सत्तातुराणां न भय न लज्जा!

प्रतिनिधी 12/12/2019

satta_turanaकेंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र मार्च 2018 मध्ये सादर केले होते, त्यानुसार भारतात खासदार व आमदार यांची संख्या चार हजार आठशेशहाण्णव आहे व त्यांपैकी एक हजार सातशेपासष्ट खासदार-आमदारांविरूद्ध गुन्हेगारी स्वरूपाचे तीन हजार पंचेचाळीस खटले आहेत. एकूण दोनशेअठ्ठावीस खासदारांविरूद्ध गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यासाठी दिल्लीत दोन विशेष न्यायालयांची सोय करण्यात आलेली आहे.
जेव्हा सरकारने हे शपथपत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केले, तेव्हा आणखीही काही माहिती वर्तमानपत्रात आली. भारताच्या दहा राज्यांत प्रत्येकी पन्नासहून अधिक आमदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्या राज्यांची नावे अशी – आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तमिळनाडू, तेलंगण, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल. ही जुनी आकडेवारी झाली. त्यानंतर त्यांतील काही राज्यांत लोकसभेच्या निवडणुका झाल्या.

भारतीय लोकशाहीवर गुन्हेगारीचा एवढा मोठा आघात होऊनही या परिस्थितीसंबंधी वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर मथळे आले नाहीत किंवा टीव्हीवरील वाहिन्यांवरही चर्चेची गुऱ्हाळे दिसली नाहीत, की कोणा समाजमाध्यमांमध्ये तो चर्चेचा प्रमुख विषय बनला नाही.

अर्थात ‘गुन्हेगारीचे आरोप म्हणजे गुन्हेगारी’ असे सिद्ध होत नाही. त्यांतील काही खोटे असू शकतात, तरीही एक तृतीयांश खासदारांना व आमदारांना कलंक लागल्यासंदर्भातील शहानिशा केली जाण्यास हवी, ही सर्वात मोठी राष्ट्रीय गरज आहे हे जनतेला वाटत नाही. त्या उलट, नेत्याचे चारित्र्य कसेही असले तरी केवळ त्याच्या हातात सत्ता आहे म्हणून लोक त्याच्याभोवती पिंगा घालत असतात. जर गुन्हेगारीचा आरोप असलेले लोकप्रतिनिधी असणे हे लोकांना राष्ट्रीय संकट वाटत नाही तर सत्ताधीशांना व सत्तातुरांना भय किंवा लज्जा वाटण्याचे कारण नाही!

(संदीप वासलेकर यांच्या ‘सकाळ’- ‘सप्तरंग’ पुरवणीतील ‘एका दिशेचा शोध’ स्तंभावरून उद्धृत 7 एप्रिल 2019)

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
बलात्कार, तसे अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना तत्काळ शिक्षा वगैरे मुद्यांवर जोरदार चर्चा देशभर चालू आहे. महाराष्ट्रात सत्तास्थापनेचे जे नाट्य गेल्या दीड महिन्यांत घडून आले, त्याची चर्चा जनमानसात व व्यक्ती व्यक्तीच्या मनात आहे. रोजच्या विविध बातम्या याच अस्वस्थ करणाऱ्या असतात, काय खरे - काय खोटे असा संभ्रम क्षणोक्षणी होत असतो आणि मग सोय म्हणून जनता सर्वच गोष्टी डोळ्यांआड करते. उरते ती फक्त करमणूक! उगाच नाही सध्याच्या काळाला मनोरंजनाचे युग असे म्हटले जाते – जसे सत्ययुग, कलीयुग, द्वापारयुग, तसे मनोरंजनयुग! तशा काळातून जग व भारत सध्या जात आहे का? ही उदासीनता, अथवा जगण्यापासूनचा पलायनवाद पालटवण्याकरता ‘संभवामि युगे युगे’वाला कृष्णकन्हैय्या येणार आहे का? तर नाही. जनताच हा काळ पालटू शकते. तो लोकशाही स्वातंत्र्याचा मंत्र आहे!

-  संपादक, थिंक महाराष्ट्र डॉट कॉम

लेखी अभिप्राय

चिंतनपर लेख.

Purushottam M…19/12/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.