सावरकर आणि कानडी भाषा

प्रतिनिधी 18/01/2010

स्‍वातंत्र्यवीर सावरकरबेळगाव कर्नाटकात आहे. त्या मुद्यावर सीमा प्रश्न आजही जळत ठेवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातले राजकीय पक्ष करत असवात. निवडणुका जवळ आल्या, की बेळगावचे आंदोलन छेडले जाते. हे गेली पन्नास वर्षे चालू आहे. सीमा प्रश्न हा राजकीय पक्षांनी भातुकलीचा खेळ किंवा लुटूपुटूच्या लढाईचा विषय बनवला आहे.

हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न होताना दिसतो, पण प्रश्न सुटत नाही याचाच अर्थ, हा प्रश्न सुटावा अशी कोणाचीच इच्छा नसावी. त्यामुळे बेळगाव कधी काळी महाराष्ट्रात येईल हे मृगजळ वाटते.

कन्नड भाषिक बेळगाव महाराष्ट्राच्या हाती कधी पडू देणार नाहीत. त्यामागे कारणे तशीच आहेत. कर्नाटक राज्यात बेळगावइतका सुपीक, खनिज द्रव्यांनी समृध्द दुसरा जिल्हा नाही. अशा सोन्याच्या गोळ्याला कर्नाटक महाराष्ट्राच्या हाती देईल हे शक्य नाही. तसेच, बेळगावबाबत जी सावधानता कर्नाटक एकीकरणाच्या समर्थकांनी बाळगली आहे ती अतिशय कौतुकास्पद आहे.

शिवरामपंत परांजपे यांच्या अध्यक्षतेखाली चौदावे महाराष्ट्र साहित्य संमेलन १९२९ साली बेळगाव इथे भरवले गेले होते. त्या साहित्य संमेलनाला कर्नाटक एकीकरण समर्थकांनी विरोध केला व संमेलन भरू दिले जाणार नाही असा आग्रह धरला.

बेळगावात साहित्य संमेलन भरवायला विरोध करण्यामागे महत्त्वाचे कारण होते. कर्नाटक एकीकरण समर्थकांना अशी शंका होती, की ''उद्या बेळगावचा प्रश्न जर उपस्थित झाला तर बेळगाववर हक्क सांगण्यासाठी, बेळगावात भरलेल्या साहित्य संमेलनाचा आधार महाराष्ट्राकडून घेतला जाईल.'' अखेर, ते संमेलन झाले, ते एक तोडगा काढून.

''उद्या बेळगावचा प्रश्न उभा राहिला तर महाराष्ट्राकडून या साहित्य संमेलनाचा आधार बेळगाववर आपला हक्क सांगण्यासाठी केला जाणार नाही '' अशा आशयाचा कबुलीनामा कर्नाटक एकीकरण समर्थकांनी महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या संयोजकांकडून लिहून घेतला आणि ते साहित्य संमेलन पार पडले! या संमेलनाला आचार्य अत्रे, न.चिं.केळकर, महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार आदी मंडळी उपस्थित होती.

संमेलनाध्यक्ष शिवरामपंत परांजपे यांनी वादातील दोन्ही बाजूंच्या लोकांना फटकारले! शिवरामपंत म्हणाले,''आम्ही एखाद्या भाषेचा फाजील अभिमान न धरता, हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत एकच देश आहे असे मानतो. तेव्हा आपणही बेळगाव महाराष्ट्रात आहे, की कर्नाटकात आहे असले वाद उकरून न काढता देशाच्या लढ्यात सर्वांनी बरोबरीने भाग घ्यावा ही विनंती.'' हे विचार शिवरामपंतांच्या राष्ट्रीय विचारसरणीला साजेसे होते. स्वातंत्र्य मिळवण्यापूर्वी भाषावार प्रांतरचनेचा विषय वाढवून, अंतर्गत वाद माजवून आपली ताकद खर्च करू नये व स्वातंत्र्य मिळाल्यावर प्रांतरचना व प्रांताच्या सीमानिश्चितीचा कार्यक्रम हाती घ्यावा अशी ब-याच नेत्यांची इच्छा होती.

देशाच्या स्वातंत्र्यलढयात कर्नाटकाने सहभागी व्हावे असेही आवाहन शिवरामपंतांनी केले. भारतीय स्वातंत्र्यलढयात कर्नाटकाचा सहभाग विशेष असा नव्हता. गांधी युग १९२० साली अवतरल्यानंतर कर्नाटकात देशभक्तीची लाट पसरली.

सावरकर नुसतेच स्वातंत्र्यवीर नव्हते तर भाषाप्रभूही होते. भारताच्या ज्या ज्या प्रांतात सावरकर जात तिथे तिथे तिथल्या स्थानिक भाषेत भाषण करत असत. सावरकरांचे एकदा बेळगावात भाषण होते. तिथल्या लोकांनी त्यांना कानडीत भाषण करण्याची विनंती केली. अर्थात ''सावरकर बेळगावात कानडी भाषेत बोलले तर बेळगाववर कर्नाटकाला हक्क सांगण्यासाठी आधार मिळेल'' असाही विचार कर्नाटक एकीकरण समर्थकांच्या डोक्यात असावा, पण सावरकर असल्या आग्रहाला थोडेच बळी पडणार? सावरकरांनी मराठीत भाषण केले. त्यात ते म्हणाले,'' मी इथे आल्यावर कानडीत बोला असा आग्रह करण्यात आला, पण मी कानडीत बोलू कसा? मराठी माझी मातृभाषा आहे. म्हणून मी मराठीत बोलू शकतो. हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे म्हणून मी हिंदीत बोलू शकतो. आंग्लभाषाविभूषित असल्याने आंग्लभाषेत बोलू शकतो. मी अंदमानला असताना मला तिथे पंजाबी क्रांतिकारक भेटले म्हणून मी पंजाबी बोलू शकतो. तिथे मला बंगाली क्रांतिकारक भेटले म्हणून मी बंगाली बोलू शकतो. तिथे मला भोजपुरी क्रांतिकारक भेटले म्हणून मी भोजपुरी बोलू शकतो. पण तिथे मला एकही कानडी क्रांतिकारक भेटला नाही, म्हणून मी कानडी बोलू शकत नाही!''

सावरकर अभिवादन यात्रा

लेखी अभिप्राय

Exellent

Ramrao Raghuna…14/04/2016

Nice lines...

Manoj Mane30/04/2016

आपल्याकडे अनमोल माहितीचा खजिना आहे. आम्हाला खूप कामात येईल.

सुनिल पाटील11/06/2016

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.