कारिट - नरकासूराचे प्रतिक
कारिट हे भारतात सर्वत्र आढळणारे रानवेलीचे फळ आहे. या फळास कारिंटे, कार्टे, चिरट, चिरटे, कोर्टी, चिर्डी, चिड्डी अशी अनेक नावे आहेत. खेडेगावात या फळाला चिभडं, शेरनी किंवा कर्टुलं या नावाने ओळखतात. कारिटाची चव कडवट असते. दिवाळीत नरक चतुर्दशीच्या पहाटे अभ्यंगस्नानापूर्वी ते फळ फोडण्याची परंपरा आहे. ते फळ नरकासूर या राक्षसाचे प्रतिक मानले जाते. नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान कृष्णाने नरकासूर राक्षसाचा वध केला. म्हणून या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्यंगस्नानाच्या पूर्वी घराबाहेर किंवा तुळशी वृदांवनाजवळ डाव्या पायाच्या अंगठ्याने कारिट ठेचले जाते. त्यातून बाहेर पडणारा रस हे नरकासुराच्या रक्ताचे रुपक आहे. कारिट फोडल्यानंतर त्याचा रस जिभेला तर त्याची बी कपाळाला लावण्याची पद्धत आहे. अभ्यंगस्नानाच्या आधी कारिट फोडून नरकासुराचा प्रतिकात्मक वध करत त्याच्या रुपात असलेली सारी कटुता, दुष्टता नाहीशी करावी आणि त्यानंतर मंगल स्नानाने पवित्र होऊन दिवाळीचा सण साजरा करावा अशी कारिट फोडण्यामागची कल्पना आहे. काही ठिकाणी कारिट अभ्यंगस्नानानंतर फोडले जाते.