महिकावतीची बखर (Mahikavati Bakhar)
महिकावतीची बखर हे इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांनी लिहिलेले पुस्तक आहे. त्या पुस्तकाची पहिली आवृत्ती १९२४ साली तर दुसरी आवृत्ती १९९१ साली प्रकाशित झाली. राजवाडे यांना ती बखर कल्याणच्या सदाशिव महादेव दिवेकर नामक व्यक्तीने वसईच्या हिरा हरी भंडारी यांच्याकडून मिळवून दिली होती. ती बखर राजवाडे यांच्या धुळे येथील संस्थेत आहे.
महिकावती म्हणजे माहीम. हे माहीम म्हणजे पालघर जिल्ह्याच्या केळवे-माहीममधील माहीम. त्या बखरीत उत्तर कोकणचा इतिहास आहे. ती साधारणपणे चौदाव्या शतकात लिहिली गेली. बखरीमधील इतिहास काळ शके १०६० पर्यंत (सन ११३८) मागे जातो. आतापर्यंत सापडलेल्या सर्व बखरींमध्ये ती अत्यंत जुनी अशी बखर आहे. त्या बखरीची एकूण सहा प्रकरणे असून त्यात विविध प्रकारची माहिती दिली आहे.