थंड गोळ्याला चेतना


- अनिलकुमार भाटे

   समाजातल्या विचारवंतांनी एकत्र येऊन विचारविनिमय केला, चर्चा घडवल्‍या, तर त्यामधून काहीतरी चांगले आणि समाजोपयोगी असे निर्माण होण्‍याची शक्‍यता असते.. हे प्रत्यक्षात घडवून आणण्याकरता आज आपल्यापाशी इण्टरनेट हे जागतिक स्वरूपाचे व अत्यंत बलशाली असे साधन उपलब्ध आहे. हा एक नवा ‘चवाठा’ बनला आहे. याचा उपयोग करून असा विचारविनिमय घडवून आणण्याची कल्पना दिनकर गांगल यांनी अनेक वर्षांपूर्वी ‘मराठी विद्यापीठ’ या संकल्पनेद्वारे मांडली होती. सध्याचे प्रस्तुत थिंकमहाराष्ट्र वेबपोर्टल हे त्याचेच मूर्त स्वरूप आहे असे.

अनिलकुमार भाटे

     गेल्या कित्येक वर्षांत मराठी जन, भाषा, संस्कृती, समाजजीवन या कशामधेच नाव घेण्यासारखे काही घडवले गेले नाही असे शेखर साठे म्हणतात. पण प्रश्न येतो की यावर उपाय काय? आणि हे घडावे कसे?

     इतिहासात डोकावून पाहिले, तर न्यायमूर्ती रानडे यांच्याबद्दल असे म्हटले गेले, की – “सुमारे दीडशे वर्षांपूर्वी महाराष्ट्र हा एखाद्या थंड गोळ्यासारखा निर्जीव बनून पडून राहिला होता. पण न्यायमूर्ती रानड्यांनी त्याला उष्णता देऊन पुन्हा चालना दिली आणि त्याच्यामधे जिवंतपणाचे चैतन्य आणले.”

     दुर्देवाची बाब अशी, की आजमितीला आपल्यामध्ये न्यायमूर्ती रानड्यांच्या तोलामोलाचा कुणीही नेता अस्तित्वात नाही. मग हे व्हावे कसे? याला पर्याय एक असू शकतो, तो असा, की एका हिमालयाएवढ्या मोठ्या माणसाची उणीव लहान लहान डोंगरांएवढी अनेक माणसे भरून काढू शकतील, जर ती लहान का होईना, पण आपल्या परीने विद्वान असतील आणि जर ती एकत्र येऊ शकली आणि एकदिलाने कार्य करू शकली तर!

     समाजातल्या विचारवंतांनी एकत्र येऊन विचारविनिमय करावा, चर्चा घडवाव्यात, म्हणजे त्यामधून काहीतरी चांगले आणि समाजोपयोगी असे नक्की निर्माण होईल. हे प्रत्यक्षात घडवून आणण्याकरता आज आपल्यापाशी इण्टरनेट हे जागतिक स्वरूपाचे व अत्यंत बलशाली असे साधन उपलब्ध आहे. हा एक नवा ‘चवाठा’ बनला आहे. एवढंच, इण्टरनेट हा जो नवा चवाठा आपल्याला उपलब्ध झाला आहे, त्याचा उपयोग करून असा विचारविनिमय घडवून आणण्याची कल्पना दिनकर गांगल यांनी अनेक वर्षांपूर्वी ‘मराठी विद्यापीठ’ या संकल्पनेद्वारे मांडली होती. सध्याचे प्रस्तुत थिंकमहाराष्‍ट्र वेबपोर्टल हे त्याचेच मूर्त स्वरूप आहे असे मी मानतो.

     महत्त्वाचा मुद्दा असा की जेव्हा शेजारीपाजारी एकत्र जमून गप्पा मारतात, तेव्हा त्यांना फारसा अर्थ नसतो. ती फक्त वार्‍यावरची वरात असते. पण समाजातले बुद्धिवंत लोक जेव्हा एकत्र येऊन विचारविनिमय करतात, तो अर्थगर्भ असतो, महत्त्वाचा असतो.

     पण असा विचारविनिमय जर चवाठ्यावर घडला, तर तो इतर बुद्धिवंतांना देखील पाहता येतो आणि तेदेखील त्यामध्ये सहभागी होऊ शकतात. इतकेच नव्हे, तर असे अनेक बुद्धिवंत काय म्हणताहेत हे इतर सर्वसामान्य जनांना देखील पाहता येते आणि त्याहून अधिक महत्त्वाचा मुद्दा असा, की सर्वसामान्यांनी सुद्धा स्वत:ला बुद्धिवंतांच्यापेक्षा कमी लेखण्याचे कारण नाही. तेदेखील अशा चर्चेला प्रतिसाद देऊ शकतात आणि त्यांचा प्रतिसाद नक्कीच महत्त्वाचा असतो.

     पीठ म्हणजे संस्था. विद्यापीठ म्हणजे जिथे विद्या उत्पन्न केली जाते आणि शिकवली जाते, अशी संस्था. हा शब्द युनिव्हर्सिटी या शब्दाकरता मराठी प्रतिशब्द म्हणून आपण वापरतो. त्या दृष्टीनेदेखील मराठी विद्यापीठ हा शब्द अर्थपूर्ण आहे. असे मराठी जनांचे महाराष्ट्रातले समाजजीवन, संस्कृती, अर्थकारण आणि राजकारण सुध्दा या सर्वांचा वैश्विक (युनिव्हर्सल) विचारविनिमय करणारे, आणि त्याद्वारे एखाद्या युनिव्हर्सिटीप्रमाणे ‘सामाजिक विद्ये’ची निर्मिती करून ‘समाजशिक्षण’ करू शकणारे पीठ या चवाठ्याच्या रूपाने अस्तित्वात यावे, हीच यामागची अपेक्षा आहे.

     तेव्हा आपण सर्वांनी या ‘थिंकमहाराष्ट्र’चा प्रचार आणि प्रसार करायला मदत केली पाहिजे आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांना या चवाठ्यावर आणायला हवे.   

डॉ.अनिलकुमार भाटे- निवृत्त प्राध्यापक, विद्युत अभियांत्रिकी, संगणक विज्ञान, माहिती तंत्रविज्ञान व मॅनेजमेण्ट एडिसन शहर, न्यू जर्सी राज्य, अमेरिका, इमेल -  anilbhate1@hotmail.com

{jcomments on}

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.