‘विद्यानिकेतन’ ही डोंबिवलीमधील इंग्रजी माध्यमातील शाळा. समाजकार्याची आवड म्हणून विवेक पंडित यांनी ती सुरू केली. शाळेला चाळीस वर्षे झाली. मराठी माणसाने ध्येयवृत्तीने चालवलेली शाळा म्हणून तिचे डोंबिवलीच्या शैक्षणिक आणि सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात वेगळे स्थान निर्माण झाले आहे. वास्तविक विवेक पंडित यांचे शिक्षण वाणिज्य व व्यवस्थापन ह्या क्षेत्रांमधील आणि त्यांचा कामाचा अनुभव इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, केमिकल, एण्टरटेनमेंट अशा क्षेत्रांमधील. ते तेथे आघाड्यांच्या कंपन्यांचे प्रकल्प सल्लागार होते. त्यातून त्यांना बऱ्यापैकी उत्पन्न मिळत असे, पण त्यांना त्यांची समाजधारणा स्वस्थ बसू देत नव्हती. त्या अस्वस्थतेतूनच ‘राजेंद्र शिक्षण संस्था’ ह्या चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ‘विद्यानिकेतन’ ह्या शाळेचा जन्म 16 जून 1985 रोजी झाला...