इंग्रजी भाषा - वाघिणीचे दूध? नव्हे,


इंग्रजी भाषेतच दलितोध्दार आहे असे नक्की करून दिल्लीजवळच्या बांकेगाव येथे इंग्रजी देवीचे देऊळ बांधले आहे आणि त्याला पहिली दोन लाख रुपयांची देणगी पुण्याचे नगरसेवक मिलिंद कांबळे यांनी दिली आहे.

इंग्रजी भाषा - वाघिणीचे दूध? नव्हे,
दलितांची देवता !

विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी इंग्रजीला वाघिणीचे दूध असे म्हटले होते. त्याला दीडशे वर्षं होत आली. दरम्यान इंग्रजी भाषेने सारे जग व्यापले. जागतिकीकरणानंतर इंग्रजी भाषेच्या महत्त्वाचा वेगळाच साक्षात्कार जगभर होत आहे. त्याचे प्रत्यंतर चीन, फिलिपाईन्स अशा देशांमध्ये येते. तेथील जनता झपाट्याने इंग्रजी शिकू पाहात आहे. चीनमधील नवी हकिगत अशी आहे, की सर्वसामान्य चिनीजनांना इंग्रजी आत्मसात करायची आहे. परंतु तेवढे शिक्षक तेथे नाहीत आणि इंग्रजी शिकणे खूप खर्चिक आहे. त्यामुळे चिनी लोकांनी नवाच उद्योग सुरू केला आहे. परदेशातून येणा-या पाहुण्यांना ते इंग्रजी शिकवण्याच्या अटीवर घरी मोफत राहायला देतात! याला टूर बोर्डिंग असे नवीन नाव त्यांनी दिले आहे.

लॉर्ड मेकॉले आणि त्यांचे विचार..भारतातही इंग्रजी शाळांना लोकप्रियता लाभत असल्याचे आपण पाहतो. परंतु दिल्लीजवळचे इशकुमार गंगानिया आणि बंगलोरजवळचे चंद्रभान प्रसाद या दोघांनी इंग्रजी भाषेतच दलितोध्दार आहे असे नक्की करून दिल्लीजवळच्या बांकेगाव येथे इंग्रजी देवीचे देऊळ बांधले आहे आणि त्याला पहिली दोन लाख रुपयांची देणगी पुण्याचे नगरसेवक मिलिंद कांबळे यांनी दिली आहे. ते दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इण्डस्ट्रिजचे अध्यक्ष आहेत.

इंग्रजीदेवीचा पुतळा; तो न्यू यॉर्कच्या ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’च्या पुतळ्यावर बेतला आहे.इशकुमार व चंद्रभान यांचे हे नुसते फॅड नाही. त्यांची त्या पाठीमागे भूमिका आहे. इशकुमार म्हणाले, की बाबासाहेब आंबेडकर इंग्रजी शिकले नसते तर ते परदेशी गेले नसते आणि ते परदेशी गेले नसते तर ते बाबासाहेब झाले नसते; त्यांनी आपल्याला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली नसती. म्हणून बाबासाहेबांची उंची गाठायची असेल तर इंग्रजी शिकणे अपरिहार्य आहे.

चंद्रभान प्रसाद हेही उच्चशिक्षित आहेत. इंग्रजीला देवतेचे रूप देण्याची कल्पना त्यांची. ते लॉर्ड मेकॉले यांना भारतीय आधुनिकतेचे पितामह मानतात. ते दरवर्षी २५ ऑक्टोबरला, मेकॉले यांच्या जन्मदिवशी इंग्रजी दिन साजरा करतात.

शिक्षण मातृभाषेतून हवे या मुद्याबाबत गेल्या शतकाच्या मध्यापासून सर्व शिक्षणतज्ज्ञांचे एकमत आहे. त्या संदर्भात मेकॉले यांच्यावर टीकाही केली जाते. मेकॉले यांचा 'मिनिट ऑन इंडियन एज्युकेशन' हा ब्रिटिश सरकारला सादर केलेला निबंध प्रसिध्द आहे. त्यावरून ब्रिटिश सरकारचे भारतातील शैक्षणिक धोरण ठरले गेले असे मानतात. त्यामधून भारतात इंग्रजी शिक्षित बाबू लोक तयार होत गेले (ब्राऊन साहेब) अशी धारणा आहे.

उलट,चंद्रभान प्रसाद यांना इंग्रजी शिकून लाभ झालेल्या लोकांबद्दल कौतुक आहे. ते या लोकांना मेकॉलेची मुले मानतात. दलितांचा उध्दार इंग्रजी भाषेतून होईल हा त्यांचा विश्वास पक्का आहे आणि त्यासाठी प्रत्येक दलिताने इंग्रजी हिरिरीने शिकले पाहिजे असे ते आग्रहाने सांगतात. त्यांच्या या मोहिमेतील चांगला भाग असा आहे, की ते लोकांनी स्वत: पुढाकार घेऊन काही करावे असे सांगत आहेत. आतापर्यंत सर्व पुढारी मंडळी पददलितांना त्यांचे कल्याण सरकारकडून व प्रस्थापितांकडून काय काय मिळवण्यात आहे हे सांगत. परंतु चंद्रभान यांच्या आवाहनात प्रथमच दलितांनी स्वत: काही करावे असे नमूद आहे. ते म्हणतात, की इंग्रजी देवी त्यांना हाका घालत आहे की मज प्रत या, मी तुम्हाला सामर्थ्य देईन!

मिलिंद कांबळे हे पुणे महापालिकेत भाजपचे नगरसेवक आहेत, ते स्वत: दिल्लीजवळच्या या उद्घाटन समारंभास हजर होते व तेथेच त्यांनी इंग्रजीदेवीच्या मंदिरास दोन लाख रुपयांची देणगी दिली. ते म्हणाले, की दलितांनी इंग्रजी शिकावे, त्यात त्यांचा उद्धार आहे यावर माझा विश्वास आहे. त्याच भावनेने मी या प्रकल्पास मदत केली. ती त्या देवळाच्या कामी यावी असे विशिष्ट काही माझ्या मनी नाही आणि तेथे व्यक्त झालेली मेकॉले यांच्याबद्दलची भूमिका वगैरे मी फारशी विचारात घेतलेली नाही.

('टाइम्स ऑफ इंडिया'तील डी. शाम बाबू यांच्या लेखनाआधारे. कांबळे यांची पुण्यातील मुलाखत श्रीकांत टिळक यांनी घेतली)

 

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.