पंचामृत (Panchamrut)
गाईचे दूध, दही व तूप; तसेच मध आणि साखर या पाच पदार्थांच्या मिश्रणाला पंचामृत असे म्हणतात. पंचामृत देव-देवतांच्या षोडशोपचार पूजेत अत्यावश्यक मानले गेले आहे. त्या पूजेत स्नानानंतर देवाला पंचामृताचे स्नान घालतात. पूजाविधीमध्ये पंचामृतात समाविष्ट असलेल्या प्रत्येक पदार्थासाठी एक मंत्र दिलेला असतो. गर्भवतीला दिनशुद्धी पाहून एकदा पंचामृत पिण्यास द्यावे, अशी सूचना ज्योतिस्तत्वात केलेली आहे.
दूध : शास्त्रकारांनी दुधाला ‘अमृत’ म्हटले आहे. दूध बुद्धिवर्धक असते. दूध तापवल्यानंतर त्यावर जमा होणारी साय पचनास जड पण बलवर्धक, पौष्टिक असते.
दही : फारसे आंबट नसलेले, मधुर दही हे दुधापेक्षाही अधिक गुणकारी आहे. ते शक्यतो रात्री खाऊ नये. दही आवळ्याच्या चूर्णाबरोबर घेतल्यास रक्ताचे व पित्ताचे आजार कमी होतात.