कथा ग्लासफर्डपेठा गावाची (Story of Glasfardppeta)

4
366

‘खेड्यांचा देश’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या भारत देशात अशीही काही गावे आहेत ज्यांची नावे ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या नावांवरून पडली आहेत. त्या साऱ्या गावांशी निगडीत कथा सुरस आणि रंजक आहेत. अशी दोन गावे ‘दंडकारण्या’चा भाग असलेल्या माडिया गोंड आदिवासींच्या गडचिरोली जिल्ह्यात मोडतात. त्यातले एक आहे ‘जॉर्जपेठा’ तर दुसऱ्याचे नाव ‘ग्लासफर्डपेठा’.

‘ग्लासफर्ड’ हा मूळचा स्कॉटिश शब्द. त्याचा अर्थ ‘ग्रीन फॉरेस्ट’ म्हणजेच ‘हरित जंगल’ असा होतो. प्राणहिता नदीच्या तीरावरच्या घनदाट जंगलातल्या गावाचे नाव ‘ग्लासफर्ड’ असणे हे त्या गावाला अगदी साजेसे आहे. पण हे काही त्या गावाचे नाव असण्यामागचे मूळ कारण नाही. ज्या ब्रिटिश अधिकाऱ्याने हे गाव वसवले त्याच्या नावावरून या गावाला हे नाव मिळाले. त्या आधिका-याचे नाव होते, चार्ल्स लॅमन्ट रॉबर्टसन (सी.एल. आर.) ग्लासफर्ड.

१७ मार्च १८३१ रोजी कुमाऊ प्रदेशातल्या अल्मोडामध्ये सी.एल.आर ग्लासफर्डचा जन्म झाला. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या बंगाल प्रांतातला इंजिनियर, जॉन ग्लासफर्ड आणि ऑलिव्ह ब्रिटन यांचा तो पहिला मुलगा. जॉन ग्लासफर्ड यांच्या एकूण ११ अपत्यांपैकी केवळ ४ अपत्ये जगली, याच्यावरून  तेव्हा भारतातला अर्भक मृत्यू दर किती जास्त होता याचा अंदाज येतो. स्वछतेची जाण व आरोग्याच्या पुरेश्या सुविधा उपलब्ध असलेल्या युरोपियनांना सुद्धा अश्या दुर्धर परिस्थितीला सामोरे जावे लागत होते; तिथे दारिद्र्यात व अज्ञानाच्या अंधःकारात खितपत पडलेल्या बहुसंख्य भारतीय समाजाची काय अवस्था असेल याची कल्पना करवत नाही.

आपला कथानायक चार्ल्स, युरोपातले आपले शिक्षण पूर्ण करून, १८४८ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या लष्करी सेवेत भरती होण्यासाठी मुंबईकडे रवाना झाला.  त्याला सातारा येथे १८ व्या नेटिव्ह इन्फंट्रीमध्ये दाखल करून घेण्यात आले. पुढे १८५० मध्ये पुण्याच्या पहिल्या बॉम्बे युरोपियन फ्यूसिलिअर्समध्ये त्याची रवानगी झाली. तिथे पुढची काही वर्षे चोख काम केल्यावर, त्याच्यातली तडफ लक्षात घेऊन १८५५ मध्ये, सातारा आणि धारवाड प्रांताच्या महसूल सर्वेक्षणाचे काम त्याच्यावर सोपवण्यात आले. या सर्वेक्षणाद्वारे दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक प्रांताचे भौगोलिक नकाशे तयार करण्याचे काम अगदी पहिल्यांदाच हाती घेतले जात होते. त्यापूर्वी या विशाल भूभागाचा शास्त्रशुद्ध भौगोलिक नकाशा व मोजमापे जगाला माहीत नव्हती.

हे काम सुरू झाले आणि लगेचच १८५७ च्या उठाव झाला. त्यावेळी संभाव्य धोका लक्षात घेऊन उठावाला थोपवण्यासाठी ब्रिटिश सैन्यातल्या अधिकाऱ्यांना संवेदनशील ठिकाणी पाठवण्यात आले. इतर काही अधिकारी आणि  सैन्याबरोबर ग्लासफर्डला पंजाबमधल्या मुलतान इथे पाठवले गेले. मुलतानमध्ये सप्टेंबर १८५८ पर्यंत परिस्थिती पूर्णतः शांत होती. पण जेव्हा तिथे  असलेल्या बंगाल नेटिव्ह इन्फंट्रीच्या ८२ आणि ८९ या  रेजिमेंट बरखास्त करण्याचे आदेश आले तेव्हा त्या रेजिमेंटमधल्या सैन्याने बंड केले आणि तोफखाना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. ग्लासफर्ड आणि इतर अधिका-यांनी तो डाव उधळून लावला व ते बंड शमवले.

बंडाचा बीमोड झाल्यानंतर, ग्लासफर्डने पुन्हा सर्वेक्षणात सामील होण्याची परवानगी मिळवली आणि ऑक्टोबर १८५८ ते १८६० दरम्यान त्याने रायचूर दोआब जिल्ह्यात सर्वेक्षणाचे काम पार पाडले. त्यानंतर त्याने नागपूर कमिशनमध्ये साहाय्यक आयुक्त पदासाठी अर्ज केला; आणि मे १८६० मध्ये मध्य प्रांताचा (‘सीपी व बेरार’) चीफ कमिशनर, कर्नल एलियट याचा साहाय्यक सचिव म्हणून नागपूर येथे तो रुजू झाला.

सप्टेंबर १८६० मध्ये, इंग्रजांनी निजामाशी केलेल्या नव्या करारानुसार हैदराबाद राज्याचा, गोदावरीच्या डाव्या तीरावरचा आदिवासीबहुल प्रदेश ब्रिटीश सरकारला कायमस्वरूपी देण्यात आला. हा नवीन प्रदेश मध्य प्रांतात सामाविष्ट केला गेला. निजामाच्या अधिकार्‍यांकडून या नव्या प्रांताचा कार्यभार घेण्याच्या कामी कर्नल एलियटने ग्लासफर्डला नेमले आणि त्यानुसार, २० ऑक्टोबर १८६० रोजी ग्लासफर्डने नागपूर सोडले.

गोदावरीच्या तीरावरील ‘दंडकारण्य’ म्हणून ओळखला जाणारा २०० मैलाचा हा प्रांत जंगली श्वापदांचा आणि आदिवासी जमातींचा प्रदेश होता. ग्लासफर्डने या भागाचा डेप्यूटी कमिशनर (जिल्हाधिकारी) म्हणून कार्यभार स्वीकारला. याच भागाला पुढे ‘बस्तर डिपेंडन्सी’ असे नाव देण्यात आले. ग्लासफर्डने आपले मुख्यालय सिरोंचा येथे स्थापन केले. तिथल्या किल्ल्याचे मजबूतीकरण करून पुढची आठ वर्षे त्याने या प्रांताचे प्रशासन सांभाळले. या प्रदीर्घ काळात त्याने इथल्या भौगोलिक तपशीलाचे दस्तावेजीकरण, जमीनदारी व्यवस्थेवर नियंत्रण, आदिवासी समाजाच्या नोंदी, सर्वेक्षण व चित्रण इत्यादी बहुमुल्य काम केले. बस्तरच्या दुर्गम जंगलाचे दस्तावेजीकरण सुद्धा त्याने केले, इथल्या किर्र घनदाट जंगलातल्या दुर्गम अभुजमाड प्रांतात शिरणारा ग्लासफर्ड हा पहिला युरोपियन होता. आदिवासी माडियांच्या देवांपासून ते तिथले भूगर्भशास्त्र, पिकांपासून ते पुरातन वास्तूंपर्यंत, शिवाय रेशीम किडे, आदिवासींची बोलीभाषा, आदिम वाद्ये, नरभक्षक वाघ, अजस्त्र मगरी, हिंस्र श्वापदे, स्वर्गीय नर्तक पक्षी आणि सारस क्रेन अश्या बहुसंख्य चित्रविचित्र नोंदी त्याच्या डायरीत आढळून येतात. ‘द ग्लासफर्ड फॅमिली १५५०-१९७२’ ‘सेंटर फॉर साऊथ एशियन स्टडीज, युनिव्हर्सिटी ऑफ केंब्रिज मध्ये आहे. अलेक ग्लासफर्डने ती १९७२ मध्ये कुडुंबाशी संबंधित सर्व कागदपत्रे तिथे सुरक्षित राखण्यासाठी दिली आहेत. मात्र ती डिजिटल स्वरूपात नसून प्रत्यक्ष पाहण्यासाठी तिथे उपलब्ध आहेत.

सिरोंचामधल्या अल्बाका तालुक्यात ग्लासफर्डला महापाषाणयुगीन संस्कृतीच्या शिलापेटीका आढळून आल्या, उत्सुकतेपोटी त्याने त्यांचे उत्खनन केले. उत्खननात सापडलेले अवशेष त्याने नागपूरला स्टिफन हिस्लॉपला परीक्षणाकरता पाठवले. मात्र या अवशेषांचे पुढे काय झाले हे माहीत नाही. हिस्लॉपकडच्या इतर अवशेषांप्रमाणेच त्याच्या मृत्यूनंतर ते गहाळ झाले असावेत. पुढे १८७२ ते १८७५ दरम्यान चांदा (विभाजनपूर्व चंद्रपूर) जिल्ह्याचा जिल्हाधिकारी असताना त्याने नागपूरजवळ काही शिलावर्तुळे शोधून काढल्याचा उल्लेख आढळतो. त्यामुळे आजही विदर्भातील बृहदश्म किंवा महापाषाणयुगीन संस्कृतीच्या आद्य अभ्यासकांमध्ये ग्लासफर्डचे नाव आवर्जून घेतले जाते.

ग्लासफर्डचा विवाह फेब्रुवारी १८७० मध्ये जेन कॉर्नवॉल हिच्याशी झाला होता. त्याला ‘अलेक्झांडर इंग्लिस रॉबर्टसन’ आणि ‘डंकन जॉन’ हे दोन मुलगे आणि ‘युफेमिया’ ही मुलगी अशी तीन मुले होती. १८७० मध्येच बैतूल येथे जन्मलेला अलेक्झांडर हा आपल्या वडलांच्या पावलावर पाऊल ठेवून ब्रिटिश सैन्यदलाच्या बॉम्बे स्टाफ कॉर्प्समध्ये भरती झाला. तो एक उत्त्तम शिकारी व चित्तथरारक शिकार-कथांचा नामवंत लेखक होता. त्याने आपल्या अनुभवांवर आधारीत ‘लिव्ह्ज फ्रॉम ॲन इंडियन जंगल’, ‘रायफल अँड रोमान्स इन दि इंडियन जंगल’, ‘स्केचेस ऑफ मन्चुरिअन बॅटलफिल्ड’ व ‘म्यूझिंग ऑफ ॲन ओल्ड शिकारी ही चार पुस्तके लिहिली. विख्यात शिकारकथा लेखक जिम कॉर्बेटच्या पूर्वसूरींमध्ये त्याचे नाव आवर्जून घेतले जाते.

१८७३ मध्ये माथेरान येथे जन्मलेला डंकन जॉन हा दुसरा मुलगा ब्रिटनमध्येच सैन्य दलात सामील झाला. तिथे तो ब्रिगेडिअर जनरल पदापर्यंत पोहोचला. दुर्दैवाने १२ नोव्हेंबर १९१६ रोजी पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान फ्रांसच्या भूमीवर फिअर्स इथे जर्मनीविरुद्ध लढताना तो गंभीररीत्या जखमी झाला. वेस्टर्न फ्रंटवरच्या या युद्धभूमीवरून उपचारासाठी स्ट्रेचरवरून नेत असताना १० तासांच्या प्रवासादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

१८७६ मध्ये जन्मलेल्या युफेमियाच्या पोटी पुढे १९०३ मध्ये इयान स्टिफन्सचा जन्म झाला. पत्रकारितेमध्ये शिरलेला स्टिफन्स पुढे कोलकाता येथून निघणाऱ्या ‘दि स्टेट्समन’ या इंग्रजी वृत्तपत्राचा मुख्य संपादक म्हणून नावारूपाला आला. भारतातल्या ब्रिटीश राजवटीविषयीच्या स्वतंत्र वार्तांकनाकरता आणि विशेषतः १९४३ मध्ये उदभवलेल्या बंगालच्या भयंकर दुष्काळाविषयीच्या निर्भय पत्रकारितेसाठी स्टिफन्स ओळखला जातो. बंगालच्या या अमानूष दुष्काळाने जवळपास ३० लाख लोकांचे प्राण घेतले. भारतीय इतिहासातला हा सर्वात भयंकर दुष्काळ म्हणून ओळखला जातो. वृत्तपत्रांवर बंदी आणून सरकारकडून मुस्कटदाबी होत असताना, सातत्याने या विषयाचा पाठपुरावा करून स्टिफन्सने ब्रिटिश सरकारवर टीकेची झोड उठवली. औपरोधिक संपादकीय लेख, गावोगावी हिंडून टिपलेल्या दुष्काळाच्या भयावह छायाचित्रांद्वारे या दुष्काळाचे गांभीर्य त्याने सरकारच्या लक्षात आणून दिले. ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये चर्चिलवर त्याबद्दल टीका झाली, आणि शेवटी त्याची परिणीती बचावकार्यामध्ये झाली.

स्टीफन्सच्या मृत्युप्रसंगी लिहिलेल्या मृत्युलेखात भारताचे नोबेल पारितोषिक विजेते ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन म्हणाले होते की – “ज्या उपखंडात इयान स्टीफन्सने आपल्या आयुष्याचा बराचसा भाग व्यतीत केला, त्या उपखंडात त्यांना केवळ एक महान संपादक म्हणूनच स्मरण केले जाऊ नये तर अशी व्यक्ती म्हणूनही स्मरण केले जावे की जिने आपल्या कठोर प्रयत्नांद्वारे बंगालमधील किमान लाखभर लोकांचे प्राण वाचविले.” एकूणच ग्लासफर्ड कुटुंबियांचे भारतीयांवर अनन्यसाधारण उपकार आहेत.

सी.एल. आर. ग्लासफर्डची शेवटची कारकीर्द हैदराबादमध्ये होती. तेथून १८८४ मध्ये मेजर-जनरल पदावरून तो निवृत्त झाला आणि तीन वर्षांनंतर अल्जियर्स येथे १४ मे १८८७ रोजी त्याचे निधन झाले. मूळच्या स्कॉटलंडच्या ग्लासफर्ड कुटुंबीयांनी भारताच्या घनदाट जंगलांमध्ये आपले आयुष्य काढले. स्कॉटलंड किंवा इंग्लंडच्या शहरी भागात स्थायिक होणे त्यांना शक्यच नव्हते. त्यामुळे हे कुटुंब पुढे व्यापक वनक्षेत्र असलेल्या ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले.  त्यानंतरही भारताच्या मध्य प्रांताशी (सेंट्रल प्रोव्हिन्सस) जुळलेली नाळ या कुटुंबीयांनी सदैव स्मरणात ठेवली आणि त्यामुळेच आपल्या पणजोबांच्या नावाने वसलेल्या गावाचा मागोवा घेत पीटर ग्लासफर्ड (८७), त्याची पत्नी जेनीफर हॅमंड (८३) व त्याची बहीण सुसेन ग्लासफर्ड (७७) हजारो मैलांचा प्रवास करत नोव्हेंबर २०१८ मध्ये ग्लासफर्डपेठा गावी पोहोचले. प्राणहिता नदीच्या पुराचा धोका ओळखून या गावाचे विस्थापन ग्लासफर्डने त्यावेळी केले होते. मौखिक परंपरेने ही हकीकत गावातल्या लोकांच्याआजही स्मरणात आहे. सिरोंचा या मुख्यालयातल्या जवळपास १६० वर्षापूर्वीच्या ग्लासफर्डच्या निवासस्थानी आता पोलीस स्टेशन आहे. ते पाहून ग्लासफर्ड कुटुंबियांना अगदी भरून आले. याखेरीज तिथल्या एका उंच जागेवर पूर्वीच्या पडझड झालेल्या दगडी चिऱ्यांचा वापर करून ग्लासफर्डने बांधलेले आणखी एक निवासस्थान होते तिथे आज सरकारी गेस्ट हाऊस झाल्याचे समजले.

प्रस्तुत लेखक संबंधित विषयावर संशोधन करीत असून ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ हा ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कारप्राप्त व ग्लासफर्डची पणती असलेल्या सुसेन ग्लासफर्ड हिच्या बरोबर ग्लासफर्ड परिवाराच्या नोंदींचे दस्तावेजीकरण करीत आहे.

– अमित भगत 8237211874 amit_264@yahoo.co.in
——————————————————————————————————

About Post Author

4 COMMENTS

 1. खूप interesting आहे हे. ब्रिटिशांच्या खाणाखुणा अनेक क्षेत्रात अजूनही रुजून राहिल्या आहेत. काही प्रदेशांना ही त्यांची नावं गुंफण करुन नावं तयार झाली त्याचा मागोवा मस्तच

  • धन्यवाद मॕडम!
   यातील विस्मृतीत गेलेल्या खाणाखुणांचा मागोवा घेणे जिकरीचे वाटत असले तरी तितकेच अर्थपूर्ण व रंजक असल्याचे शेवटी जाणवते.

 2. अप्रतिम माहिती. त्याकाळातील अधिकारी व्यक्तींचे आयुष्य जणू हाती घेतलेल्या कार्याला वाहिलेले होते. किती आव्हाने, प्रचंड धोके ! ज्ञान, शौर्य, करुणा यांचे दर्शन झाले !

  • धन्यवाद!
   आपले म्हणणे अगदी यथार्थ आहे. त्या काळातील जीवनाचे व त्यातील चढ-उताराचे सजीव चित्रण डोळ्यांसमोर उभे राहिल्यावाचून राहत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here