सहावे साहित्य संमेलन – 1908


sahitya_sanmelanपुणे येथेच पुन्हा 1908 साली भरलेल्या सहाव्या साहित्य संमेलनाला मात्र, ग्रंथकार संमेलन याऐवजी लेखकांचे संमेलन म्हणून संबोधण्यात आले. पहिल्या पाच साहित्य संमेलनांना ग्रंथकारांचे संमेलन असे म्हटले गेले होते. सहाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारताचार्य चिंतामण विनायक वैद्य हे होते. ते इतिहासाचे व्यासंगी व साक्षेपी संशोधक म्हणून ओळखले जात. ते ज्ञानमार्गी प्रज्ञावंत, ललित लेखकही होते. त्यांनी केलेले महाभारताचे भाषांतर हे त्यांचे प्रचंड वाङ्मयीन कर्तृत्व म्हणून ओळखले जाते. म्हणूनच त्यांना भारताचार्य अशी पदवी मिळाली. लोकमान्य टिळक यांनी त्यांना भारताचार्य या मानाच्या पदवीने गौरवले.  वैद्य हे ‘दुर्दैवी रंगू’ ह्या त्यांच्या ऐतिहासिक कादंबरीमुळे गाजले. त्यांनी माहितीप्रचुर अनेक पुस्तकेही लिहिली. त्यांनी त्यांच्या संशोधक बुद्धीने रामायण-महाभारतासारख्या पौराणिक इतिहासाच्या अपरिचित भागांवर प्रकाश टाकला. त्यांनी ‘संयोजिता’ हे नाटकही लिहिलेले होते.

त्यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1861 रोजी कल्याण येथे झाला. त्यांचे मूळ घराणे कोकणातील वरसईचे. त्यांच्या आजोबांनी कल्याणला नवे मोठे घर बांधले आणि वैद्य कुटुंब कल्याणला स्थिरावले.  चिंतामणरावांचे शिक्षण कल्याण; तसेच, मुंबईच्या एल्‍फिन्स्टन स्कूल व एल्‍फिन्स्टन कॉलेज येथे झाले. ते मॅट्रिकच्या परीक्षेपासून एम ए पर्यंत पहिल्या वर्गात पहिले आले होते. त्यांनी ‘एम.ए.’ला गणित विषय घेऊन ‘चॅन्सेलर्स पदक’ मिळवले होते. त्यांनी पुढे कायद्याची पदवी मिळवली. त्यांचे वडील वकिली करत. चिंतामणराव यांनी कायद्याची परीक्षा पास झाल्यावर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे मुन्सफ म्हणून वर्ष-दीड वर्ष काम केले. पण ते त्या कामाला कंटाळून पुन्हा ठाणे येथेआले आणि त्यांनी वकिली सुरू केली. पण लगेचच त्यांची मध्यप्रदेशातील उज्जैन शहरात सेशन्स जज्ज म्हणून नेमणूक झाली. ती गोष्ट 1987 ची. त्यांना ग्वाल्हेर संस्थानात सरन्यायाधीश म्हणून बढती 1895 च्या दरम्यान मिळाली. पण त्यांना त्या पदाचा राजीनामा प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे द्यावा लागला (1905). तेव्हा त्यांचे वय अवघे पंचेचाळीस वर्षांचे होते. त्यांनी काही वर्षें काँग्रेसमध्ये काम केले. त्यांचा मुळशी सत्याग्रहात सहभाग होता. ते टिळक यांच्या राष्ट्रीय पक्षाकडे थोडा काळ ओढले गेले.

suresh_lotalikarएकूण प्रकाशित ग्रंथांची संख्या एकोणतीस (इंग्रजी 9 व मराठी 20) आहे. ते साहित्य संमेलनात अध्यक्षपदावरून म्हणाले, की “जुन्या वाङ्मयमंदिराची अधिष्ठात्री देवता होती ‘भगवद्भक्ती’, तर नव्या वाङ्मयीन मंदिराची अधिष्ठात्री देवता स्वदेशभक्ती आहे. या नव्या मंदिराचा पाया घातला विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी. प्रत्येक काळी एक प्रभावी भावना अथवा युगधर्म जनतेच्या हृदयसिंहासनावर अधिष्ठित असतो व त्या भावनेच्या छंदानुवर्तित्वाने शास्त्र, वाङ्मय व कला ह्या शाखाही त्यांचा संसार मांडत असतात. तो युगधर्म व त्याची अधिष्ठात्री देवता बदलली की नवे संप्रदाय उदयास येतात.” ते नाट्यसंमेलनाचे अध्यक्षही (1919 ) झाले. ते साहित्य व नाट्य दोन्ही संमेलनांचे अध्यक्ष होण्याचा मान मिळवणारे पहिले साहित्यिक आहेत. भारत इतिहास संशोधन मंडळाचे सुरुवातीपासून (1910) आजीव सदस्य व पुढे अध्यक्ष (1926-1934) होते. त्यांनी ‘टिळक महाराष्ट्र विद्यापीठा’चे पहिले कुलगुरूपद भूषवले (1922-34). नंतर ते त्याचे कुलपती (1934-38) होते. त्यांनी वैदिक संशोधन मंडळाच्या स्थापनेत ना.श्री. सोनटक्के यांना बहुमोल सहकार्य केले. ते टिळक विद्यापीठ आणि वैदिक संशोधन संस्था येथील शिकवत असत. त्यांचे निधन कल्याण येथे 20 एप्रिल 1938 साली झाले.

-वामन देशपांडे

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.