ख (Kha)


_kha‘ख’ हे वर्णमालेतील एक अक्षर असले तरी ‘ख’ हा एकाक्षरी शब्दही आहे. ख म्हणजे आकाश. त्यावरून आकाशातील ग्रहांना खगोल आणि त्यांच्या अभ्यासाला खगोलशास्त्र असे म्हटले जाते. ‘ख’ म्हणजे आकाशात, ‘ग’ म्हणजे गमन करणारा असा तो खग (पक्षी). अनेक शब्द ‘ख’पासून तयार झाले आहेत. ज्याच्यातील ‘ख’ म्हणजे आकाश, ‘श’ म्हणजे शुभ असते तो शंख. आकाशात दिव्यासारखा चमकणारा खद्योत म्हणजे काजवा. खगंगा म्हणजे आकाशगंगा, खवल्ली म्हणजे आकाशवेल. खनगर (गंधर्वनगर), खस्थान (घरटे, ढोली), खद्रु:(चारोळी) तर खहर: म्हणजे शून्याने भागलेली संख्या (अनंत). त्याशिवाय ख शब्दाचे सूर्य, स्वर्ग, इंद्रिय, छिद्र, पोकळी, शून्य टिंब, जखम, कर्म, ब्रह्म, ज्ञान, शेत, अभ्रक आणि शहर असे अर्थ गीर्वाणलघुकोशात दिले आहेत.

मनुष्यशरीर पंचमहाभूतांनी बनलेले असते असे आयुर्वेदात सांगितले आहे. मानवी शरीरातील सूक्ष्म पोकळ्या म्हणजे स्रोतस. ती आकाशे महाभूताने व्यापलेली असतात. मानवी शरीराची दोन कान, दोन डोळे, दोन नाकपुड्या, तोंड, गुदद्वार आणि मूत्रद्वार ही नऊ द्वारे आहेत. ती द्वारेही आकाश महाभूताने व्यापलेली असतात. त्यांतील सर्वात मोठे आणि मुख्य ‘ख’ म्हणजे मुख किंवा तोंड; तर ‘ख’ शरीरात जेथे अजिबात नसते असा अवयव म्हणजे नख. शरीरातील या पोकळ्यांच्या अवस्थेवर शरीराची अवस्था अवलंबून असते. जेव्हा पोकळ्यांत दोष साठतात, त्यांच्यात अवरोध निर्माण होतो तेव्हा शरीर अस्वस्थ होते आणि व्याधी अवस्था निर्माण होते.

शब्दशोध सदरातील हे ही लेख वाचा - 
अक्षता
वागुर
फालतू

शरीरातील आकाश बिघडल्यामुळे रोग निर्माण होतात, म्हणून रोगाला दु:ख असे म्हटले जाते. शरीरातील सर्व स्रोतसे म्हणजेच आकाश महाभूत सुस्थितीत असेल तर आपण निरोगी अवस्था अनुभवतो. त्यालाच सुख असे म्हटले आहे. तसेच, शरीरातील त्रिदोषांची साम्यावस्था काल, आहार-विहार, वय अशा अनेक कारणांनी सतत बिघडत असते आणि त्यामुळे मनुष्य व्याधि अवस्था म्हणजेच दु:ख अनुभवत असतो. म्हणून सुख आणि दु:ख या दोन्ही गोष्टी ‘ख’ महाभूतावर अवलंबून असतात, हे खरे!

- उमेश करंबेळकर 982239081
umeshkarambelkar@yahoo.co.in

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.