मतिमंदांची कलासाधना


‘विश्वास’चा अर्थ ‘ट्रस्ट’. अरविंद सुळे ह्यांच्या डोक्यात या शब्दाविषयीची जाणीव फार मोठी. ती अशी, की आपण ज्यांना मतिमंद म्हणतो त्या व्यक्ती/ती मुले मुळात हुशार असतात. परंतु डॉक्टर मंडळी मात्र त्यांच्या मेंदूत असणा-या कमतरतेविषयी बोलतात. “ही अशी मंडळी कुणावर तरी अवलंबून राहणार, त्यांची प्रगती होणार नाही,” ह्या अशा दृष्टिकोनामुळे ज्यांच्या त्यांच्या स्वत:च्या पालकांचेदेखील प्रोत्साहन मिळणे दुरापास्त होते. त्यामुळे अशा व्यक्ती निकामी होतात. सर्वत्र असणा-या अशा समजामुळे आणि विशेषत:, त्यांच्या स्वत:च्या पालकांना ह्या नकारात्मक विचारातून बाहेर काढण्यासाठी, आधी त्यांच्या हृदयात विश्वास  निर्माण केला पाहिजे. म्हणून सुळे ह्यांनी ‘विश्वास’ ह्या नावाचाच ट्रस्ट निर्माण केला!  सुळे म्हणतात, की “स्वत:च्या घरी जी जी कामे मुलांना करू दिली जात नाहीत ती ती कामे मुले इथे करतात. त्यांच्या मनामध्ये सकारात्मक विचार रूजवल्यामुळे मुले केर काढतात, सतरंज्यांच्या घड्या व्यवस्थित घालून त्या विशिष्ट जागेवर नेऊन ठेवतात. अशा पध्दतीची ही  कामे त्यांच्याकडून घरी पालक मंडळी करून घेत नाहीत. स्वत: पालकांनी मुलांच्या समजशक्तीबद्दल अविश्वास दाखवणे आम्हाला पटत नाही”.

ते म्हणतात, की ‘मतिमंद’ असा उल्लेख वारंवार करणे आम्हाला मान्य नाही. ‘विश्वास’ हे पाळणाघर नाही. आमची मुले स्वत: उसळी, सॅलड असे पदार्थ तयार करतात. त्यांनी तयार केलेले पदार्थ आम्ही त्यांनाच खायला देतो. त्यामुळे त्यांच्या ठायी आत्मविश्वास वाढायला मदत होते. लसूण सोलणे, वाल सोलणे ह्या क्रियांमुळे त्यांच्या बोटांची हालचाल नैसर्गिक रीतीने होऊ लागते.

सुळे म्हणाले, की ही मुले टॅलेंटेड असतात हे निश्चित. आम्ही हे सप्रमाण सिध्द करतो ते  आमच्या वर्धापन दिनी ! ही मुले त्यावेळी वीस-पंचवीस मिनिटांच्या एक-दोन नाटिका सादर करतात. त्यांचे पाठांतर पाहाल आणि त्यांच्या परस्परांच्या संवादांतला क्रम पाहाल, शिस्त पाहाल तर तुम्ही अवाक व्हाल. मग ही मुले मतिमंद कशी?

कांचन सोनटक्के यांच्या ‘नाट्यशाळा’ संस्थेच्या, अपंगांसाठी असलेल्या स्पर्धेत, मतिमंदांच्या गटात ठाणे केंद्रातून चार वर्षे ‘विश्वास’च्या मुलांनी पहिले बक्षीस, तसेच महाराष्ट्र पातळीवर अंतिम स्पर्धेत एकदा दुसरे पारितोषिक पटकावले होते. नंतर, आमची ‘शाळा’ नाही केवळ ट्रस्ट आहे., ह्या मुद्यावर आमच्या मुलांना ह्या स्पर्धेत कधीही भाग घेता आला नाही! हा सर्व विचार करता असताना, आम्ही एका मुद्यावर ठाम आहोत, ते म्हणजे ह्या मुलांना दया (सिम्पथी) नको. म्हणजे त्यांची प्रगती खुंटणार नाही!

सुळे यांनी सांगितले, की आम्ही इतर वैशिष्ट्यांसोबत आणखी एक वैशिष्ट्र्ये जपले आहे. ते म्हणजे आम्ही अठरा वर्षे वयापासूनची मुले/व्यक्ती घेतो. मुलांची संख्या एकवीस आहे.  बहुतेक सर्व मतिमंदांच्या संस्थांमध्ये सतरा वयानंतर प्रवेश दिला जात नाही. म्हणून आम्ही वाढत्या वयाचा विचार केला.

‘विश्वास' मध्ये इतर मदतनीस मंडळींसोबत शैलेश साळवी, नागराज तसेच चित्रकार रंजन जोशी, संजय भोईर यांच्यासारखी व्हिजन आणि आस्था असणारी मंडळी मुलांसाठी भरपूर मेहनत घेतात. संजय भोईर हे ‘चित्रलिपी’च्या माध्यमातून मुलांची कल्पनाशक्ती फुलवतात; तर रंजन जोशी हे चित्रकलेच्या माध्यमातून मुलांच्या डोक्यातले विचार बाहेर काढायला प्रयत्नशील असतात.

हत्ती हा हत्तीसारखाच काढला पाहिजे असे नाही. सर्वसाधारणपणे हत्ती काढताना तो स्थिर उभा असलेलाच काढतील. पण आमच्या मुलांनी तो चालणारा काढला. ह्याच प्रकारे, पाने काढताना ती हिरवीच काढली पाहिजेत असेही नाही.

मुलांची एकाग्रता ही सर्वसाधारण मुलांपेक्षा कितीतरी पट जास्त असते. डोळे बंद करून ओळखीची वस्तू काढणे, टेबल-खुर्ची काढणे, ओळखीची व्यक्ती रेखाटणे असे प्रयोग केले जातात. ओळखीची व्यक्ती चितारताना एकाने तर चक्क अरविंद सुळ्यांचा चेहरा काढला! चंद्र काळोखात असतो ना ? म्हणून एकाने काळोखात चंद्र काढला. तर एकाने दिवा काढून त्याखाली बशी ठेवली! ही  मोठी कलात्मकता झाली. त्यांच्या विचारशक्तीमधून त्यांची इमोशनल आणि सोशल वाढ यांना उत्तेजन देणे हे ‘विश्वास' ने  आपले कर्तव्य मानले आहे.

अशा ह्या मती गुंग करणा-या चित्रकार विद्यार्थी-विद्यार्थीनीनी रेखाटलेल्या चित्रांची ग्रीटिंग करून ती डॉ.वैशाली आणि डॉ.चंद्रशेखर दावीकर हे एका वेळेला सहा-साडेहजार हजार ग्रीटिंग्ज आधीच तयार करून घेतात.

' विश्वास'चे काम 1990 साली सुरू झाले. मतिमंदांच्या भविष्यकाळावर, त्याच्या सृजनशीलेवर अथक परिश्रम घेणा-या अरविंद सुळे नामक कलाकाराला, त्यांची पत्नी कॅन्सरचे निमित्त होऊन सोडून गेली.  ती असती तर ‘विश्वास’ला अधिक ‘श्वास’ मिळाला असता एवढे निश्चित !

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.