‘चालना’कार अरविंद राऊत : जन्मशताब्दी!
‘क्षात्रैक्य परिषदे’चे संस्थापक पं.वि. अरविंद हरि राऊत यांचे ७ जून २०१४ ते ७ जून २०१५ हे जन्मशताब्दी वर्ष होते. वरोर हे त्यांचे आजोळ. त्यांचा जन्म ७ जून १९१५ रोजी ठाणे जिल्ह्यातील वरोर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे गाव नरपड! ती त्यांची कर्मभूमी होती. अरविंद यांनी शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शिक्षकी पेशा स्वीकारला. त्यांना सामाजिक कार्याची आवड होती. त्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षापासून सामाजिक कार्यात सहभाग घ्यायला सुरुवात केली. त्यांनी ‘प्रभात फेरी संघ मित्र’ या मंडळाची स्थापना १९२८ साली केली. त्या द्वारा ब्रिटिश राजवटीविरुद्ध जनजागृती करण्यासाठी चळवळीत सहभाग घेतला. त्यांनी बुलेटिन प्रसारित करण्याचे व लोकांपर्यंत पोचवण्याचे काम केले. त्यांनी ‘सोमवंशीय पाठारे क्षत्रिय समाज’ या सामाजिक संस्थेच्या कार्याला कृतीची प्रेरणा दिली. त्यांनी सहकार्यां बरोबर जनसंपर्क दौरे काढणे, सभा-संमेलने भरवणे, संघाची ध्येयधोरणे जनसामान्यांना पटवून देणे; त्याचबरोबर, लोकमताला वळण लावणे अशी कामे केली. त्यांनी संस्थेच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यात विखुरलेल्या समाजबांधवांना संघटित करण्याचे काम केले; पालघर येथे ‘सोनोपंत दांडेकर महाविद्यालय’ उभे करण्यासाठी पुढाकार घेतला.