अच्युत पालव - सुलेखनाची पालखी


अच्युत पालव याने भारतात सर्वत्र आणि इतर अनेक देशांत देवनागरी सुलेखनाची पालखी नेऊन पोचवली आहे. अच्युतचा ध्यास भारतीय अक्षरलेखन कला भौगोलिक सीमा ओलांडून विश्वव्यापी व्हावी हा आहे. तो केवळ दौरे करून थांबत नाही; तो आपल्या कलेच्या विकासासाठी सर्वकाळ गर्क असतो. त्याचे कलेतील प्रयोग सतत चालू असतात.

अच्युतच्या कलाकारकिर्दीला पंचवीस वर्षे झाली तेव्हा त्याने भारतभर ‘कॅलिग्राफी रोडवेज’ हा उपक्रम राबवला. तो यशस्वी झाला. त्याचे वेगवेगळ्या राज्यांतील कलाकारांशी वैचारिक आदानप्रदान झाले. तो अनुभवसमृध्द झाला. त्याच्या कलेची व्याप्ती वाढली. त्याच्या ह्या भ्रमंतीमध्ये, काही राज्यांत सुलेखनकलेविषयी बिलकुल ज्ञान नाही ही बाब उघडकीस आली. अच्युतमुळे तिथे जागृती निर्माण झाली. त्यामुळेच सुलेखनाबद्दल जागृती हा अच्युतचा ध्यास बनला.

अच्युतला ‘पेंण्टिमेंट इंटरनॅशनल अॅकॅडमी फॉर आर्ट अॅण्ड डिझाइन’ ह्या हॅम्बुर्ग (जर्मनी) येथील संस्थेने प्रथम 1991मध्ये निमंत्रित केले. त्यांनतर त्याची जर्मनीला फेरी जवळजवळ प्रत्येक वर्षी असते. सुलेखनाविषयी कार्यशाळा हा प्रमुख उद्देश. तेथील उपक्रमात ज्येष्ठ नागरिकही उत्साहाने सहभागी होतात. त्याच्या 1991मधील पहिल्या दौर्‍यात त्र्याहत्तर वर्षांची महिला देवनागरी हस्ताक्षरकला शिकायला येत होती! असा उत्साह!

जर्मनीतील सुलेखनकार वर्नर स्नायडर आणि अच्युत ह्यांनी इंग्लंड आणि हॉलंडमध्ये प्रदर्शने मांडली आहेत. रशियासारख्या प्रगत देशात सुलेखनकलेची अधोगती होते ह्याची जाणीव तेथील कलाकारांना आणि संस्थांना होऊ लागली. नॅशनल युनियन ऑफ कॅलिग्राफर्स आणि एम.व्ही.के. एक्झिबिशन कंपनी ह्या तेथील दोन संस्थांनी पुढाकार घेऊन प्रदर्शन आणि प्रात्यक्षिकांचे आयोजन केले. त्यासाठी एकवीस देशांतील कलाकारांना आमंत्रित केले होते. भारतातून अच्युतचा समावेश झाला होता. त्याने तेथे ‘सुलेखनाचे सौंदर्यशास्त्र’ ह्या विषयावर सादरीकरण केले. त्याने हे सादरीकरण मराठीतून केले!

मुंबई-परळच्या शिरोडकर शाळेतील फलकलेखन, सर जेजे कला महाविद्यालयातील सुलेखनक्षेत्राचे अध्वर्यू र.कृ.जोशी ह्यांचा प्रभाव, उल्का जाहिरात कंपनीतील मोडी लिपीवरील संशोधन असे टप्पे पार करत अच्युत पुढे गेला आणि पुढे जातच आहे. पालव म्हणजे ‘वन मॅन कॉलिग्राफी मिशन’ झाले आहे.

अच्युत हा अक्षरांना चित्ररूप देणारा कलाकार. त्याने रेषा आखली की तिची अक्षरे होतात. लयदार, झोकदार, वळणदार, डौलदार! हातातील लेखणी म्हणजे मेंदू आणि आत्मा ह्यांचे दृश्यरूप आहे अशी अच्युतची धारणा आहे. त्याने काढलेली अक्षरे मुक्‍त नसतात, त्यांना रंगरूप असते, ध्वनी असतो. ती हितगुज करतात.

तो लता हा शब्द लिहितो, तेव्हा त्या अक्षरांतून संगीत व्यक्त होते. त्यात प्रवाह आहे. स्वयंस्फूर्ती आहे. त्यातून उमलत्या फुलाचा, वेलीचा आणि सूराचा भास होतो. लता मंगेशकरांचे वर्णन करायला हजारो शब्द अपुरे पडतात. ते सर्व अच्युतने फक्त दोन अक्षरांत केले.

स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या ‘माँ तुझे सलाम’ ह्या कॅसेटवरील शीर्षकाचे डिझाइन अच्युतचे. त्या अक्षरांतील जोष, ताकद आणि कंपन ह्यांतून देशप्रेम व्यक्त होतेच; शिवाय, आईविषयी वाटणारी आपुलकी आणि मायाही व्यक्त होते.

काळाबरोबर अच्युतचे कल्पनाचातुर्य आकाशाच्या दिशेने झेप घेत आहे. लंडन येथील भारतीय विद्या भवनच्या कलादालनात 28 मे ते 5जून 2011 ह्या कालावधीत झालेल्या प्रदर्शनात अच्युतने एकतीस चित्रे मांडली. चित्रे कॅनव्हासवर आहेत. पण त्यांना चित्रचौकट नाही. ऐतिहासिक काळातील खलित्याप्रमाणे वरच्या आणि खालच्या बाजूला आडवे बांबू आहेत. खलित्याप्रमाणे बांबू गुंडाळून घडी करता येईल. जणू भारतीय कलाक्षेत्राला ब्रिटनच्या कलाक्षेत्राने पाठवलेला तो खलिता म्हणायचा!

अच्युतच्या सुलेखनातील अक्षरांकन आणि प्रयोगात्मक कला ह्यांचा संगम हे वैशिष्ट्य आहे. ‘द पाथ ऑफ गोल’, ‘कुंडलिनी’, ‘आय अॅम’, ‘कालचक्र’, ‘मोक्ष’ ह्या चित्रमय सुलेखनातून अच्युत त्याला भासलेला विचार व्यक्त करतो. त्याचा प्रत्यय ‘सर्च’ ह्या चित्रातून येतो. त्यामध्ये भांबावलेपणा आहे पण त्यात वाट दिसते असा भास. आजच्या जीवनाचे प्रतीकच जणू! ‘बिंदू’ ह्या चित्रात आत्म्याचे मुक्त होणे दाखवले आहे.

अच्युत पालव यांनी सुलेखनाचा वापर करून ‘डिफरण्ट स्ट्रोक २०११’ ही दैनंदिनी तयार केली आहे. प्रत्येक दिवसाला एक पान, प्रत्येक पानावर एक विचार देण्यात आला असून, आकडे आणि महिन्यांसाठी खास सुलेखन त्यांनी केले आहे. प्रत्येक पानावर वॉटरमार्क असून त्याशिवाय अच्युत पालव यांची सोळा रंगीत अक्षरचित्रे हे दैनंदिनीचे खास वैशिष्ट्य आहे. डायरीएवढेच तिचे विशेष पॅकेजिंग हेही एक वैशिष्ट्य आहे. पालव यांनी यापूर्वी मोडी लिपी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत रामदास यांच्या वचनांचा वापर करून तयार केलेल्या दैनंदिनींना उत्कृष्ट प्रतिसाद लाभला होता. सुलेखनकलेचा वापर करून तयार करण्यात आलेली दैनंदिनी अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावी या उद्देशाने ती इंग्रजीत तयार करण्यात आली आहे. ती महाराष्ट्र बुक मॅन्युफॅक्चरिंगने प्रकाशित केली आहे.

ज्ञानेश्वर, तुकाराम आणि रामदास ह्यांचे अभंग कल्पकतेने सादर करणार्‍या अच्युतने लंडनच्या प्रदर्शनासाठी भगवदगीतेच्या काही श्लोकांपासून स्फूर्ती घेतली आहे. ‘द डिव्हाइन कनेक्शन’, ‘कर्म’ आणि ‘धर्म’ ही त्याची ठळक उदाहरणे नमूद करता येतील.

अच्युतच्या कर्तृत्वाचा आलेख उंचावत असताना त्याने ही कला नव्या पिढीकडे पोचावी म्हणून 2009 मध्ये ‘अच्युत पालव स्कूल ऑफ कॅलिग्राफी’ ची नव्या मुंबईमध्ये स्थापना केली आहे.

सुलेखनकलेला भाषा आणि भौगोलिक मर्यादा असूनसुध्दा अच्युतने देवनागरी अक्षरांमधून त्या भेदल्या व ही लिपी सुलेखनातून जगभर मांडली. तिच्याबद्दल व एकूणच सुलेखनाबद्दल औत्सुक्य निर्माण केले. कलेची महती अशा वेळी जाणवते, वाढते.

अच्युतचे व्यक्तिमत्त्व जिव्हाळा लावणारे आहे. तो कोणत्याही समुदायात येऊन सरळ मिसळू शकतो आणि लगेच हा भलाथोरला कागद समोर मांडून ब्रशचे फटकारे मारू लागतो. त्यामधून अक्षरकला सादर होते. ही अच्युतची जादू आणि तीच त्याची मेहनत. पुढे तो एका सेकंदात प्रेक्षकांना विश्वासात घेतो व हे कलाकाम त्यांनाही साधू शकेल याची जाणीव उमलवून टाकतो.

त्याने सुलेखन केले, अफाट प्रयोग केले. जसराज (गायन), भवानीशंकर (मृदंगम), राहुल शर्मा (संतुर), सुनीता राव (गायन), आरती परांजपे (नृत्य) यांच्या समवेत संयुक्त प्रयोग करून त्या त्या कलेबरोबर सुलेखन सादर केले. तो उपक्रमच अपूर्व होता. त्याने अनेक प्रकाशने केली. त्याच्या दरवर्षीच्या ‘डायरी’ हा वार्षिक कुतूहलाचा भाग असतो. कलाक्षेत्रात त्यासाठीदेखील त्याचे नाव आहे.

अच्‍युत पालव यांनी एका कार्यक्रमात त्‍यांचा अनुभव व्‍यक्‍त केला होता. अर्धागवायू झालेल्या एका व्यक्तीने जगण्याची उमेदच सोडून दिली होती. त्यांच्या घरच्यांचीसुद्धा हीच स्थिती होती, पण संगीताच्या तालावर रंगांचे उडणारे ‘फर्राटे’ बघून त्यांच्या हाताची नष्ट झालेली संवेदना जागृत व्हायला सुरुवात झाली. पालव आणि ती व्यक्ती यांच्या प्रत्येक भेटीगणिक ती वाढत गेली आणि इतकी वाढली की, एके दिवशी त्या व्यक्तीने स्वत:च्या हाताने लिहिलेले शुभेच्छाकार्ड अच्युत पालवांना पाठवले. त्यावर लिहिले होते, ‘मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा’. हा आत्मविश्वास अच्युत पालवांना प्रत्येक व्यक्तीत रुजवायचा आहे.

पारंपरिक व अपारंपरिक पद्धतींचा वापर करून निर्मिलेल्या त्याच्या कृती अनेक मोठमोठ्या व्यक्तींच्या संग्रही आहेत. जर्मनीतील स्टीफंग व क्लिंग स्पोर या व मॉस्कोच्या कॅलिग्राफी संग्रहालयात त्याच्या कलाकृती पाहायला मिळतात.

त्याचे दौरे म्हणजे झंझावात असतो... तो आमजनांना व विशेषजनांना जिंकून घेतो. त्यामुळे त्याच्या उपक्रमांना प्रसिद्धीदेखील खूप मिळत असते. त्याचे सुलेखनकला वेड ‘सुलेखनवारी’त केव्हाच बदलून गेले आहे!

अच्युत पालव, palavachyut@gamil.com

आदिनाथ हरवंदे

लेखी अभिप्राय

Nice; lovely;Beautiful;

Shrikrishna Hi…13/02/2017

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.