‘नॉ लिंग’ : रेवदंडा गावाजवळ सापडले दुर्मीळ भाषेचे धन


_korlai_gad_korlai_gaonकोरलई हे रायगड जिल्ह्यातील रेवदंड्याच्या खाडीच्या पलीकडे असणारे छोटेसे गाव. ते अलिबागपासून बावीस किलोमीटरवर आहे. ते रेवदंड्याच्या खाडीत घुसलेल्या भूभागावर वसलेले आहे. कोकण किनारपट्टीवर वसलेल्या कोठल्याही छोट्या गावासारख्याच खाणाखुणा अंगावर वागवणारे. शेती आणि मासेमारी हा तेथील मुख्य व्यवसाय. पण तेथील एक गोष्ट विशेष आहे - आणि ती एकमेवाद्वितीय आहे! ती म्हणजे तेथे बोलली जाणारी भाषा. ती भाषा त्या गावाव्यतिरिक्त जगात इतरत्र कोठेही बोलली जात नाही. 

वास्को-द-गामाच्या रूपाने पोर्तुगीजांची पावले 1498 साली भारतीय भूमीवर उमटली. पोर्तुगीजांनी त्यांचे वर्चस्व केरळच्या कालिकत बंदरापाठोपाठ गोवा, दीव-दमण; तसेच, वसई या ठिकाणी निर्माण केले. स्वाभाविकपणे, तेथे पोर्तुगीज चालीरीती, भाषा यांचा प्रभाव पडला. पोर्तुगीजांचे वर्चस्व त्या तीन प्रमुख वसाहतींसोबत चौल-रेवदंडा आणि कोरलई या भागावरही होते. पोर्तुगीजांनी चौलमध्ये 1505 साली प्रवेश केला. चौल हे प्राचीन काळापासून बंदर म्हणून प्रसिद्ध होते. त्यावेळी त्या भागात निजामाची सत्ता होती. निजामाकडून पोर्तुगीजांना चौलचा किल्ला बांधण्याची परवानगी मिळाली. स्वाभाविकपणे, पोर्तुगीजांचा वावर त्या भागात आणि कोरलई गावात सुरू झाला. त्याच वेळी पोर्तुगीजांनी चौलच्या बाजूला असणाऱ्या रेवदंड्याच्या खाडीपलीकडील टेकडीवरही तटबंदी बांधण्यास सुरुवात केली. त्यामुळे निजाम आणि पोर्तुगीज असा संघर्ष झाला. त्यानंतरच्या समझोत्यात कोरलईच्या टेकडीवर पोर्तुगीजांनी बांधकाम करू नये असे ठरले. परंतु बुर्हान निजामाच्या मृत्यूनंतर त्याचा उत्तराधिकारी ‘बुर्हान निजाम दुसरा’ याने कोरलईच्या टेकडीवर किल्ला बांधला. पोर्तुगीजांनी जोरदार हल्ला चढवत कोरलईचा किल्ला 1594 ला त्यांच्या ताब्यात घेतला. त्यामुळे त्यांना पलीकडच्या कोरलई टेकडीवरून खाडीतून चौलमध्ये शिरणाऱ्या जहाजांवर नजर ठेवणे सोपे जाणार होते. 

पोर्तुगीजांची वस्ती त्या भागामध्ये त्या सगळ्या घडामोडींदरम्यान होऊ लागली. त्यांचा संपर्क स्थानिक मराठी लोकांशी येऊ लागला. पोर्तुगीज आणि स्थानिक मराठी जनता यांच्यामध्ये संवाद सुरू झाला. पोर्तुगीजांना त्यांनी जबरदस्तीने गुलाम बनवलेल्या भारतीय समाजातील गुलामांसोबतही संभाषणाची निकड वाटू लागली. त्यातून एका नव्या भाषेचा उगम झाला! पोर्तुगीजांचे अस्तित्व त्या भागात दीडशेहून अधिक वर्षें होते. त्यामुळे नवी भाषा दृढ होत गेली. खरे आश्चर्य यात आहे, की पोर्तुगीज सैन्य मराठ्यांशी झालेल्या तहामुळे 1740 साली निघून गेले; तरीसुद्धा ती भाषा नंतरही जवळपास पावणेतीनशे वर्षें तशीच टिकून राहिलेली आहे! त्या काळात त्या भाषेचा प्रसार गावाबाहेरच काय पण गावाच्या अन्य भागातील ख्रिश्चनेतर समाजातही झाला नाही. त्यामुळे अन्यत्र त्या भाषेची दखल घेतली जाण्याचे कारणही नव्हते. 

कोरलईची क्रिओल ही विशिष्ट भाषा आहे. क्रिओलचा अर्थं दोन किंवा अधिक भाषांच्या मिश्रणातून विकसित झालेली स्वतंत्र भाषा. क्रिओल्सची निर्मिती युरोपीयन देशांमधून अन्य देशांमध्ये स्थापन झालेल्या वसाहतींमध्ये राज्यकर्ते झालेल्यांची भाषा आणि स्थानिकांची भाषा यांच्या मिश्रणातून अशा झाल्याचे दिसून येते. उदाहरणार्थ- मॉरिशसमध्ये फ्रेंच भाषेवर आधारित ‘मॉरिशियन क्रिओल’ किंवा जमेकामध्ये इंग्रजीवर आधारलेली ‘जमेकन क्रिओल’ निर्माण झाली. तशी ही ‘कोरलई क्रिओल पोर्तुगीज’.

कोरलईच्या या विशिष्ट भाषेचा उल्लेख The Manglore Magazine च्या 25 मे 1902 च्या अंकात आढळतो. त्याशिवाय त्या भाषेचा उल्लेख जर्मन पुरातत्त्वशास्त्रज्ञ Gritli von Mitterwallner लिखित चौलवरच्या संशोधनपर ग्रंथामध्येही (1964) आहे. परंतु त्या भाषेकडे जगाचे लक्ष जाण्यास 1983 साली लिस्बन येथे भरलेली ‘पोर्तुगीज भाषेची जगभरातील सद्यस्थिती’ या विषयावरील परिषद कारणीभूत ठरली. मूळचे कोरलई गावचे असणारे Mitterwallner यांना चौलविषयक संशोधनात सहाय्य करणारे जेरोम रोझारिओ यांनी त्या परिषदेमध्ये कोरलई क्रिओल भाषेमधील लोककथा सांगितली. क्रिओल भाषेला स्वतःची लिपी नाही. त्यामुळे रोझारिओ यांनी त्या भाषेतील कथा देवनागरी लिपीमध्ये लिहिल्या; रोमन लिपीमध्येही काही गोष्टी लिहिल्या गेल्या; परंतु देवनागरीत केलेले लिखाण मूळ उच्चारांच्या अधिक जवळ जाते.
अमेरिकेतील इंडियाना विद्यापीठातील प्राध्यापक जे. क्लँसी क्लेमेंत्स यांनी क्रिओल भाषेचा अभ्यास 1988 पासून केला आहे. ते कोरलई गावात येऊन राहिले. ते ती भाषा शिकले. त्यांनी ती भाषा बोलणाऱ्या भारतीय-_book_no_lingपोर्तुगीज मिश्रसंस्कृतीचा अभ्यास केला. त्यांनी त्या अभ्यासातून भाषेच्या निर्मितीचे विवेचन करणारा शोधनिबंध सादर केला. तो शोधनिबंध त्या भाषेची निर्मिती होण्याला आणि पोर्तुगीज सैन्य कोरलईमधून निघून गेल्यावरही ती भाषा टिकून राहण्याला कारणीभूत असणाऱ्या गुंतागुंतीच्या सामाजिक आणि वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक परिस्थितीवरही प्रकाश टाकतो. तो शोधनिबंध इंटरनेटवर उपलब्ध आहे. क्लेमेंत्स फक्त भाषानिर्मितीच्या अभ्यासावर थांबले नाहीत तर त्यांनी त्या भाषेचा शब्दसंग्रह, तिचे व्याकरण, वाक्यरचना, उच्चार- त्यातील पोर्तुगीज आणि मराठी या भाषांच्या सहभागाचे पृथःकरण असा विस्तृत अभ्यास केला आहे. तो प्रबंध The Genesis of a Language: The formation and development of Korlai Portuguese या नावाने प्रकाशित झाला आहे. तो अंशतः googleboooks.com वर उपलब्ध आहे. जे. क्लँसी क्लेमेंत्स यांनी त्या भाषेतील लोककथा एका पुस्तकात संकलित केल्या आहेत. त्यासाठी देवनागरी लिपी वापरली आहे. तो एक अतिशय महत्त्वाचा (आणि कदाचित त्या भाषेतील एकमेव) लिखित दस्तावेज आहे. त्यामुळे भाषा फक्त मौखिक न राहता लिखित स्वरूपातदेखील आली आहे. ‘नॉ लिंग सू इस्तॉर’ (आपल्या भाषेतील गोष्टी) असे त्या पुस्तकाचे नाव आहे. स्थानिक तसेच पोर्तुगीज संस्कृतीचे संदर्भ त्या कथांमध्ये विखुरलेले आहेत. जे. क्लँसी क्लेमेंत्स यांनी ‘गुलामांसोबत संवादा’च्या मुद्याला असलेले गुंतागुंतीचे बरेच कंगोरे उलगडून सांगितले आहेत.

पोर्तुगीजांनी कोरलई भागात स्थानिक उपेक्षित लोकांना गुलाम म्हणून वापरून घेण्यास सुरुवात झाली. त्यांतील बहुतांश मंडळी भारतीय समाजातील जातिव्यवस्थेच्या सर्वात खालच्या स्तरातील होती. पोर्तुगालमधून आलेले व लग्न न झालेले पोर्तुगीज सैनिक (ज्यांना सोल्डॅडोज म्हटले जाई) त्यांच्यासोबत अनेक गुलाम स्त्रिया बाळगत आणि त्यांच्याशी त्या सैनिकांचा शरीरसंबंध येत असे. त्यांपैकी काही सैनिक भारतीय स्त्रियांसोबत लग्न करून स्थायिक झाले (त्यांना कॅसॅडोज म्हटले जात असे). त्यांच्या पदरीदेखील स्त्री आणि पुरुष दोन्ही प्रकारचे गुलाम असत. सोल्डॅडोज आणि कॅसॅडोज यांच्या भारतीय गुलाम स्त्रियांसोबत येणाऱ्या संबंधांतून युरोपीय-भारतीय अशा मिश्र वर्णाची संतती निर्माण झाली. त्यांचे धर्मांतर केले गेले. त्यातून नव्या ख्रिस्ती धर्मांतरितांचा नवा समाजघटक तयार झाला. धर्मांतरित झालेल्या निम्न जातींतील समाजापुढे दुहेरी पेच उभा राहिला. मुळात त्यांना जातीच्या आधारावर वेगळे ठेवण्यात आले होते. परंतु ते धार्मिक बाबतीतही वेगळे गणले जाऊ लागले. त्यांना त्यांच्या जातीतील हिंदू आप्तदेखील पारखे झाले. तो समाजगट आणखी छोट्या कप्प्यामध्ये जगू लागला. ख्रिश्चन झाल्याने त्यांचा संबंध हिंदूंपेक्षा पोर्तुगीजांशी आणि पोर्तुगीज भाषेशी अधिक येऊ लागला. मात्र तो संपर्क शुद्ध पोर्तुगीज भाषेशी नव्हता. त्यात पोर्तुगीजांमधील सामाजिक स्तरांचाही वाटा होता. भारतात आलेल्या पोर्तुगीज ख्रिश्चनांमध्ये आई-वडील दोघेही युरोपीयन, वडील युरोपीयन व आई युरेशीयन, वडील युरोपीयन व आई भारतीय इत्यादी अनेक पातळ्यांवरील भेद होते. पोर्तुगीज पुरुष आणि त्याची स्थानिक भारतीय बायको/जोडीदारीण असाही एक स्तर निर्माण झाला. भारताच्या विशिष्ट जातीतून धर्मांतरित करून ख्रिश्चन केलेल्या लोकांच्या जातींवरून पोर्तुगीज ख्रिश्चनांमध्येही आणखी एक मोठी जातिव्यवस्था निर्माण झाली आहे. 

हे ही लेख वाचा -
वसई चर्चमधील घंटा हिंदू मंदिरांत! (Bells From Vasai church in Hindu Temples)
डॉ. द.बा. देवल – जीवनशैलीचा पाठ

पोर्तुगीज आणि स्थानिक स्त्रिया हे एकाच कुटुंबात समाविष्ट झाल्यामुळे त्या ठिकाणी भाषा व्यवहारापुरती न राहता ती कुटुंबव्यवहारातील भाषा म्हणून आकाराला येऊ लागली. ती भाषा पोर्तुगीज सैनिक आणि भारतीय स्त्री यांच्यापासून निर्माण झालेल्या संततीची मातृभाषा बनली. कोरलईची क्रिओल कोरलईबाहेर गेली नाही, कारण ते गाव खाडीमध्ये घुसलेल्या चिंचोळ्या जमिनीच्या एका पट्ट्यावर वसलेले आहे. त्याच्या आजूबाजूला किंवा सीमेला लागून एकही गाव नाही. रेवदंड्याच्या खाडीमुळे कोरलईचा थेट संपर्क जमिनीवरून रेवदंड्याशीसुद्धा नव्हता. ती भाषा जाती-धर्माच्या कुंपणामुळे कोरलईच्या अन्य समाजामध्येदेखील जाऊ शकली नाही. ती भाषा जगातील दुर्मीळ होत असलेल्या भाषांपैकी एक आहे. 

कोरलई भाषकांची वस्ती अरुंद गल्ल्यांची आहे. एका छोट्याशा चौकात एक मोठा क्रॉस उभा आहे. घरातच थाटलेली एक-दोन दुकाने आहेत. घरांच्या दारांवर अथवा दुकानांमध्ये क्रॉस अथवा येशूची प्रतिमा हटकून दिसते. एक दुकान असे दिसले, की ज्यावर चक्क स्वस्तिकाची खूण होती! मला आश्चर्य वाटले...
_korlai_ghareमी गावातील इग्नशस परेरा यांच्याशी बोललो. ते तेथेच जन्मले-वाढले. त्यांचे शिक्षण माऊंट कार्मेल शाळेच्या मराठी माध्यमातून झाले. तेथील चर्चमधील ‘मास’सुद्धा 1964 सालापासून मराठीत होतो. ते घरामध्ये मात्र कोरलई क्रिओल भाषा बोलतात. चर्चचे फादर मूळचे तेथील नाहीत. त्यांनाही कोरलई क्रिओल भाषा समजत नाही.
कोरलई किल्ल्याच्या टेकडीच्या दक्षिणेला डोंगर आहे. तो डोंगरउतार आणि कोरलईचा किल्ला असणारी टेकडी (जिला पोर्तुगीज ‘मोरो’ असे संबोधत) यांच्या दरम्यान कोरलई गाव पसरलेले आहे. तेथील माउंट कार्मेल चर्च 1741 मध्ये बांधले गेले.

पोर्तुगालला न जाता येथेच स्थायिक झालेल्या पोर्तुगीजांची त्या गावात सात प्रमुख घराणी आहेत : रोजारिओ, डिसूजा, परेरा, मार्तीस, रॉड्रिग, वेगास, रोचा, पेना आणि गोम्स. कालांतराने कारवार, गोवा आणि दीव-दमणमधूनही काही कुटुंबे तेथे स्थायिक झाली. ती सर्व मिळून सुमारे दोनशेतीस ख्रिश्चन घरांमधील सुमारे हजारेक माणसे ती भाषा बोलतात.  
जगाच्या ७.२ अब्ज लोकसंख्येपैकी फक्त एक हजार माणसे म्हणजे 0.001388888 % इतका छोटासा समूह कोरलई क्रिओल भाषा बोलतो. त्यावरून ती भाषा किती दुर्मीळ आहे याची कल्पना येईल. कोरलई क्रिओल इतकाच त्या गावातील हिंदू-मुस्लिम-ख्रिश्चन यांच्यातील सामंजस्य हाही त्यांच्या कुतूहलाचा विषय आहे.

तेथे ओळखीचे एक ख्रिश्चन गृहस्थ भेटले. ते म्हणाले, “बराच काळ बाकीच्या समाजातील (ख्रिश्चनेतर) लोक आमच्या संपर्कात फारसे आले नाहीत. जे आले त्यांनाही आमच्या भाषेबद्दल उत्सुकता वाटली नाही. फक्त त्या दुकानातील मारवाडी माणूस भाषा शिकला.” मी त्या दुकानात जाऊन त्याच्या तरुण मालकाशी गप्पा मारल्या. त्याचे नाव राकेश गांधी. तो म्हणाला, “माझा जन्म येथीलच. माझे शिक्षणही येथील माउंट कार्मेल शाळेमध्ये झाले. मी येथील मुलांमध्ये राहिलो, वाढलो. त्यामुळे स्वाभाविकच, मला आणि माझ्या सहा बहिणभावांना ती भाषा येते. माझ्या आईवडिलांनाही यायची, पण ते आता हयात नाहीत.” त्याचे बहिणभाऊ लग्न _prasad_phatakझाल्यामुळे किंवा कामानिमित्त इतरत्र स्थायिक झाले. त्यांचा त्या भाषेशी संपर्क, संबंध कमी कमी होत जाणार. राकेश स्वतःदेखील बायकामुलांना सोबत घेऊन खाडीपलीकडील रेवदंड्यात राहतो, फक्त त्याचे छोटेसे दुकान चालवण्यास तो दिवसभर तेथे असतो, म्हणून फक्त त्याचा त्या भाषेशी रोजचा संबंध येत असतो. शाळेतील मुले आपापसांत वर्गात बोलताना, एवढेच नाही तर भांडतानादेखील त्यांची मातृभाषा ‘कोरलई क्रिओल’च वापरतात.

मला गोऱ्या, तुकतुकीत कांतीच्या आणि राखाडी डोळ्यांच्या, स्थानिक पद्धतीची साडी नेसलेल्या आज्जी भेटल्या. गळ्यात क्रॉस होता. मी त्यांच्या डोळ्यांकडे पाहतच राहिलो. मग मला जाणवले, की अनेकांचे डोळे वेगळे आहेत. शिवाय, काहींची त्वचाही तुकतुकीत आहे. ती त्यांच्या एकेकाळच्या गोरेपणाची आठवण करून देते. सुमारे पाचशे वर्षांपूर्वी त्या भूमीवर पाय ठेवलेल्या त्यांच्या पूर्वजांच्या खाणाखुणा काळाच्या ओघामध्ये पुसट झालेल्या असल्या तरी नष्ट झालेल्या नाहीत.

- प्रसाद फाटक 9689942684
prasadgates@gmail.com
(मूळ प्रसिद्धी – भाषा आणि जीवन, पुणे)
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
‘कोरलई क्रिओल’ भाषेबाबत उत्सुकता म्हणून युट्यूबवर तीन-चार व्हिडिओ पाहिले. त्यातील दोन व्हिडिओमध्ये त्या भाषेचे तेथील मराठी भाषिकांना किंवा इतर लोकांना काहीच आश्चर्य नाही असे जाणवले. त्यांना ती पुढे जपावी किंवा जाणून घ्यावी असेही वाटत नाही. तेथे त्या भाषेचा विनोद केला जातो असा तेथील कोरलई भाषिकांचा उल्लेख आहे. - नेहा जाधव. 

‘कोरलई क्रिओल’ भाषेतील काही शब्दांचे मराठीत अर्थ –

काव काव आयले - पोलीस आले
_gandhi_marwadi-in_korlaiअग देगो - पाणी दे
मी नॉम - माझे नाव
उंत नवा - कोठे जाता
तुड - सगळे
करेन - कारण
क्रिआन्का - मुल-बाळ
पाज - वडिल, बाप
बरफ - बर्फ
ढोपा - ढोपर, गुडघा
बिर्मेल - लाल 
अॅन - वर्ष

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.