वणी येथील सप्तशृंगी देवी (Saptashrungi Devi)

Think Maharashtra 02/10/2019

_saptashrungi_deviमहाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या ‘वणी’ या गावाजवळील सप्तशृंगगडावरील देवीचे स्थान हे आदिशक्तीचे मूळ स्थान असून ते साडेतीन पीठांतील अर्धपीठ आहे असे म्हटले आहे.

एकपीठ ते तुळजापूर । द्वितीय पीठ ते माहूर | तृतीय पीठ ते कोल्हापूर । अर्धपीठ सप्तशृंगी।।

ॐकारातील म कार पूर्ण रूप ही आदिमाया मानली जाते. तीच सप्तशृंगी देवी. ती देवी अठरा हातांची असून आठ फूट उंचीची आहे. ती खूपच भव्य आहे. तिच्या हातात अठरा शस्त्रे व साधने - कमळ, बाण, वज्र, चक्र, त्रिशूळ, तलवार, मणिमाला, कुऱ्हाड, गदा, ढाल; यांसोबत पाश, शक्ती, शंख, घंटा, दंड, धनुष्य, पानपात्र, कमंडलू - आहेत. देवीचे प्रखर तेज डोळ्यांत न मावणारे आहे. तिला अकरा वारी साडी, रोज एका विशिष्ट रंगाची अशी आठवडाभर नेसवली जाते. तिच्या चोळीसाठी तीन खण वापरले जातात. तिला तिच्या गळ्यातील मंगळसूत्र, नाकातील नथ, कानातील कर्णफुले आदी अलंकारही शोभून दिसतात. वणी येथील देवीच्या दर्शनासाठी आलेले काही उपासक नासिकच्या पंचगंगा, रामकुंड, येथील ‘पवित्र’ जल घेऊन येतात व ते देवीच्या मंगलस्नान अभिषेकासाठी वापरतात.

तिच्या पराक्रमाची, तिने महिषासूर व चंडमुंड अशा असुरांच्या केलेल्या वधाची आणि तिच्या अमाप शक्तिसामर्थ्याची वीरगाथा तिच्या सिंहारूढ होऊन रूप धरिले महाचंड हो । वधुनी महिषासूर मर्दियले चंडमुंड हो ।। या आरतीतून गायली जाते. 

अपराध सहस्त्र भाजनं पतितं देवी भवानी भूतले । अगदि शरणागतं शिवे कृपया देहि पदेषु देहि मां ।। असा तिच्या स्तोत्राचा प्रारंभ आहे. ते सप्तशृंगगडावर सकाळ-सायंकाळ गायले जाते; सायंकाळी, आरतीच्या वेळी, दुर्गासप्तशतीतील शक्रादिस्तुतीच्या चौथ्या अध्यायाचे पठन होते. त्या सोबत श्रीमद्शंकराचार्यरचित ‘अपराधक्षमापन' स्तोत्रही म्हटले जाते. सप्तशृंगगडवासिनी संत ज्ञानेश्वरांची कुलदेवता आहे. सोळाव्या शतकातील संतकवी त्र्यंबकराज यांना तिने प्रकाशज्ञान दिले, म्हणून त्यांनी सप्तशृंगगडावर येऊन तिचे अखंड ध्यान केले. समर्थ रामदास स्वामींनी रचलेला ‘ज्वालामुखी ते अंबिका । सप्तशृंगीची चंडिका ’ हे स्तोत्र तीर्थावली दंडीगाण (दंडी हे वाद्य घेऊन फिरणार्‍या, गोसाव्यांची एक जमात) यात सापडते. सप्तशृंगी देवी माता | चरणी ठाव देई आता । असे मागणेही भक्तांकडून मागितले जाते. 

महाराष्ट्र-गुजरात यांच्या सीमेवरील सह्याद्री पर्वतरांगांमधील सप्तशृंग तथा वणीचा डोंगर निसर्गरम्य आहे. तेथे पूर्वी घनदाट वनराई होती. त्या ठिकाणी वसलेल्या गावाला वणी म्हणतात. ते नासिकपासून उत्तरेला केवळ पासष्ट किलोमीटर अंतरावर आहे. गिरिजा नदीचा उगम त्या डोंगरातून आहे. मार्कंडेय ऋषींची तपस्या त्याच डोंगरावर झाली. त्यांना आदिशक्ती जगदंबा प्रसन्न झाल्याने त्यांनीच त्या ठिकाणी देवीची स्थापना केली. त्या डोंगराला सात शिखरे आहेत. ती सात सुळ्यांची मालिका काहीशी धनुष्याच्या आकाराची आहे. तेथील गडाच्या पायथ्याशी साडेतीनशेहून अधिक वर्षांपूर्वीपासून असलेले जगदंबा मंदिर प्रसिद्ध आहे. तेथील देवीची मूर्ती सप्तशृंगी मातेच्या प्रतिरूपात पाहण्यास मिळते. सप्तशृंगी मातेच्या दर्शनानंतर जगदंबा मातेचे दर्शन घडले, की यात्रा सफल होते अशी धारणा आहे. प्रभुरामचंद्रांनी सप्तशृंगगडवासिनीच्या सोबत वणीच्या जगदंबेचे दर्शनही घेतले अशी कथा आहे. ते मंदिर हेमाडपंथी बांधणीचे आहे. ते पूर्वाभिमुख आहे. मंदिरासमोरची दीपमाळ आणि तेथील गणेशतळ लक्षणीय आहे. तेथील मूर्ती आकर्षक व तेजस्वी आहे. जुन्या _saptashrungi_gadरडतोंडीच्या मार्गाने, तर नांदुरी मार्गे गडावर जाता येते. आधी महिषासुराचे नि गणेशाचे पायथ्याशी दर्शन घ्यायचे. नंतर पायऱ्या चढून कुलस्वामिनीचे मंदिर गाठायचे असा सर्वसाधारण प्रघात आहे. 

गडावर सुमारे पाच हजार वस्ती आहे. मात्र तेथे एकही कावळा नसल्याचे सांगतात. अठराव्या शतकात सरदार दाभाडे यांनी गडावर जाण्यासाठी डोंगर फोडून केलेल्या पायऱ्या फार उंच आहेत. गडावर सिद्धेश्वर मंदिराजवळ शिवतीर्थ तळे आहे. ब्रह्मदेवाने नारदाला त्या तीर्थस्थानाने शुचिर्भूत होऊन नंतर देवीचे दर्शन घेण्यास सांगितले असा पुराणात उल्लेख आहे. लक्ष्मी, सरस्वती नि काली यांचे त्रिगुणात्मक दर्शन सप्तशृंगी मातेच्या स्वयंभू मूर्तीत घडते. तिचे दर्शन ॐकारस्वरूप असते. 

सप्तशृंगी देवीची रोज त्रिकाल पूजा होते. मंत्राभिषेकानंतर सर्वांग सिंदूरचर्चित केले जाते. रोज देवीला लावले गेलेले वेगवेगळ्या रंगांचे कुंकू विशेष लक्ष वेधून घेते. तिचे नवरात्रही वैशिष्ट्यपूर्ण असते. देवीची यात्रा नवरात्रात पहिल्या माळेपासून पंधरा दिवस असते. त्यात गाथा, सप्तशतीचे नि अन्य पुराणांचे पाठ, कवन, आरत्या, आदींचे पठण होते. काही जण त्या सात शिखरांना तीन किलोमीटर पाऊलवाटेने प्रदक्षिणा घालतात. प्रदक्षिणावाटेवर परशुराम बाबांचे दर्शन घडते. आदिशक्तीचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेस झाला असल्याने तेथे चैत्रोत्सवही होतो. सुरथ राजाला देवीच्या कृपेने राजपद लाभल्याने त्यानेच हा उत्सव सुरू केल्याचे सांगतात. शंकराचार्यांनीही तेथे नवचंडी याग केला, तेव्हा दूधगंगा प्रकट झाली होती अशी आख्यायिका आहे.

सप्तशृंगी मातेचा महिमा ऐशी तुझी ख्याती महिमा न कळे ब्रह्मादिका हो । अमर दुर्लभ रमणे करिसी सप्तशृंग निवास हो।। असा तिच्या आरतीतूनही आर्तपणे आळवला जातो.

हे ही लेख वाचा - 
अकलूजची ग्रामदेवता अकलाई देवी
तांबवे गावची वज्रेश्वरी देवी
मुरुडची ग्रामदेवता कोटेश्वरी देवी

सप्तशृंगी मातेचे रूप हे आदिमाया आदिशक्तीचे मूळ रूप आहे, नि ते तसे पूर्ण रूप आहे असे मानले जाते. शिवाय ती महिषासुरमर्दिनी देवी म्हणजे साक्षात् महालक्ष्मी, महासरस्वती व महाकालीही आहे. देवीने महिषासुराचा वध महापराक्रमाने केल्यानंतर ती विसाव्यासाठी त्या सप्तशृंगगडावर आली अशी आख्यायिका आहे. राम-रावण युद्धात लक्ष्मणाला ज्यावेळी मूर्छा आली त्यावेळी मारुतीने आवश्यक औषधी वनस्पती न मिळाल्याने त्याच्या उपचारासाठी अख्खा द्रोणागिरी पर्वत उचलून आणला होता. त्यावेळी द्रोणागिरीचा काही शिळाखंड खाली पडला, तोच हा सप्तशृंगगड अशीही आख्यायिका महानुभावीय ‘लीळाचरित्र’ या ग्रंथात आलेली आहे. संत निवृत्तिनाथांनी समाधी घेण्यापूर्वी काही दिवस कुलदेवता सप्तशृंगवासिनी मातेची उपासना केली नि तिच्याकडे समाधिस्थ होण्यासाठी अनुमती मागितली आणि तिच्या संमतीनंतरच समाधी घेतली अशीही आख्यायिका आहे. 

प्राचीन काळी दैत्यांनी पृथ्वीवर हाहाकार माजवला होता. जे कोणी पूजापाठ उपासना करत त्यांना पकडून तुरुंगात डांबून ठेवले जात असे! जप-तप करणाऱ्या ऋषिमुनींचे आश्रम जाळणे, गुरेढोरे पळवणे, सोनेनाणे लूटून नेणे असा दुराचार चालू असल्याने देवलोकही चिंताग्रस्त झाला होता. अंती ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी एकत्र येऊन दिव्य शक्ती निर्माण केली, त्या महादिव्य शक्तीने महापराक्रमाची ज्या पवित्र अशा चार ठिकाणी प्रचीती दाखवली ती ठिकाणे म्हणजे महाराष्ट्रातील महालक्ष्मी, महासरस्वती व महाकाली यांच्या त्रिगुणात्मक रूपातील साडेतीन शक्तिपीठे! अवघ्या असुरातील अत्याचारी महिषासुर आणि त्याचे दोन बंधू यांनी असुरी प्रवृत्तीने पापांची परिसीमा गाठली होती. त्यांनी आम्हीच तुमचे देव। आमचीच पूजा करा असा आदेशच आमजनांना दिला असल्याने तो मोडून देवपूजा करणाऱ्यांना मरण पत्करावे लागत असे. तशा बलदंड असुरांपैकी महिषासुरांच्या दोन्ही भावांचा त्यांच्याशी प्रखर लढा देऊन आदिशक्ती देवीने वध केला. मात्र महिषासूर रेड्याच्या शरीरात प्रवेशून राहत असल्याने त्याला मारणे अवघड झाले होते. अखेर, देवीने सारे सामर्थ्य पणाला लावून त्या रेड्याचा शिरच्छेद केला तेव्हा महिषासूर एवढ्या ताकदीने पळाला, की त्याच्या उड्डाणाने डोंगराला मोठे खिंडारच पडले! महिषासुराने चवताळून जाऊन देवीशी निकराचे युद्ध सुरू केले जे देवीनेही अफाट शक्तिसामर्थ्यांने नऊ दिवस करून महिषासुराचा अंती वध केला. 

देवीने महिषासुराचा वध करताच देवदेवतांनी स्वर्गातून देवीवर पुष्पवृष्टी केली. देवीने विसाव्यासाठी नि पुढे भक्तांच्या चिरंतन सुखासाठी, त्यांच्या कल्याणासाठी, या गडावर वास्तव्य केले. तोच तो सप्तशृंगीमातेचा सप्तशृंगगड. त्या गडाच्या अवघड पायऱ्या चढून पठारापर्यंत पोचताना सहा शिलालेख पाहण्यास मिळतात. त्यांत तेथील विकासकार्यासंबंधी, बांधकामाविषयीची माहिती असल्याचे आढळून येते. एक शीलालेख संस्कृत भाषेतील तर बाकीचे मराठी भाषेतील आहेत. सप्तशृंगीदेवीचे दर्शन आठशेबावीस पायऱ्या चढून गड गाठल्यावर घडते. देवीभक्त अंबाबाई दाभाडे यांनी त्या पायऱ्या 1710 मध्ये बांधून दिल्या आहेत. पायऱ्यांचा पहिला टप्पा तीनशेपन्नास पायऱ्यांचा तर दुसरा चारशेबहात्तर पायऱ्यांचा आहे. कान्होजी, रुद्राजी व कृष्णाजी या तीन देवीउपासक भावंडांनी मिळून त्या पायऱ्यांची पुनर्रचना 1768 मध्ये केली. त्याच तीन बंधूंनी भाविकांच्या सोयीसाठी धर्मशाळा, तिच्याजवळ गणपतीचे सुंदर मंदिर नि रामतीर्थ नावाचे कुंडही बांधून गड सुशोभित केला. 

_devi_saptashrungiआठ दगडी कुंड सप्तशृंग गडाच्या पठारावर पाण्याने भरलेली आहेत. पैकी सरस्वती कुंड, लक्ष्मी कुंड, तांबुल कुंड, अंबालय कुंड, शीतला कुंड ही पाच लहान कुंडे आहेत. तर काळीकुंड, सूर्यकुंड व दत्तात्रेयकुंड ही तीन कुंडे आकाराने मोठी आहेत. तेथील शिवालयकुंड हे तर मोठे स्नानगृहच आहे. देवीदर्शनासाठी आलेले भक्त त्या कुंडात स्नान करतात. त्याचे पाणी स्वच्छ नि गोड आहे. त्या कुंडाजवळ हेमाडपंथी बांधणीचे सिद्धेश्वर मंदिर आहे. भाविक स्नानानंतर सिद्धेश्वराचे दर्शन घेतात. डोंगरमाथ्यावर एक पांढरा खांब आहे. बुटीगाव पाटलांची मुले परंपरेने त्यावर चैत्री पौर्णिमेला देवीचा ध्वज चढवतात. तो अतिशय अवघड कडा आहे. ती मुले केवळ सप्तशृंगीदेवीवरील असीम श्रद्धेने ते कठीण कार्य करू शकतात. देवीचे दर्शन गडाच्या दुसऱ्या टप्प्यातील पायऱ्या चढून गेल्यानंतर, दोन शिखरांमध्ये गुहेसारख्या एका भागात शिरल्यावर होते. त्या देवीची उंची आठ फूट असल्यामुळे तिची विधिवत पूजा शिडी लावून करावी लागते. मूर्तीला स्नान थंड जलाने नित्य घालतात. मात्र मंगळवारी नि शुक्रवारी तिला गरम जलाने अभिषेक करून भरभरून शेंदूर लावतात. देवीच्या भुवया नि पापण्या रंगाने कोरतात, भलेमोठे कुंकू लावतात, सौंदर्य न्याहळण्यासाठी तिला आरसा दाखवतात. तिला केवळ नवरात्रोत्सवात अलंकार, नथ, गळसरी लेवून खीरपुरीचा महानैवेद्य दाखवतात, नाना वाद्यांच्या गजरात तिची त्रिकाळ आरती होते. तेव्हा मंदिरातील घंटा निनादतात, मोठमोठी झुंबरे प्रकाशतात. सप्तशृंगीदेवीचा महिमा ‘सप्तशृंगी पाठावली’ म्हणून ओळखला जातो. तिची ख्याती नवसाला पावणारी देवी म्हणून आहे. तिचा अतुल पराक्रम नि मार्कंडेय ऋषींची दिव्य भक्ती याविषयी वर्णन सप्तशती ग्रंथात आलेले आहे. त्याची साक्ष सप्तशृंगगडाच्या पठाराच्या पूर्वेला असलेला मार्कंडेय पर्वत देतो. मार्कंडेय ऋषींनी घोर तप त्या पर्वतावर केले, म्हणून त्याला मार्कंडेय पर्वत या नावाने ओळखतात. सप्तशृंगीदेवी तिचा पाठ भक्तांकडून भक्तियुक्त अंतःकरणाने अहंकाररहित राहून नित्यनेमाने केला गेल्यास ती प्रसन्न होते. मार्कंडेय ऋषींनी भीमासूर दैत्याचा नायनाट तिचा पाठ करूनच केला होता.

-संकलन

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.