डॉ. संदीप राणे यांचे पत्निव्रत
मुंबईच्या चेंबूरमधील पेस्तम सागर भागात राहणारे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. संदीप राणे यांच्या पत्निव्रताची ही हकिगत. मी स्वत: डॉक्टरांकडे जाऊन उत्सुकतेने ती ऐकली आणि त्यांच्या चंदनी चांगुलपणामुळे भारली गेले. माझी ती भावना वाचकांना सांगावी असे वाटले. संदीप राणे यांनी त्यांच्या वागण्यात समतोल राखून कुशल, यशस्वी डॉक्टर व सुसंस्कृत पती या दोन्ही भूमिका उत्तमपणे गेली सात वर्षें निभावल्या आहेत. त्यात विलक्षण समजुतदारपणा व चांगुलपणा आहे. राणे पर्यावरण चळवळीचे जागरूक आणि सक्रिय कार्यकर्ते पूर्वापार आहेतच. त्यांना ‘महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डा’चे लाइफ टाइम अचिव्हमेंट अॅवार्ड मिळालेले आहे. त्यांचे नाव ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या ‘टॉप टेन’मध्ये आहे (ते नाव मुंबईतील नागरिकांच्या कल्याणकारी कार्याबद्दल नोंदवले जाते). पण त्यांना २०१२ सालापासून गेली सात वर्षें एक जादा जबाबदारी व्यक्तिगत आली आहे, ती पत्नी नीलमची. नीलम स्वत: शरीर आरोग्य विज्ञानाच्या डॉक्टर (फिजिऑलॉजी), पण त्यांना २०१२ साली डोकेदुखीचा अॅटॅक आला आणि राणे पतिपत्नींचा आयुष्यक्रमच बदलून गेला आहे.