संत श्रीकबीर जयंती

प्रतिनिधी 11/06/2010

संत श्रीकबीर हे उत्तर भारतातील श्रेष्ठ साक्षात्कारी संत. संत कबीर श्रीरामाचे निस्सीम भक्त होते. त्यांना लौकीक शिक्षण नव्हते. मात्र त्यांनी व्यक्त केलेली त्यांची विचारधारा व त्यांनी रचलेले दोहे यांतून आध्यात्मिक व्यक्तींना अंतर्मुख करण्याची क्षमता आहे. त्यांनी रचलेले काही भक्तिविषयक दोहे :

प्रेम बिना जो भक्ति है, सो निज दंभ विचार | उदर भरन के कारन, जन्म गवाइये सार|| - प्रेमाशिवाय केलेली भक्ती ही भक्ती नसून दंभ आहे. केवळ बाह्य उपचाराने भक्ती केल्यास त्या प्रदर्शनाला स्वार्थ म्हणतात. तो उपजीविकेसाठी केला जातो. खर्‍या भक्तीशिवाय सगळे काही व्यर्थ आहे.

भक्ती बिना नहि निस्तरै, लाख करै जो कोय | शब्द सनेही है रहै, घरको पहुंचे सोय || - भक्तीशिवाय उद्धार होणे असंभव आहे. कोणी लाखो प्रयत्न केले तरी भक्तीशिवाय सारे व्यर्थ आहे. जे जीव सद्गुरुप्रेमी आहेत, सत्य ज्ञानाचे आचरण करणारे आहेत ते फक्त त्यांचे ध्येय प्राप्त करू शकतात.

भक्ति निसैनी मुक्ति की, संत चढे सब धाय | जिन जिन मन आलस किया, जनम जनम पछिताय || - मुक्तीचे मूळ साधन भक्ती आहे. म्हणून साधू जन आणि ज्ञानी पुरुष त्या मुक्तीरूपी साधनावर धावत चढतात. तात्पर्य हे आहे, की जे लोक भक्तिसाधना करतात, परंतु आळस करतात, त्यांना अनेक जन्म पश्चाताप करावा लागतो. कारण ती संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही.

भक्ती भेष बहू अंतरा, जैसे धरनी आकाश | भक्त लीन गुरु चरण में, भेष जगत की आश || - भक्ती आणि वेष यांमध्ये इतके अंतर आहे जितके अंतर धरती आणि आकाश यांमध्ये आहे. भक्त नेहमी गुरुसेवेत मग्न राहतो. त्याला इतर कशाचा विचार करण्यास वेळ मिळत नाही. परंतु जो वेषधारी आहे म्हणजे जो भक्ती करण्याचे सोंग करत आहे, तोच त्याचे जीवन सांसारिक सुखामध्ये फिरत असताना दुसर्‍याला फसवत स्वत: व्यर्थ घालवत आहे.

भक्ती दुलैही गुरू न की, नहिं कायरता का काम | सीस उतारे हाथ सो, ताहि मीलै निजधाम || - गुरुभक्ती करणे अती कठीण कार्य आहे; ते डरपोकांचे काम नाही. ते पुरुषार्थाचे असे कार्य आहे, की जेव्हा आपल्या हातांनी आपले मस्तक कापून श्रीगुरुचरणांवर समर्पित करू तेव्हाच मोक्ष प्राप्त होईल.

भाव बिना नहि भक्ति जग, भक्ति बिना नहि भाव | भक्ति-भाव इक रूप हैं, दोऊ एक सुभाव || - भक्ती आणि भावाचे निरूपण करताना भावाशिवाय भक्ती नाही आणि निष्काम भक्तीशिवाय प्रेम होत नाही. भक्ती आणि भाव एकदुसर्‍यांना पूरक आहेत. अर्थात त्या दोघांत काही भेद नाही. त्यांचे गुण-लक्षण-स्वभाव एकसारखे आहेत.

भक्ति पंथ बहु कठिन, रति न चालै खोट | निराधार का खेल है, अधर धार की चोट || - भक्तिसाधना करणे खूपच कठीण आहे. त्या मार्गावर चालणार्‍याला नेहमी सावधान राहिले पाहिजे. कारण तो असा निराधार खेळ आहे, की जराशी जरी चूक झाली तर रसातळाला जाऊन, अनेक दु:ख झेलावी लागतात. त्यासाठी भक्तिसाधना करणार्‍या साधकाने असत्य, अभिमान, बेजबाबदारपणा, निष्काळजीपणा यांपासून दूर राहिले पाहिजे.

(‘ज्ञानेश्वरी स्वर्णिमा’वरून पुरुद्धृत)

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.