वाढदिवशी पुस्तकांचा स्टॉल !


सध्या आपल्या समाजात ‘रिटर्न गिफ्ट’ ही नवीन संकल्पना रूढ होत चालली आहे. लग्नकार्यात ‘अहेर व पुष्पगुच्छ आणू नयेत’ असे आमंत्रणपत्रिकेत छापता येते, परंतु जेव्हा वाढदिवसासारखा घरगुती व जिव्हाळ्याचा कौटुंबिक कार्यक्रम असतो, अशा वेळी गिफ्ट नाकारतासुद्धा येत नाही. त्यामुळेच रिटर्न गिफ्ट ही नवीन संकल्पना उदयास आली असावी. नवीन संकल्पनेस इंग्रजी नाव दिले, की त्या गोष्टीला वजन प्राप्‍त होते असे आपण समजतो.

वाढदिवशी पुस्तकांचा स्टॉल !

- सुधीर दांडेकर

मला ११ ऑगस्ट २०१० रोजी  साठ वर्षे पूर्ण झाली. माझी धाकटी मेहुणी नंदिनी पाटणकर हिने १२ ऑगस्ट २०१० रोजी एकावन्नाव्या वर्षात पदार्पण केले. माझा साडू श्रीकांत भिडे, मेहुणी मीनल भिडे व माझी बायको मंजुश्री ही आमच्या कुटुंबातील उत्साही मंडळी. तसे सगळेच उत्साही आहेत, फक्त प्रत्येकाच्या उत्साहाची ठिकाणे (विषय) वेगवेगळी आहेत. मात्र दुसर्‍याच्या उत्साहात मनापासून साथ देण्याची सर्वांची वृत्ती असल्याने आमचे कौटुंबिक कार्यक्रम सर्वांना आनंद देऊन जातात.

श्रीकांत, मीनल व मंजुश्री ह्या त्रिमूर्तींने १५ ऑगस्ट २०१० रोजी माझा व नंदिनीचा वाढदिवस सर्व नातेवाईकांना बोलावून मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचा घाट घातला, परंतु मला ह्या गोष्टीचा सुगावा लागून दिला नाही. सगळ्यांना कार्यक्रमाचे आमंत्रण दिल्यावर मला ह्या कार्यक्रमाविषयी सांगण्यात आले. वरील कटात अनेक बायका सामिल असताना गुप्‍तता कशी राहिली हे एक कोडेच आहे! ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने, मी एका साप्‍ताहिकात लिहिलेल्या लेखांचे संकलन करून तेही पुस्तक माझ्या नकळत छापून मला आश्चर्याचा प्रचंड धक्का देण्यापर्यंत या गुप्‍ततेने उच्च पातळी गाठली होती! पण अशा रीतीने, माझे ‘मसाला ठोसा’ हे पहिले पुस्तक प्रसिद्ध होऊ शकले!  ह्या पुस्तकाचे प्रकाशन, प्रसिद्ध लेखक पतिपत्‍नी फिरोझ रानडे व प्रतिभा रानडे ह्यांच्या हस्ते त्या दिवशी झाले. रानडे पतिपत्‍नी मला सिनिअर असली तरी पुस्तकांच्या आवडीमुळे आमच्यात मैत्रीचे व स्नेहाचे नाते निर्माण झाले आहे.

दांडेकर यांच्या पुस्तकाचे फिरोज रानडे (उजवीकडे) व प्रतिभा रानडे यांच्या हस्ते प्रकाशनसध्या आपल्या समाजात ‘रिटर्न गिफ्ट’ ही नवीन संकल्पना रूढ होत चालली आहे. लग्नकार्यात ‘अहेर व पुष्पगुच्छ आणू नयेत’ असे आमंत्रणपत्रिकेत छापता येते, परंतु जेव्हा वाढदिवसासारखा घरगुती व जिव्हाळ्याचा कौटुंबिक कार्यक्रम असतो, अशा वेळी गिफ्ट नाकारतासुद्धा येत नाही. त्यामुळेच रिटर्न गिफ्ट ही नवीन संकल्पना उदयास आली असावी. नवीन संकल्पनेस इंग्रजी नाव दिले, की त्या गोष्टीला वजन प्राप्‍त होते असे आपण समजतो.

पुस्तके विकत घेणे व वाचणे हा माझा छंद आहे. लोकांनीही पुस्तके वाचावीत असे मला नेहमी वाटत असते. त्यामुळे ‘रिटर्न गिफ्ट’ काय द्यावे असा प्रश्न जेव्हा निघाला त्यावेळी आपण रिटर्न गिफ्ट म्हणून पुस्तके द्यावीत अशी कल्पना मी मांडली. त्यावेळी कोणाला कोणते पुस्तक आवडेल हे आपल्याला कसे कळणार हा बिनतोड मुद्दा उपस्थित झाला. माझ्या बायकोने ‘तुला आवडणारी पुस्तके इतरांना आवडण्याची शक्यता खूपच कमी आहे’ असा तिरकस बाणही मारला. मुद्दा बायकोने जरी उपस्थित केला असला तरी तो विचार करण्यासारखा होता! उपाय म्हणून तिथे पुस्तकाचा स्टॉल लावण्याची कल्पना पुढे आली. स्टॉलवर अनेक विषयांची लोकप्रिय पुस्तके ठेवली तर प्रत्येक जण आपापल्या आवडीची पुस्तके घेऊ शकेल. ही कल्पना सगळ्यांना आवडल्यामुळे कार्यक्रमात पुस्तकाचा स्टॉल लावण्याचे निश्चित केले.

राजहंस प्रकाशन हे माझे आवडते प्रकाशन. ह्या प्रकाशनाने अनेक ‘ऑफबिट’ विषयावर देखणी पुस्तके प्रसिद्ध केली आहेत. मी त्यांना वाढदिवसाच्या कार्यक्रमात पुस्तकांचा स्टॉल लावण्याची कल्पना सांगितली. त्यांनी ही कल्पना उचलून धरली. त्यांनी इतर प्रकाशनांची लोकप्रिय पुस्तके आणून स्टॉलवर ठेवण्याचीसुद्धा हमी घेतली. प्रत्येक व्यक्तीने आपल्या आवडीचे एक पुस्तक माझ्यातर्फे घ्यावे असे मी सांगितले होते. परंतु पुस्तक घेताना लोकांची होणारी द्विधा मनस्थिती पाहिली व त्यामुळे ‘आपल्याला आवडतील तेवढी पुस्तके माझ्यातर्फे भेट म्हणून घ्या’ असे आवाहन मी सर्व उपस्थित पाहुण्यांना केले. ह्या कार्यक्रमाच्या दोन तासांत सतरा हजार रुपयांची पुस्तके विकली गेली. आमच्या ड्रायव्हर्सनीसुद्धा ‘मित्र कसे जोडावे’, ‘मजेत कसे राहवे’ ही शिवराज गोर्ले ह्यांची पुस्तके घेतली. माझ्या मते, त्यांची पुस्तकांची निवड अगदी योग्य होती. पुस्तक वाचावे असे ड्रायव्हर्सना वाटावे ही गोष्टच मोठी स्फूर्तिदायक आहे.

माझ्या पुस्तक स्टॉलच्या संकल्पनेबद्दल सर्वसाधारण प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे होत्या:

१. पुस्तके हाताळून, बघून ती घेण्यात खूप मजा आली.
२. किती दिवसांपासून मला हे पुस्तक मला घ्यायचे होते, पण वेळच मिळत नव्हता.

३. ह्या विषयावरसुद्धा पुस्तक निघाले आहे हे मला माहीतच नव्हते.

४. आमच्या भागात चांगला बुक स्टॉल नाही. दादरला येऊन पुस्तके घ्यायची तर गाडी पार्किंगला जागा मिळत नाही!
५. मनसोक्त, आरामात पुस्तके घेण्याचा आनंद काही औरच आहे.

मला ज्या गोष्टीवरून पुस्तकाचा स्टॉल लावावा ही कल्पना सुचली ती गोष्ट सांगून हे पुस्तकपुराण पुरे करतो.

ठाणे जिल्ह्यात जव्हार तालुका आदिवासी बहुसंख्य असलेला आहे. तिथे पुस्तक वाचणार्‍यांची संख्या अतिअल्प. मी एकदा जव्हारला गेलो असताना स्टेशनरी, वर्तमानपत्रे, पाठ्यपुस्तके विकणार्‍या दुकानापुढे एका खाटेवर माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम ह्यांचे अग्निपंख, विश्वास पाटील ह्यांच्या कादंबर्‍या व अशी अनेक प्रसिद्ध पुस्तके मांडून ठेवली होती. मी त्या दुकानदाराला विचारले, ‘काय हो! ही अशी पुस्तके इथे विकली जातात का?’ तेव्हा तो म्हणाला, की ‘जी पुस्तके वर्तमानपत्रे, मासिके ह्यातून नावाजली जातात, लोकांच्यात ज्या पुस्तकांविषयी चर्चा होते अशा पुस्तकांच्या दहा-दहा प्रतीसुद्धा विकल्या जातात’. मला आश्चर्यांचा धक्काच बसला. मी ह्या अनुभवातून काही निष्कर्ष काढले :

१. खेडेगावातील माणसालासुद्धा पुस्तक घ्यावेसे वाटते, पण त्याला संधी मिळत नाही. शहरातील माणूसपण ह्याला अपवाद नाही.
२. घेतलेले पुस्तक आपल्याला आवडेल का? अशी भीती प्रत्येकाला वाटत असते. त्यामुळे पुस्तकात नक्की काय आहे? हे कळल्याशिवाय किंवा कोणी शिफारस केल्याशिवाय माणूस पुस्तक घेत नाही.

३. पुस्तक विकत घेण्याची क्रिया ही सहजसुलभ असेल तर पुस्तक विकत घेतले जाते.
४. पुस्तक विकत घेताना मन स्वस्थ असेल, कुठेही जाण्याची घाई नसेल तरच पुस्तक विकत घेतले जाते.

आमच्या कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने लोक एकत्र आले होते. कुठेही जाण्याची घाई नव्हती. सहजपणे पुस्तके समोर ठेवली. बाकी काम आपोआप झाले !

- सुधीर दांडेकर, पालघर

भ्रमणध्वनी : 9823133768

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.