Tag: रहाटगाडगे
माझे अलिबाग
एखाद्या गावाचे वर्णन करताना टुमदार शब्द वापरला जातो. तेव्हाच्या अलिबागला हा चपखल बसणारा शब्द. सुबक, टुमदार, सुरेख असे अलिबाग. नारळ पोफळीच्या वाड्यांनी गच्च भरलेले गाव. एस टी ने गावात प्रवेश करतानाच मन प्रसन्न होते. वैशंपायनांची वाडी, ठोसरांची वाडी, कामतांची वाडी अशा अनेक बागा, त्यात कौलारू सुबक घरे. काही दुपाखी, काही चौपाखी, काही माडीची... म्हणजे एक मजला वर असलेली. ब्राह्मण आळी, कामत आळी, मिरची गल्ली, बाजारपेठ, ठिकुरली नाका, कोळी वाडा, लिमये वाडी... असे बरेच विभाग आणि थोडेफार वास्तुशास्त्रात बदल असलेली घरे. जीना, पडवीची चौकट, खिडक्या, दारे सगळे उत्तम लाकडी बांधकाम. घरांमध्येही कणखर लाकडी आधाराचे मेरू खांब. ओटी, पडवी त्यानंतर बैठकीची खोली, माजघर, देवघर, स्वयंपाकघर, दोहो बाजूला वावरायच्या खोल्या. त्यावेळी स्वतंत्र बेडरूम अस्तित्वातच नव्हती...