बनारसचे मराठी


एके काळी काशीत मराठी माणसाचा दबदबा होता. दुर्गाघाट, रामघाट या भागांत त्यांची वस्ती होती. 1977 सालची गोष्ट. आम्ही चार दिवस काशीत मुक्काम टाकला होता. दशग्रंथी वेदपाठी ब्राह्मण म्हणून काशीच्या देवबंधूंची पंचक्रोशीत वट होती. ते सतत कामात व्यस्त असल्याने त्यांना भेटणे शक्य नसे. आम्हाला सारा दिवस मोकळा असल्याने सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सकाळ-संध्याकाळी नावेतून गंगेत फिरणे हा, गल्ल्यांतून फिरण्याशिवाय आणखी एक उद्योग होता. श्रीराम नावाचा एक तरुण नावाडी आम्हाला सकाळ-संध्याकाळी नावेतून गंगाकिना-यांनी फिरवून आणत असे. एका सफरीचे तो पाच रूपये घेई. त्याचा फोटो काढला आणि सांगितले, की आम्ही तुला पाठवून देऊ. तेव्हा तो म्हणाला, 'आजवर अनेकांनी माझे फोटो काढले, पण कोणी पाठवलेला नाही.' मी त्याला सांगितले, की मी पाठवीन. घरी परतल्यावर मी त्याला फोटो पाठवला. मी एक्याऐंशी साली पुन्हा गेलो तेव्हा त्याने मला ओळखले आणि म्हणाला, ''आपने दिया हुवा फोटो मैने फ्रेम करके घरमे लगाया है''

जुन्या नाशकातल्या किंवा दिल्लीतल्या गल्ल्या पाहिल्या असल्या तरी काशीच्या पंचक्रोशीत भटकले की मेंदूतले सगळे तंतू पिंजून टाकले जातात. काशी म्हणजे अजबनगर आहे. तिला पर्याय नाही. असे नगर झाले नाही आणि होणारही नाही. अजून बरेच पाहायचे बाकी आहे. कबीर चौ-यात जाऊन तबला ऐकायचा आहे. ठुमरी ऐकायची आहे. माया बांबुरकर नावाची नऊ वर्षाची मुलगी आम्हाला जुनी काशी दाखवायला येत होती. अनेक गल्ल्या पालथ्या घालत होतो. भटकणे हा मुख्य उद्योग होता.
 

एका गल्लीतून जाताना सतारीचा आवाज ऐकला, म्हणून दगडी जिना चढून वर गेलो. समोर दिसलेल्या गृहस्थाशी हिंदीत बोललो. त्यांना सांगितले, की सतारीचा मंजुळ आवाज ऐकला म्हणून आलो आहोत. मीही सतारीच्या मध्यमा परीक्षेला बसणार होतो. नंतर त्यांचे नाव विचारले. तर ते म्हणाले, 'मेरा नाम फडके है.' मग काय, बोलायला मोकळे झालो! नंतर कळले, की त्यांच्या पत्नीचे माहेर पेठ्यांकडचे आहे. त्या इंदूरजवळच्या धार संस्थानातल्या आहेत. एका क्षणात दोन्ही कुटुंबांच्या सतारी एकाच मंजुळ सुरात निनादायला लागल्या. सगळेच ऐसपैस झालो. मुलगी सतार वाजवणा-या मुलींच्यात जाऊन बसली. आईच्या कडेवरचा मुलगा इतक्या सगळ्या सतारी पाहून खूष झाला. तो कडेवरून उतरून बहिणीजवळ जाऊन बसला.
 

फडके एमए बीएड असून महाविद्यालयात इंग्रजी शिकवत आणि वडिलोपार्जित हौस म्हणून सतार शिकवत. ते सांगत होते, की काही वर्षांपूवी काशीत ब्राह्मणांची पाच हजार घरे होती. आता जेमतेम पाचशे असतील. सर्वांनी पारंपरिक व्यवसाय सोडून दिलेत. सगळे आधुनिक इंग्रजी शिक्षण घेताहेत.
 

फडक्यांचे वडील गणपतराव हे बिस्मिल्लाखानांचे गुरू. त्यांनी खानसाहेबांची लयकारी पक्की केली. म्हणून म्हणावेसे वाटते, की शिक्षण कोणतेही घ्यावे, परंतु अभिजात संगीत किंवा साहित्य यांत रुची असेल तर जीवनात आनंद पसरतो. कारण ते बावनकशी असते. बाकी पैसे मिळवण्यासाठी पायलीला पन्नास ज्ञानशाखा उपलब्ध आहेत. फडके यांनी चहा पाजला. तासभर गप्पा झाल्यावर आम्ही निघालो, पण शेवटपर्यंत मी त्यांना सांगितले नाही, की मी सतारीच्या चौथ्या वर्षाला आहे! नाहीतर म्हणाले असते, 'चल, बस वाजवायला.'
 

आम्ही नाना फडणीसांचा विशाल वाडा पाहायला गेलो. तो पाहून कोणीही चाट पडेल. येथे चित्रे दिली आहेत.
 

बाजूच्या चित्रात नाना फडणीसांच्या वाड्यात पहिल्या मजल्यावर माझी पत्नी, तिच्या कडेवर मुलगा, त्याची मोठी बहीण तोंडात बोट घालून उभी आहेत. कडेवरचा मुलगाही वाडा पाहून चाट पडला असावा असे वाटते. नजर खिळवून ठेवणारा हा वाडा कोणी अमराठी विकत घेऊ पाहात होते. ती गोष्ट देव यांच्या कानी आली तेव्हा त्यांनी प्रख्यात उद्योजक चौगुले यांना पत्र पाठवून तो वाडा विकत घेण्याची विनंती केली. चौगुले देवांच्या परिचयाचे होते. ते नेहमी म्हणत, की 'गुरुजी, तुम्हाला काहीतरी दक्षिणा देण्याची इच्छा आहे पण तुम्ही तो विषय नेहमी टाळता'.
 

देवांनी चौगुल्यांना सांगितले, की तुम्ही मला बर्‍याच वर्षांपासून दक्षिणा देण्याची गोष्ट केलीत. आता नाना फडणीसांचा ऐतिहासिक वाडा विकत घेतलात, की मला दक्षिणा मिळाल्यासारखी आहे. चौगुल्यांनी तो वाडा विकत घेतला. तेव्हा सगळ्यांचा जीव भांडयात पडला. वाड्याची सध्या काय परिस्थिती आहे याची कल्पना नाही.
 

- प्रकाश पेठे

(छायाचित्रे - प्रकाश पेठे)
 

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.