हरामखोर हा शब्द माझ्याशिवाय कोणीही वापरायचा नाही !

हरामखोर हा शब्द माझ्याशिवाय कोणीही वापरायचा नाही !


अत्र्यांनी अग्रलेख लिहताना विरोधकांसाठी. चोर, डाकू, बदमाश, पाजी अशा स्वरुपाची विशेषणे मुक्तहस्ते वाटलेली आढळतात. त्या काळात, नाटककार विजय तेंडुलकर 'मराठा'मध्ये नोकरी करत होते. बातम्या लिहिताना कोणीतरी 'हरामखोर' या शब्दाचा वापर केला होता. अत्रे संतापले; तो शब्द विरोधकांसाठी वापरला म्हणून नाही तर अत्र्यांशिवाय अन्य कोणीतरी तो शब्द वापरला म्हणून! अत्र्यांनी संपादकीय विभागातल्या सगळ्यांना एकत्र बोलावले आणि, ''मी काय सांगतोय ते नीट ऐका आणि लक्षात ठेवा. हरामखोर हा शब्द माझ्याशिवाय कोणीही वापरायचा नाही. खबरदार तो शब्द तुमच्यापैकी कोणी वापरला तर !’’

ते ऐकून सगळेच बुचकळ्यात पडले. 'हरामखोर' या एकाच शब्दाबाबत अत्रे असे का म्हणाले? त्यांच्याशिवाय इतरांनी हा शब्द का वापरायचा नाही? जणू काही साहेबांनी 'हरामखोर' या शब्दाच्या वापराचे हक्क मिळवले आहेत! हे असे का? हरामखोर हाच शब्द का? तो एक मोठा इतिहास आहे. 'हरामखोर' या शब्दासाठी अत्रेसाहेबांवर अब्रुनुकसानीच्या चौदा फौजदारी फिर्यादी दाखल केल्या गेल्या होत्या. वृत्तपत्रसृष्टीत इतक्या फिर्यादी दाखल होणे हा एक उच्चांक होता.

आचार्य अत्रे पुणे नगरपालिकेत नगरपिता म्हणून आले. थोर साहित्यिक ह.ना.आपटे साहित्यसम्राट न.चिं.केळकर यांच्याप्रमाणे नगराध्यक्ष होण्याचा मान आपल्याला मिळावा असे त्यांना वाटत होते, पण तत्कालीन पक्षश्रेष्ठींच्या काही राजकीय निर्णयांमुळे ते होऊ शकले नाही. अखेर अत्र्यांना स्थायी समिती अध्यक्षपदावर समाधान मानावे लागले. स्थायी समिती अध्यक्षपद हे मानाचे पद नसून कामाचे आहे हे अत्र्यांनी दाखवून दिले. त्या काळात अनेक महत्त्वाची आणि लोकोपयोगी कामे त्यांनी केली.

पुढे काँग्रेसपक्षाचे नेतेपद त्यांच्याकडे राहिले. पोपटलाल शहा यांची अध्यक्षपदाची मुदत 1940 च्या मे अखेर संपली. त्यांनी अध्यक्षपदाचा राजिनामा द्यायचा आणि नव्या अध्यक्षांची निवड करायची असे ठरलेले होते.