रामनाथ थरवळ यांची ओळख ज्येष्ठ लेखक, कुशल संपादक आणि बालनाटककार अशी आहे. त्यांनी त्यांचे जीवन बालमनाच्या संवर्धनासाठी आणि बालनाट्याच्या समृद्धीसाठी समर्पित केले. त्यांना नाट्यविश्वात ‘महाराष्ट्राच्या बालनाट्याचे भीष्माचार्य’ म्हणून ओळखले जाते. थरवळ यांचा जन्म 20 नोव्हेंबर 1951 रोजी झाला. त्यांच्या वडिलांची नोकरी मुंबईत होती आणि आई-वडील दोघेही तेथे स्थायिक होते. मात्र, रामनाथ शिक्षणासाठी मामाच्या घरी आबलोली येथे राहिले. रामनाथ यांनी इयत्ता सहावीपर्यंतचे शिक्षण आबलोलीतच पूर्ण केले. त्याच काळात त्यांच्या मनात कोकणातील नमन, दशावतार यांसारख्या लोककला रुजल्या. ते गावातील हौशी नाटकांमध्ये सक्रिय सहभाग घेत असत. त्यामुळे त्यांच्या मनात रंगभूमीबद्दल आकर्षण निर्माण झाले आणि कलाक्षेत्राची गोडी वाढली. शाडूच्या गणपतीच्या मूर्ती घडवणे आणि रंगवणे ही त्यांची आवडती कामे होती. त्यांना गावातील खेळ, पारंपरिक गोष्टी, बोलीभाषा आणि पाठांतर यामुळे शैक्षणिक यश उत्तम मिळाले. त्यांच्या जडणघडणीचा पाया आबलोलीतच घातला गेला.
ते सहावीनंतर पुढील शिक्षणासाठी मुंबईत आई-वडिलांकडे आले. रामनाथ यांनी मुंबईतील गिरगाव परिसरात असलेल्या मराठा हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि मॅट्रिकची परीक्षा 1970 साली दिली. त्यांनी शालेय आणि सामाजिक कार्यक्रमांत, विशेषतः नाटकांमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली. आई-वडिलांनीही त्यांना त्यासाठी पाठिंबा दिला. त्यांची ओळख रेखा सबनीस यांच्याशी झाली. रामनाथ हे रेखा सबनीस यांच्या नाट्यगटात सामील झाले. प्रायोगिक रंगभूमीवर सबनीस यांचे नाव आदराने घेतले जाई.
रामनाथ यांना बालनाट्याच्या क्षेत्रात पहिली संधी सुलभा देशपांडे यांच्या सहकार्याने मिळाली. त्यांच्या कलाप्रवासाचे बरेचसे श्रेय ते देशपांडे यांना देतात. सुलभा देशपांडे यांनी मराठी रंगभूमीवर बालनाट्याला महत्त्वाचा दर्जा मिळवून दिला. त्यांच्या मते, नाटक हे केवळ मुलांचे मनोरंजन करणारे नव्हे, तर त्यांच्या कल्पनाशक्तीला आणि विचारक्षमतेला दिशा देणारे प्रभावी माध्यम आहे. रामनाथ यांनी देशपांडे यांचा हा विचार पुढे नेला. त्यांना श्रीराम लागू, वंदना गुप्ते, लक्ष्मीकांत बेर्डे यांसारख्या मान्यवर कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. तसेच, विजया मेहता यांच्याकडून प्रायोगिक रंगमंचाचे धडे घेता आले.
त्यांनी मॅट्रिकनंतर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश घेतला, तेथे त्यांना दामू केंकरे हे गुरू म्हणून लाभले. त्यांनी जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून पदवी 1974 साली संपादन केली. त्यामुळे त्यांच्या कलाविष्काराला ठोस आणि वैचारिक आधार मिळाला. बालपणातील संस्कार, मुंबईतील रंगभूमीवरील अनुभव आणि जे.जे.मधील कलाशिक्षण यांच्या प्रभावामुळे रामनाथ यांचा कलात्मक प्रवास अधिकाधिक समृद्ध होत गेला.

रामनाथ यांच्याकडे जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून बाहेर पडल्यानंतर एक संधी चालून आली- हिंदी चित्रपट दिग्दर्शक गोविंद निहलानी यांच्या ‘आक्रोश’ या चित्रपटासाठी जाहिरात डिझाईनचे काम करण्याची. ते सिनेसृष्टीत रामनाथ यांचे पहिले पाऊल होते. मात्र, त्यांच्या मनात खोलवर रुजलेले स्वप्न होते ते बालनाट्याच्या क्षेत्रातील कार्याचे. रामनाथ यांनी मुंबई येथील बालभवन या संस्थेत 1980 साली कार्य सुरू केले. बालभवन संस्था मुलांमधील सुप्त कलागुणांना योग्य दिशा देण्यासाठी आणि प्रत्येक मुलामधील सर्जनशीलतेला आकार देण्यासाठी विविध कलाक्षेत्रांतील प्रशिक्षण व संधी प्रदान करत असे. रामनाथ यांनी दहा वर्षे, 1990 पर्यंत तेथे काम केले आणि मराठीतून आंतरशालेय नाट्यवाचन स्पर्धा सुरू केली. संस्थेतर्फे बालनाटिका, शास्त्रीय नृत्य, समूह नृत्य, संगीत व अभिनय यांसारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे हजारो मुलांना व्यासपीठ मिळाले. थरवळ यांनी त्याच काळात सुरू केलेल्या आंतरशालेय नाट्यवाचन स्पर्धा विशेष गाजल्या. त्या उपक्रमांमुळे मुलांमध्ये शिस्त, सहकार्याची भावना आणि आत्मभान विकसित होण्यास मदत झाली. थरवळ यांचा हा कार्यकाळ बालभवनच्या वाटचालीतील महत्त्वाचा आणि प्रेरणादायी अध्याय ठरला.
रामनाथ थरवळ यांनी 1990 मध्ये एका नव्या पर्वात प्रवेश केला. त्यांना अभिनेते शशी कपूर यांनी पृथ्वी थिएटरमध्ये कार्य करण्यासाठी आमंत्रित केले. ती संधी म्हणजे त्यांच्या कलात्मक प्रवासाला मिळालेली महत्त्वपूर्ण पुष्टी होती. त्यांनी 2007 पर्यंत, म्हणजे तब्बल सतरा वर्षे पृथ्वी थिएटरच्या परिवाराचा अविभाज्य भाग म्हणून कार्य केले. त्यांच्या कामाचा केंद्रबिंदू बालनाट्य आणि मुलांच्या कलागुणांचा विकास हाच राहिला. मात्र, तेथे त्यांच्या कार्याला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली. त्यांना पृथ्वी थिएटरमध्ये स्वतःचे कलागुण विशेष पद्धतीने खुलवता आले आणि त्यांच्या प्रतिभेचा सन्मानही सढळ हस्ते केला गेला. रामनाथ थरवळ यांना शशी कपूर यांच्याबद्दल विशेष आदर आहे. शशी कपूर यांची व्यावसायिकता आणि कलाकारांप्रती असलेला स्नेहभाव थरवळ यांच्या मनात खोलवर रुजलेला आहे. रामनाथ यांची पृथ्वी थिएटरमध्ये ओळख जया बच्चन, गुलझार, एम.एफ. हुसेन, करण सिप्पी, पद्मिनी कोल्हापुरे अशा अनेक दिग्गज कलावंतांशी झाली आणि त्यांनीही थरवळ यांच्या कार्याची मनःपूर्वक दखल घेतली.

त्यांची नाट्यसाधना त्याच काळात ‘अभिव्यक्ती’, ‘आविष्कार’, ‘रूपवेध’ आणि ‘थिएटर युनिट’ या संस्थांमधूनही सतत घडत गेली. त्यांनी ‘कलाघर’ या संस्थेची स्थापना केली आणि तब्बल एकेचाळीस वर्षे त्या संस्थेचे संचालक म्हणून कार्य केले. ‘कलाघर’च्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कला संचालनालयाचे संचालक कमलाकर सोनटक्के प्रमुख पाहुणे म्हणून आणि प्रख्यात साहित्यिक विजय तेंडुलकर उपस्थित होते. रामनाथ थरवळ यांनी ठाण्यात स्वतःची अभिनय कार्यशाळा 1995 साली सुरू केली. ते वयाच्या पंच्याहत्तरीतदेखील ते काम अव्याहतपणे करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनातून विद्या बालन, सुमित राघवन, गौतमी कपूर, उमेश कामत, किशोरी शहाणे, निशिगंधा वाड, पल्लवी वाघ-केळकर, विशाखा सुभेदार, पंकज विष्णू आणि सचिन पाटील यांसारखे नामवंत कलाकार घडले आहेत.
रामनाथ यांची नाट्यसेवा ही त्यांच्या निष्ठा, त्यांची संवेदनशीलता आणि कल्पकता यांचा उत्कृष्ट नमुना आहे. त्यांचे नाट्यलेखन आत्मीयतेने भरलेले असून बालमनाशी थेट संवाद साधणारे आहे. त्यांना मुलांची भाषा समजते, म्हणूनच त्यांचे लेखन मुलांच्या भावविश्वाला भिडते. त्यांनी पन्नासहून अधिक नाटकांचे दिग्दर्शन केले असून, अनेक कथा, कविता, नाटिका आणि संशोधनपर लेखनही केले आहे. रामनाथ थरवळ यांचा ‘शादी एक गधे की’, ‘साम्राज्य’, ‘खजिन्याची विहिर’, ‘कॉल मी कॅप्टन रॉबर्ट’, ‘आक्रोश’, ‘टेस्ट ट्यूब बेबी’, ‘कुरूप बदकाची गोष्ट’, ‘लालची’, ‘झगडापूर’, ‘चकोट चकडू’, ‘बदमाश कही का’, ‘बाहुलीचा खून’ या आणि अशा अनेक कलाकृतींमध्ये सक्रिय सहभाग राहिला आहे. त्यांनी मराठीबरोबरच हिंदी बालसाहित्यातही मोलाचे योगदान दिले आहे. शिवाय, त्यांनी अमेरिकेतील शिकागो आणि सिएटल या शहरांमध्येही नाट्य कार्यशाळा आयोजित केल्या आहेत.

रामनाथ हे जसे लेखक आहेत, तसेच ते कुशल संपादक आणि प्रकाशकही आहेत. बालसाहित्याला स्वतंत्र व्यासपीठ मिळावे आणि बालमनावर सकारात्मक संस्कार व्हावेत, या उद्देशाने त्यांनी मुलांसाठी ‘ढिश्याव ढिश्याव’ या मासिकाचे संपादन दहा वर्षे केले. त्यांनी आकाशवाणी आणि दूरदर्शनसाठीही अनेक कार्यक्रमांचे दिग्दर्शन केले. आकाशवाणीवरील आंतरभारतीय मराठी ‘मुखवटेवाला’ या नाटकाला पहिला पुरस्कार प्राप्त झाला. रामनाथ थरवळ यांना नाट्यदर्पण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांचा कोकणस्थ वैश्य समाजातर्फे गौरव-सत्कार करण्यात आला, तर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते त्यांच्या बालनाट्य कारकीर्दीसाठी राज्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘कलाश्रम’ संस्थेने त्यांना ‘अव्वल’ पुरस्कार देऊन गौरवले. महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत त्यांच्या ‘खजिन्याची विहीर’ या नाटकाला चार राज्य पुरस्कार प्राप्त झाले. तसेच ‘ढिश्याव ढिश्याव’ या त्यांच्या बालमासिकाला बारा राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
रामनाथ थरवळ हे केवळ एक नाटककार व लेखक-संपादक नाहीत, तर बालमनाचे सच्चे मार्गदर्शक आहेत. त्यांच्या लेखणीतून प्रकट होणाऱ्या मूल्यांमधून, संस्कारांमधून आणि भावनांमधून संपूर्ण पिढी घडलेली आहे. त्यांचे बालसाहित्य मुलांच्या मनाचा नेमका ठाव घेत; त्यांना विचारप्रवृत्त करते. त्यांच्या कार्यामुळे मराठी बालविश्व सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध झाले आहे. ते सध्या मुलांसाठी शाळेवर अॅनिमेशन फिल्म तयार करत आहेत.
रामनाथ थरवळ 9821330963 ramnaththarwal@gmail.com
– गिरीश घाटे 9820146432 ghategp@gmail.com
————————————————————————————————-



