धर्मविधींसाठी ‘ज्ञानप्रबोधिनी’ पौरोहित्य व्यवस्था
पुणे येथील ‘ज्ञानप्रबोधिनी’ संस्थेची स्थापना कै. विनायक विश्वनाथ तथा अप्पा पेंडसे यांनी 1962 साली केली. प्रबोधिनी ही मुख्यतः गुणवंत विद्यार्थ्यांची शाळा म्हणून परिचित आहे. तथापी प्रबोधिनीचे कार्य ग्रामविकसन, संशोधन, आरोग्य या क्षेत्रांमध्येही लक्षणीय आहे. प्रबोधिनीने अंगिकारलेला ‘संस्कार कार्यक्रम’ हा आणखी एक महत्त्वाचा उपक्रम आहे. त्यामधून प्रबोधिनी घराघरात कुटुंबाकुटुंबात जाऊन पोचते. समाजात सर्वांना व्यक्तिगत आणि कौटुंबिक जीवनात धार्मिक आचरण हवे असते. अपत्यजन्म, विवाह, देहावसान या कौटुंबिक घटना संस्कारांनी बांधलेल्या असतात. व्यक्तीच्या जीवनाला असलेला सामाजिक, राष्ट्रीय आणि आध्यात्मिक संदर्भ त्या संस्कारांमधून प्रकट होत असतो. हिंदू जीवनपद्धतीत सोळा अर्थपूर्ण संस्कारांची मांडणी केली आहे. त्या संस्कारांचा मूळचा आशय काळाच्या ओघात हरवला गेला आहे. तो आशय आणि त्यांतील मूल्ये प्रबोधिनीच्या संस्कारांमधून पुनःप्रकट करण्याची योजना आहे.