हणजे वाल हाताने शेतात फेकणे व टोकत पद्धत किंवा चेपणीचा वाल म्हणजे काठीने वाल जमिनीत चेपणे. या प्रकारात जमिनीत काठीने भोके पाडून त्यात एका वेळेस दोन वाल चेपून म्हणजेच दाबून लावले जातात.

 वाल फुलायचा तसेच कोवळ्या व तयार शेंगा येण्याचा हंगाम (मौसम) हा संक्रांतीच्या जवळपास असतो. संक्रांतीच्या पूजेत वालाच्या व बांधावरच्या घेवड्याच्या शेंगा ठेवतात. त्या दोन्ही शेंगांची (दाण्याची) उसळ संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगीच्या दिवशी करतात.