मराठवाडी बोली सिन्थेसाईज्ड वुईथ इंग्लिश... डेडली कॉकटेल!


अरुण साधू कथा-कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांचे वैचारिक राजकीय व सामाजिक लेखनही बरेच आहे. साधू स्वत: उत्तम वाचक, आस्वादक आणि संपादक होते. त्यामुळे त्यांची बारीक नजर मराठी साहित्यातील विविध प्रवाहांवर असे आणि त्यांचा नित्य संपर्क नव्या लेखकांशी असे. प्रस्थापित मराठी साहित्यश्रेष्ठी नव्यांची दखल घेत नाही याबद्दल त्यांच्या मनी सूक्ष्म नाराजीदेखील असे. साधू यांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे हे सारे मूकपणे व विनम्र भावाने व्यक्त केले. त्यांची अशी एक प्रस्तावना त्यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्ताने (25सप्टेंबर 2019) प्रसिद्ध करत आहोत. त्यात त्यांच्या लेखनशैलीची व विचारपद्धतीची वैशिष्ट्ये दिसून येतील. शिवाय, शैलीचा बाज म्हणून हे लेखन वाचनीय वाटेल. 

-marathwadi-boli-arun-sadhu-babaruvan-dhananjay-chincholikarमराठी लँग्वेजसारखी हाय क्वालिटी लँग्वेज होल वर्ल्डमधे सापडणार नाही असे आम्ही क्लेम करत असतो आणि ते प्रूव्ह करण्याइतपत वॉटरटाईट एव्हिडन्स आता मिळाला आहे. सांप्रतच्या काळात मराठीला अभिजात म्हणजे ‘क्लासिक लँग्वेज’ म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटची रेकग्निशन मिळवण्यासाठी महाराष्ट्रीयन इंटलेक्चुअल्सच्या मदतीने स्टेट गव्हर्नमेंटने जोरदार फ्रंट उघडली आहे. शिवाय अगदी सिक्स्टीजपासून मराठीला ‘नॉलेज लँग्वेज’ म्हणून इनेबल करण्याच्या स्लोगन्स चालूच असतात. ऑनेस्टली सांगायचे तर त्या दोन्ही कँपेन्समध्ये एनर्जी वेस्ट करणे मीनिंगलेस आहे. कारण एकीकडे सरफेसवर त्या मूव्हमेण्टस् चालवण्याचा स्टेट आणि मराठी इंटेलेक्चुअल्स शो करत असताना, दुसरीकडे पब्लिकमध्ये एक अधिक पॉवरफुल मूव्हमेण्ट जोर धरू लागली आहे- पीपल्स मूव्हमेण्ट. ती म्हणजे मराठी लँग्वेजच्या मॉडर्नायझेशनची आणि समृद्धीकरणाची- म्हणजेच यंग जनरेशनला कळेल अशा लँग्वेजमध्ये सांगायचे तर एन्रिचमेण्टची. हा जो मेटॅमॉर्फोसिस मराठी लँग्वेजचा होत आहे, त्यामुळे दुसरे कोणतेही एफर्टस् न घेता ती आपोआप ‘नॉलेज लँग्वेज’ होऊन जाईल.

मग साहजिकच मराठी इंटेलेक्चुअल्संना, पंडितांना नव्या कंप्लीट डिक्शनऱ्या, एनसायक्लोपीडिया, लॉ लेक्सिकॉन एटसेट्रा; झालेच तर फिलॉसॉफी, अॅस्ट्रोफिजिक्स, मॅथेमॅटिक्स, क्वाण्टम थिअरी इत्यादी इत्यादी शेकडो फंडामेण्टल सबजेक्ट्सवर परिपूर्ण पुस्तके लिहिण्याचे कष्ट घ्यावे लागणार नाहीत. कारण त्या मॉडर्न, एन्रिच्ड मराठीत जगातील ज्ञानसंचिताचा हा सगळा प्रचंड खजिना आयताच उपलब्ध होईल; तो केवढा मोठा अॅडव्हाण्टेज! पण मराठीच्या नुस्त्याच टिऱ्या बडवीत, ‘माझी मराठी, माझा महाराष्ट्र’ अशा गर्जना देत, येता-जाता कमरेच्या ऐतिहासिक तलवारीला हात घालणारी होल मराठी एस्टॅब्लिशमेण्ट ही डेव्हलपमेण्ट डेलिबरेटली इग्नोअर करत आहे की काय असा डाऊट येतो. एवढी ही स्टार्क रियालिटी दिसू नये, म्हणजे काय? लाईक अ शहामृग विथ इटस् हेड इन द सँड!

इन फॅक्ट, या एन्रिचमेण्टच्या साईन्स गेल्या सेंचुरीपासून व्हिजिबल होऊ लागल्या होत्या. मराठी भाषा ‘डेथ रो’वर असल्याची वॉर्निंग पुरातन पंडित व्ही.के. राजवाडे यांनी दिली होती, हे ओल्ड जनरेशनला आठवत असेलच; पण त्यांचेच कंटेंपररी मराठीतील एक फेमस नॉव्हेलिस्ट होते हरी नारायण आपटे. ते ऑल इंडिया मराठी लिटरेचर कॉन्फरन्सच्या 1912 च्या प्रेसिडेन्शियल अॅड्रेसमधे बोलले होते, की मराठी लँग्वेजमध्ये अधून-मधून इंग्रजी शब्द योजावे लागतात. त्याला खूप लोक अपोझ करतात; पण सध्या तरी (म्हणजे तेव्हा) त्याला आल्टरनेटिव्ह नाही. उलट, करेक्ट व नेमके मीनिंग कन्व्हे करण्यासाठी इंग्लिश वर्डस्यूज करणे अॅव्हॉईड करू नये. त्याने उलट मराठी लँग्वेज रिच होते.

“आमच्या भाषेवर इंग्रजी भाषेने फार परिणाम केला आहे... तो एकंदरीने पाहता फार इष्ट असाच परिणाम आहे असे म्हणण्यास मला अणुमात्र दिक्कत वाटत नाही.” हे आपटे यांचे शब्द. पुढे, ते म्हणतात... “तर ज्यांनी आम्हांस जिंकले, जे आमच्यावर राज्य करतात, त्यांचे शब्दभांडार व विचारभांडार आम्ही लुटून आमच्या भाषाकोशाची व विचारभांडाराची भर करत आहोत...” त्यांनी आपण जी डिस्कस करत आहोत त्या एन्रिचमेंट प्रोसेसची तरफदारी साऱ्या भाषणातच केली आहे.

ते वाचले तेव्हाही आम्हाला ते आवडले नव्हते. कारण आम्हीही शुद्ध मराठीचे अभिमानी, ओल्ड स्कूलचे. ‘गीत मराठीचे श्रवणीं मुखी असो...’ हे तर आमच्या ओठांवर सतत असे. तीसेक वर्षांपूर्वी, तर आम्ही ‘प्युअर मराठीच्या शोधात शास्त्रीबोवा’ अशा नावाची शॉर्ट स्टोरीही लिहिली होती.

जयंत नारळीकरांच्या सुंदर, शुद्ध मराठी लिखाणाचे आम्ही तेव्हा चाहते होतोच आणि मराठीच्या या मॉडर्नीकरणाचा साक्षात्कार झाल्यावरदेखील आहोत, हे नोट केले पाहिजे. हा साक्षात्कार किंवा रियलायझेशन कसे झाले तेही सांगितले पाहिजे. एका रिमोट व्हिलेजच्या एष्टी स्टँडवर बसची वाट पाहत दोन अस्सल पिझँट फार्मर्सचे कॉन्व्हर्सेशन ऐकत रात्र काढली. ती तीसेक वर्षांपूर्वीची गोष्ट असल्याने, त्या काळात खेड्यापाड्यांत प्रायमरी इंग्लिश मीडियमचे खूळ पसरलेले नव्हते, ही नोट करण्याची बाब आहे. तर ते दोघे शेतकरी फ्रीली त्यांच्या त्यांच्या प्रॉब्लेम्सवर बोलत होते. फॉर एक्झांपल- मिल्क को-ऑपरेटिव सोसायटीच्या इलेक्शनमधील करप्शन, चेअरमनची लीडरगिरी, सीड फार्म, बोरवेल, फर्टिलायझरचे ब्रँड आणि त्यांच्या क्वालिटी, क्यानाल पोलुशन, झेडपी मेंबरांचे पॉलिटिक्स, बशींचे अॅक्सिडेण्ट, शुगर मिलची अल्कोहोल फॅक्टरी, एष्टीचे टाइम टेबल... असंख्य सब्जेक्ट्स्. आम्ही बसची डबल बेल वाजेपर्यंत ऐकत होतो. तेव्हाच डोक्यात पॉवरफुल्ल सेन्सेशन झाले. नवे नॉलेज. साक्षात्कार ! मनोमन त्या दोघा शेतकऱ्यांना नमस्कार... तर ते असो. पॉर्इंट असा आहे, की आपटेसाहेबांनी त्या काळात मराठी लँग्वेजच्या एन्रिचमेण्टची प्रोसेस ओळखून मोठी दूरची ‘व्हिजन’ दाखवली होती.

एनीवे, या सगळ्या आयरॉनिक डायलेमावर लिहिण्याचे निमित्त आहेत बब्रूवान रुद्रकंठावार, त्यांची पुस्तके आणि त्यातील भाषा. ते प्रतिभावान लेखक औरंगाबादचे. ते स्वतः स्वीकारलेल्या त्या वळणाच्या भाषेत उत्तमोत्तम साहित्यनिर्मिती गेली काही वर्षें निष्ठेने करत आहेत. अर्थात, वर डेमोन्स्ट्रेशनसाठी जे दोन प्रायोगिक पॅराग्राफ लिहिले, तसे इंग्रजी शब्द सर्रास मराठीत कोंबण्याचा सोस त्यांच्या लिखाणात आढळत नाही. ते मराठी माणसांच्या बोलण्यात सहजपणे जी भाषा येईल त्याच वळणाने लिहितात. त्यांचा स्वभाव स्वत:चे भाषाज्ञान दाखवण्यासाठी फाजील स्टाईल करण्याचा दिसत नाही. क्वचित त्यांचे लेख पुण्या-मुंबईच्या नियतकालिकांत किंवा दिवाळी अंकांत प्रसिद्ध झाले असतील. त्यांची पुस्तकेही तिकडे मराठवाड्यात प्रसिद्ध झालेली आहेत. त्यामुळे साहजिकच मराठी साहित्याची पुणे-मुंबई केंद्रित जी एस्टॅब्लिशमेंट आहे- जिला मराठी साहित्याचे धर्मपीठ मानले जाते, तिने बब्रूवान यांची अजून दखलही घेतलेली नाही. हेही मराठी रीतीप्रमाणेच आहे, म्हणा. इकडच्या एस्टॅब्लिशमेंटच्या कोण्या शुचिर्भूत साहित्यशास्त्र्याने त्यांच्या मस्तकावर मंत्राक्षता टाकून, त्यांचे शुद्धीकरण करून घेतल्याशिवाय त्यांना इकडे फारसे रेकग्निशन मिळणार नाही. असे कितीतरी हिरे मराठीने गमावले आहेत. तीदेखील आपल्या मायभाषेची एक ट्रॅजेडीच. प्रस्तुत प्रस्तावनाकारात ते कर्मकांड करण्याची पात्रता नाही व त्यास ते क्वालिफिकेशनही नाही. म्हणून आम्ही लेखकास इकडच्या एखाद्या जानेमाने समीक्षकाकडून प्रस्तावना लिहून घेण्याचा सल्ला दिला. त्यांनी तो न मानता अडेलतट्टूपणाने आमच्यावर प्रस्तावनेचा भार टाकला आहे. प्रस्तुत प्रस्तावनाकार समीक्षाशास्त्राचा व भाषाशास्त्राचा अभ्यासक नव्हे, की साहित्याचा खंदा वाचकही नव्हे; पण बब्रूवान यांच्या लिखाणाचा फॅन झाल्याने ही जबाबदारी _arun_sadhuथोडीशी नाईलाजाने; पण आनंदाने पत्करत आहे. असो. 

बब्रूवान यांच्या भाषेत ग्रामीण मराठवाडी बोली आणि इंग्रजी शब्द, विशेषणे, क्रियापदे यांचे असे अफलातून पॉवरफुल मिक्स्चर असते, की ती सहजस्फूर्त बोलीच वाटावी; कोठेही कृत्रिमतेचा वास न यावा. किंबहुना, आंग्ल भाषेशी ही विलक्षण मनोहर गळाभेट त्यांच्या ग्रामीण भाषेत अधिक शोभून दिसते. शिष्ट-स्वीकृत मराठी भाषेत कितीही स्किलफुली इंग्रजी शब्द पेरले, तरी ते एवढे शोभून दिसत नाहीत (किंवा बऱ्याचदा बेंगरुळ वाटतात) जेवढे बब्रूवान यांच्या ग्रामीण मराठी भाषेला ते फिट्ट बसतात, शोभून दिसतात. पण ती ज्याच्या- त्याच्या परसेप्शनची बाब आहे. ते असो. मुद्दा असा, की तीच मेथड रिटन मराठी लँग्वेजने ऑफिशियली अडॉप्ट केली तर कितीतरी प्रॉब्लेम्स् सॉल्व्ह होतील. जसे बब्रूवान ज्या क्लॅरिटीने लिहितो तसे. ती क्लॅरिटी, तसेच एक्स्प्रेशनचे प्रेसिजन प्रमाण- मराठीमध्येदेखील येईल. इन फॅक्ट- आणि टु बी ऑनेस्ट- बब्रूवान आणि त्याचा दोस्त अशी मॉडर्न मराठी बोलतात, मोस्टली तशीच मराठी- ऑफकोर्स आपापल्या स्थानिक बोलींच्या व्हर्शनमध्ये किंवा तथाकथित शहरी प्रमाणभाषांमध्ये- गोंदियापासून ते कणकवलीपर्यंतचे मराठी तरुण बोलतात व सगळ्यांना सहसा त्यांचे बोलणे समजते. म्हणजे मराठीच्या मॉडर्नायझेशन, स्टँडर्डायझेशन आणि एन्रिचमेण्टची प्रोसेस अॅक्चुअली डेली व्यवहारात सर्वत्र ऑलरेडी चालू असताना, तीच भाषा लिहिण्याची आपल्याला शरम का वाटावी? बब्रूवान रुद्रकंठावार ते धाडस बिनधास्त करतात, म्हणून त्यांचे अभिनंदन केले पाहिजे.

संगणकावर लिहिताना मात्र एक मोठी अडचण येते. इंग्रजी एकेक शब्द लिहिताना कधी एकाऐवजी दोन-चार किया दाबाव्या लागतात. शिवाय वारंवार शिफ्टची की दाबून दमछाक होते. स्पीड येत नाही. जोडाक्षरांसाठी चांगलीच कसरत करावी लागते. काही चिन्हांसाठी देवनागरीची गाडी सोडून रोमनवर जावे लागते. हे म्हणजे मुंबईच्या एका रुळावरील धावत्या लोकलमधून दुसऱ्या धावत्या लोकलमधे उडी मारण्यासारखे. मराठीचा उदोउदो करणाऱ्या शासनाने व मराठीच्या एस्टॅब्लिशमेण्टने या टेक्निकल अडचणींकडे अद्याप लक्ष दिलेले नाही. प्रस्तावनाकार विषय सोडून कोठे भरकटत निघाला, असे वाचकांना वाटेल; पण भाषासमृद्धीसाठी लेखन-प्रक्रियासुद्धा महत्त्वाची असते. यापुढे अधिकाधिक मुले कॉम्युटरवर लिहिणार आहेत, म्हणून येथे या बाबीचा उल्लेख करावा लागतो आणि बब्रूवान यांच्या लेखनातील इतर काही वैशिष्ट्यांबरोबरच (त्यासंबंधी चर्चा पुढे आहेच) भाषा-वापराची ही खास शैलीदेखील अत्यंत महत्त्वाची आहे. किंबहुना या शैलीमुळे रुद्रकंठावार यांचा विनोद अधिक नैसर्गिक आणि थोडा वेगळा वाटतो. त्यांच्या सोशल तथा पॉलिटिकल कॉमेंट्स चांगल्याच तीक्ष्ण व बोचऱ्या आणि फिलॉसॉफिकल ऑब्झर्वेशन्स विशेष मर्मग्राही व स्कॅथिंग झाले आहेत. त्यामध्ये त्यांच्या या विशेष लँग्वेज स्किलचेही काँट्रिब्युशन आहे, हे मान्य करण्यास हरकत नाही.

एनीवे, भाषेबद्दल या प्रस्तावनेपुरता शेवटचा पॉइंट मांडून मूळ पुस्तकाकडे वळतो. मराठीची पोकळ, बोलघेवडी अस्मिता या, सर्वांगपरिपूर्ण संक्रमण घडत असलेल्या काळात भाषा सस्टेन करायला पुरेशी नाही, हे आता सिद्धच होत आहे. जागतिक संक्रमणाचा क्रांतिकारक झपाटा असा विलक्षण आहे, की त्यात भाषाच काय, माणसाचे सर्व सामाजिक व व्यक्तिगत व्यवहार, विचारपद्धती, व्यक्त होण्याच्या तऱ्हा सारे बदलत आहे. इंग्रजी भाषादेखील बदलत आहे. डिजिटल टेक्नॉलॉजी, बायो-केमिकल टेक्नॉलॉजी, स्टेम-सेल इंजिनीयरिंग इत्यादींच्या झंझावातात माणसाचा डीएनएच बदलत आहे, तर इतर बाबींची काय वार्ता? वाढत्या आंतरराष्ट्रीय व्यवहारांमुळे जगातील सर्वच भाषा बदलत आहेत.

आमच्या पिढीने माणसाच्या दैनंदिन जगण्याच्या संस्कृतीत व शैलीत जेवढी वेगवान स्थित्यंतरे पाहिली आहेत तेवढी माणूसप्राण्याच्या इतिहासात कोणत्याही पिढीने अनुभवली नसतील. आमच्यासमोर आमची सैंपाकघरे आमूलाग्र बदलली, दिवाणखाने बदलले, स्त्री-पुरुषांच्या वेशभूषा बदलल्या, प्रवासाची व दूरसंवादाची साधने बदलली, डिजिटल क्रांतीमुळे तर माणसाची देहबोली व स्वभाव बदलू लागला आहे. त्या सुसाट वादळात भाषा बदलल्याशिवाय कशी राहील? पुढच्या मराठी पिढ्यांची इंग्लिशची व्होकॅब्युलरी आपल्यापेक्षा नक्कीच स्ट्राँग असणार आहे. त्यांना बब्रूवान यांची भाषा अधिक पटेल यात शंका नाही. तर मुद्दा आहे बब्रूवान रुद्रकंठावार ज्या वळणाने मराठी वापरतात त्यासंबंधीचा. म्हणून हे सारे येथे सांगितले पाहिजे.

बब्रूवान रुद्रकंठावार यांचे हे बहुधा चौथे पुस्तक. खास आठवते ते, ‘बर्ट्रांड रसेल वुइथ देशी फिलॉसॉफी’ हा धमाल संग्रह. त्यातच त्यांच्या इंग्रजीप्रचूर खास भाषेची ओळख झाली. प्रथम वाटले, की ते सारे लिखाण एखाद्या वृत्तपत्रात नियमित स्तंभ म्हणून प्रसिद्ध झाले असावे; पण नंतर कळले, केवळ वृत्तपत्र नव्हे तर वेगवेगळी नियतकालिके, मासिके यांच्या विशेष अंकांतून वेळोवेळी प्रसिद्ध झालेले ते लेख आहेत. त्या अनियमित लेखांमधूनही त्यांच्या भाषेच्या खास स्टाईलीची सुसंगती त्यांनी कटाक्षाने राखलेली लक्षात येते. तशीच त्यांच्या निवेदनाची विशेष शैलीदेखील. आणखी एक वैशिष्ट्य नमूद केले पाहिजे. बब्रूवान यांनी त्यांच्या खास भाषेची स्टाईल तासत तासत ‘बर्ट्रांड रसेल...’ (2007) पासून आतापर्यंत ती अधिकच खुमासदार केलेली दिसते. इतकी की, वाचता वाचता, तिच्या वेगळ्या सौंदर्याचा व मादक माधुर्याचा; तसेच, तिच्या नैसर्गिक लयीचादेखील वाचकाला आनंद देणारा प्रत्यय यावा. अस्सल ग्रामीण मराठवाडी बोली सिन्थेसाईझ्ड वुईथ इंग्लिश... डेडली कॉकटेल. त्यातच जबरी विनोदाच्या किंवा अबसर्डिटीच्या आधारे केलेली स्कॅथिंग कॉमेन्टस् वा ऑब्झर्वेशन्स्!

त्यासाठी प्रस्तुत संग्रहातील पहिलाच लेख ‘जातीचं मॅथेमॅटिक्स्’, त्यातील पहिलाच पॅरा वाचला तरी बब्रूवान यांच्या तेज लेखनाचे सँपल टेस्ट केल्यासारखी किक बसेल. खरे तर, तो पॅरेग्राफ येथे कोट करण्याचा मोह होतो; पण दोनचार पाने उलटली, की तो वाचकांच्या लगेच दृष्टीस पडेल. बब्रूवान यांच्या लेखनाच्या बऱ्याच पिक्युलियारिटीज् त्या एका पॅरेग्राफमधून सहज प्रकट होतात.

लेखकाची साधारण सहा पात्रे पर्मनंट असतात. लेखक म्हणजे स्वतः बब्रूवान आणि त्याचा दोस्त. दोस्त त्याला बबऱ्या असेच कायम संबोधत असतो आणि बबऱ्या दोस्ताला फक्त दोस्त. बबऱ्याचा मुलगा गब्रू आणि दोस्ताचा बारक्या. वय असणार बाराच्या आसपास. पण पोट्टे बापांपेक्षा सुपर बेरकी. दोघेही या बापांची पुरेपूर मापे घेतलेली. त्यांच्या चेहऱ्यावरील ऑल-नोर्इंग तिरके इंपिश हसू वाचकांना जणू टायपात दिसते. बायकांना वहिनीव्यतिरिक्त नावे नाहीत. त्या सहसा सैंपाकघरात खुडबुड करत असतात; पण बाहेर चहा घेऊन आल्या, की त्यांच्याही चेहऱ्यावर प्रॅक्टिस करून आणलेली स्केप्टिसिझमची स्मितयुक्त शेड सहज दिसावी. मात्र त्याचबरोबर, त्या कधी नवऱ्यांच्या दांड्या उडवतील असाही आविर्भाव असतो. मुले कधी एखादा सुसाट प्रश्न टाकून बापद्वयांच्या विकेटी घेतील याचीही खात्री नसते. स्टोरी सुरू होते सहसा बबऱ्याच्या किंवा दोस्ताच्या घरी. बबऱ्या कोठल्यातरी सामाजिक, सांस्कृतिक किंवा राजकीय किंवा थिल्लर प्रश्नावर गहन विचारात बुडालेला असतो. तशात दोस्त येतो अन् त्यांचे मसालेदार कॉन्व्हर्सेशन स्टार्ट होते. फुलझड्या, भुसनळे, लवंगी लडी, ऍटम धमाके फुटू लागतात. कोठे लंबा पॉझ पडला, की जर्द्याच्या पुड्या असतातच किंवा आतून बायकोने कॉमेंटसह आणलेला चहा. सरता सरता बबऱ्या कंसामधे पाच-सात ओळींमधे एक जबरी खाजगी कॉमेंट टाकतो. अर्थातच ती फक्त वाचकांसाठी असते. असा साधारणपणे बब्रूवानांच्या लेखांचा फॉर्म असतो.

या भन्नाट संवादाचे विषय कोणते असतात? राजकारण, साहित्य, समाजकारण, संस्कृतिकारण, टीव्ही, कॉम्प्युटरच्या पडद्यात दडलेले भासमय जग... त्या त्या वेळच्या निमित्ताने काहीही. संवादाची पातळी वरवरची भासली, तरी कधी प्रोफाउंडिटीची उच्च पातळी गाठते; शाश्वत सत्ये ठायी ठायी सवंग वाटणाऱ्या मुक्ताफळांमधून बोलली जातात. कधी चक्क अॅबसर्डिटीची विलक्षण झिंग! अॅसर्डिटी कधी संवादातून कडेलोट झाल्यासारखी, कधी बबऱ्याच्या समाधियुक्त म्युझिंग्जमधून. दोस्त एका स्थानिक नेत्याच्या गोटातील. त्यामुळे गप्पांमध्ये राजकारण सर्व तऱ्हेचे म्हणजे ग्लोबलपासून तो लोकलपर्यंत. झालेच तर गावचे पॉलिटिक्स, कंपूमधील, मित्रांमधील, जाती-पातींचे, घरातील डोमेस्टिक पॉलिटिक्स, नातेवाईकांचे, नवरा-बायकोचे, बाप-मुलाचे पॉलिटिक्स... त्याशिवाय इकॉनॉमिक्स, लॉजिक, फिलॉसॉफी, फिलॉलॉजी, अॅन्थ्रॉपॉलॉजी, सोशॅलॉजी, सोशल सायकॉलॉजी इत्यादी इत्यादी. विषय तर त्यांच्या रोजच्या मीठ मिरचीचेः पण पीएच डी स्टुडण्टने नोट्स काढाव्यात असे घनगंभीरपणे चर्चिलेले. अर्थात लाइट भाषेत आणि जेव्हा गप्पांचा विषय असतो कंप्युटरचा, डिजिटल उचापतींचा, तेव्हा बब्रूवान यांच्या प्रतिभेला पंख फुटतात. पाच लेख तर आभासी जग आणि फेसबुक वगैरे विषयांतून जे मनुष्यजातींचे जीवन; तसेच, अनुभवविश्व बदलत आहे, त्यातून उसळणाऱ्या नव्या फिलॉसॉफिकल आव्हानांशी भिडणारे आहेत. हँसी-मजाकमध्ये या गहन विषयांवर गप्पा मारणाऱ्या त्या दोन मित्रांची प्रतिभाशक्ती थक्क करणारी आहे. अर्थातच ही कॉम्प्लीमेंट लेखकाची प्रातिभ जाण व त्याची कल्पनाशक्ती यांस आहे. तशी सगळ्या पुस्तकावरच त्या जगाची छाया आहे. येथे मात्र काही ओळी उद्धृत करणे न्यायाचे होईल. ‘डीटीपीठाचार्य’ या लेखात लेखक लिहितो, “मान्स आशे यकदमच कामून _babruwan_rathkanthiwarबहेकून जातेत? आशी मान्सं रिंकपोज करून घितली पायजेत. त्यांचा फाँट बदलून घितला पायजेल, त्यांची लाईनस्पेस चेक केली पायजेल. धागा पैलाच पन जनरेशन नेक्स्ट दिसली पायजेल. नॉनटेक्निकल गोष्टी बदलन्याचं टेक्निक फकस्त भगवंताच्या हातात आस्तं...” अशा किती लायनी न् पॅरे कोट करायचे? प्रस्तावना म्हणजे रिपीट पुस्तकच होऊन जाईल. तरीही ‘भासपीठाचे वॉलकरी’ या लेखामधील दोन-चार फेसबुकाबद्दलच्या लायनी आणखी येथे रेटतोच. बब्रूवान यांच्या अॅप्रिसिएशनसाठी. ...दोस्त म्हणतो, “च्यायला बबऱ्या, म्हंजे ही नवी क्लास सिस्टिमच हाय की.” बबऱ्या म्हणतो, “दोस्ता, बिगिनिंगला मान्सानं आशी कॉमेंट करूने. कारन स्टार्टिंगला आपले इचार लै प्रायमरी लेव्हलला आस्तेत. यकदा का तुमी रुटीनमंदी आले, मॅच्युअर झाले, की तेच इचार फिलॉसॉफीमंदी ट्रान्सफर व्हन्याची प्रोसेस सुरू व्हत आस्ती...” त्याच लेखात पुढे एक लांब परिच्छेद “दोस्ता, आपल्या कर्सरवर आपलं बारीक ध्यान असलं पायजेल...” या वाक्याने सुरू होतो. तो पूर्ण पॅरा खरोखर बारकाईने पुन्हा वाचावा असा. डिजिटल-व्हर्चुअल जगाविषयीचे सगळेच लेख प्रसन्न करणारे असले, तरी त्यातील कित्येक वाक्ये, संभाषणे, लेखकाची भाष्ये फिलॉसॉफीच्या ढगांमधे नेऊन सोडणारी, सुन्न करणारी आहेत.

अॅबसर्डिटीची वेडीवाकडी वळणे अंतरंगात कशी निमविषारी झिंग भरवणारी असतात त्याचे प्रत्यंतर लेखक नकळत पुष्कळ ठिकाणी देतो. त्याचे सँपल्स् ‘झाडं, शिव्या आन् लाजाळू’ या निबंधात प्रकर्षाने दिसतील. एक पॅरा तर ब्रेदलेस वाचनासाठी आहे... “वाड्यातल्या शिव्यांनी आता कंपाऊंडवर चढायला सुरुवात केलीय. त्या आता वाड्यात उतरताहेत. हैदोस घालताहेत...भिंतींना शिव्यांचे डाग पडलेहेत, खाचाखुचात, दगडादुगडात, खतात, पाण्यात शिव्या मिसळून गेल्याहेत. उडाणटप्पू शिव्या फांद्यांना लटकल्या हायेत. काही परागकणात शिरल्या हायेत. फुलपाखरांसंग बागडताहेत. साऱ्या झाडावरल्या साऱ्या फुलांना आता शिव्यांचे वास येऊ लागलेत. फळात शिरलेल्या शिव्या पाखरांच्या पोटात गेल्या हायेत. त्यांच्या चोचीत अडकल्या हायेत. पाखरांच्या गाण्यातून आता शिव्यांची गाणी निगताहेत. हाळूहाळू एरियातला आख्खा निसर्गच शिव्यांनी कंप्लीट व्यापून गेला हाये…”

पॉलिटिक्सवर तर दोघाही मित्रांची मास्टरी आहे. कोणत्याही प्रकारच्या पॉलिटिक्सचा सब्जेक्ट निघाला, की त्यांची रसवंती झुळूझुळू वाहू लागते. दोस्ताच्या लोकल श्रेष्ठीचे तिकिट वांद्यात पडल्यावर दोस्तबी अन्नेनेसरीली बंडखोरीला हुभा राहतो. अशा क्रिटिकल क्षणी बबऱ्या त्याच्या घरी जातो. त्यानंतर दोघांच्या डायलॉगचा जो फुफाटा उडतो, त्या निमित्ताने कॉमन मॅनच्या डेफिनेशनवर दोघांची जी इंटेलेक्चुअल व फिलॉसॉफिकल हाणामारी होते, त्यात बबऱ्या एक स्वतः च्या पब्लिक फजितीची जी सिंबॉलिक स्टोरी सांगतो, ते सर्व ‘आमादमी विदाऊट पार्टी’ या लेखात वाचावे.

स्वतः लेखकाला बदलत्या राजकारणाचे व राजकीय-सामाजिक मूल्यांच्या आजच्या गोंधळाचे सखोल भान आहे. म्हणूनच तो सारे सहजपणे लिहून जातो. पहिल्याच लेखात दोघा मित्रांची जातीच्या मॅथेमॅटिक्सवर गंभीर चर्चा सुरू असताना, त्यात तोंड खुपसून दोस्ताचा बेरकी पोरगा बारक्या एक सवाल टाकून दोघांची (आणि वाचकांचीही) दांडी उडवतो, “बब्रूअंकल, सांप्रतला कोणती जात सेफ हाये?” बराच घनगंभीर खल करून दोघांचे कॉन्सेंसस तयार झाल्यावर दोस्त पोराला बोलावून टेचात सांगतो, “बारक्या, सांप्रतला ‘मानूस’ ही जात लै सेफ हाये.” मानूस या शब्दाचा व्यापक गहनार्थ जाणून वाचक तरी थक्क होतो; पण लेखक थोर. त्याचे चाईल्ड सायकॉलॉजी आणि आधुनिक पोरांच्या जाणकारीचे अंडरस्टॅडिंग अधिक सखोल. बारक्या हे उत्तर झटकून टाकत म्हणतो, “असली टोपण जात फेकू नका माझ्याम्होरं. म्या काई पब्लिक न्हाई, तुमचा पोरगा हाये. प्रॅक्टिकलमंदी बोला. पैलीपास्नं सारेच ‘मानूस’ जातीचं सांगतेत, पन तशी यकबी जात आपल्यामंदी न्हाई. संस्कार म्हनून पैली-दुसरीच्या पोरांसाठी हे आन्सर चांगलं हाये, पन आमच्यासाठी न्हाई.”
आता ‘घोटाळ्याचा वास्तुपुरुष’ या लेखातील एक संपूर्ण परिच्छेद उद्धृत केल्याशिवाय बब्रूवान यांच्या लेखनातील मर्मग्राहकता, औपहासिक सौंदर्य, फिलॉसॉफिकल झेप, मनुष्य स्वभावाचे आणि करंट पॉलिटिक्सचे त्यांचे भेदक अंडरस्टॅडिंग यांचे पुरेसे अॅप्रिसिएशन होणार नाही.

हे ही लेख वाचा - 
कै. अरूण साधू स्मृती पाठ्यवृत्ती योजना
अरुण साधू यांना झिप-याची आदरांजली

अरुण साधू - स्थित्‍यंतराच्‍या युगाचा लेखक

“बबऱ्या, जरा नीट इचार कर. जरा घोटाळा या शब्दाकडं कलाकाराच्या डोळ्यानं बघ. किती जबरा शब्द हाये ह्यो. साऱ्यांनाच सामावून घेन्याचं जबर फिलिंग हाये ह्या शब्दामंदी. त्याची गोलाई बग, किती कंफर्टेबल वाटत आसंन ह्यात. बबऱ्या, उगाच न्हाय विरोधाचा बारुद साईडला ठिवून साऱ्याच पार्टीतले लोकं ह्याच्याकडं अॅट्रॅक्ट व्हतेत. घोळक्या-घोळक्यानं मस्त रमून जान्याचीच गोष्ट हाये ती. कोन यवडा चांगला चान्स हुकवंल... बबऱ्या, नीट डोळे उगडून बग, घोटाळा शब्दामंदी हिडीसफिडीस करनारे भाव तुला दिसतेत का? न्हाई, कंदीच दिसनार न्हाईत. त्यात यक आपलेपना हाये. यकरूप होन्याचं बळ हाये त्याच्यात.” त्यावर बबऱ्या म्हणतो, “लै झालं दोस्ता. घोटाळ्याला कॅलिग्राफीमंदी घुसवू नगोस. कवाकवा सीरियसली व्हत जाय.”

खरे तर, लेखकाने त्याचे पुस्तक त्याच्या लेखनावर लट्टू झालेल्या माणसाला प्रस्तावनेसाठी देऊ नये. एखाद्या कसलेल्या समीक्षकाकडे ती कामगिरी सोपवावी, म्हणजे मग पुस्तकाचे यथोचित मूल्यमापन होते. प्रस्तावना कशी प्रौढ, गंभीर असली पाहिजे. ती लिहिताना सुपरलेटिव्हजचा मोह टाळायला हवा. वर कबुली दिल्यानुसार मराठी भाषेचा अभ्यासक नसल्याने लिखाणाची शास्त्रोक्त फोड करून त्यातील घटक, अलंकार वगैरे वेगवेगळे करणे व त्यांचे सौंदर्य या इतर गुणावगुणांचे विवरण करणे, त्यांचा एकत्रित परिणाम विशद करून सांगणे, विनोदाच्या नेमक्या जाती ओळखून त्यांतील मर्म स्पष्ट करून सांगणे इत्यादी प्रकार येथे करता आले नाहीत; पण वस्तुस्थिती अशी आहे, की सुपरलेटिव्हज टाळायचे असतात हे चांगलेच माहीत असूनही त्या मोहाला उघड सामोरे जाणे येथे आवश्यक वाटले. बब्रूवान रुद्रकंठावार यांचा प्रत्यक्षात परिचय नाही; फोनवर मोजके बोलणे झाले तेवढेच. त्यामुळे त्यांच्या प्रत्यक्ष लिखाणातून जे जाणवले तेवढेच सामान्य वाचकाप्रमाणे लिहिले आहे. असो.

तर गमतीची गोष्ट अशी, की विनोदी लेखक म्हणून बब्रूवान यांचे सरळ वर्णन करणे आपल्याला पटत नाही. हे म्हणजे पिग्मॅलियन (‘माय फेयर लेडी’चे मूळ रूप)चे लेखक बर्नार्ड शॉ यांची विनोदी नाटककार म्हणून बोळवण करण्यासारखे झाले (ही तुलना नसून नुसते उदाहरण आहे). पु. ल. देशपांडे किंवा आचार्य अत्रे बोलण्यासाठी उभे राहिले, की लोक हसण्यासाठी सावरून बसत किंवा आधीच हसू लागत. बब्रूवान यांच्या लिखाणात विनोद आहेच; नाही कसे म्हणणार? पण पु ल किंवा अत्रे किंवा दादा कोंडके, लक्ष्मीकांत बेर्डे स्टेजवर उभे राहत ते लोकांना हसवण्याच्या ईर्षेने. त्या चौघांना एकाच रांगेत घेतले म्हणून पुष्कळ लोक संतापतील; पण तुलनेसाठी तसे करण्यास काय हरकत आहे? त्या चौघांनाही विनोदबुद्धीचे वरदान होते आणि त्याबद्दल आपणास अतीव आदर आहे. ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांच्या हस्ते बब्रूवान यांना ‘टिर्ऱ्या, डिंग्या आन् गळे’ या पुस्तकासाठी औरंगाबादेस स्वर्गीय लेखक बी. रघुनाथ यांच्या स्मरणार्थ असलेले पारितोषिक प्रदान करताना रसाळ यांनी भाषण केले होते, त्याचा तर्जुमा पाहिला आहे. रसाळ यांनी त्या भाषणात बब्रूवान यांच्या लेखनाचे केलेले अभ्यासपूर्ण रसग्रहण मोठे मर्मग्राही व विचक्षक आहे. त्यात त्यांनी बब्रूवान यांच्या लेखनाची तुलना लीलाधर हेगडे व तंबी दुराई यांच्याशी केली होती. त्यामध्ये आणखी दोन नावे जोडण्यास हरकत नाही. एक गतकालीन दत्तू बांदेकर यांचे आणि दुसरे ब्रिटिश नंदी ऊर्फ प्रवीण टोकेकर यांचे. ही तुलना तात्पुरती तरी आपल्याला मान्य करायला हरकत नाही.

परंतु बब्रूवान यांच्या लेखनाचे मोल केवळ विनोदी स्तंभलेखक म्हणून करणे योग्य होईल का असा प्रश्न पडतोच. विनोदी स्तंभलेखनासाठी समकालीन अशी राजकारणातील किंवा समाजकारणातील विनोदी सिच्युएशन _babaruwan-yanche-sahityaनिवडावी तरी लागते किंवा तिला तसे मुद्दाम वळण द्यावे लागते. आता खास, विनोदी स्तंभ लिहायचा म्हणून बब्रूवान बैठक मारत असतील असे वाटत नाही. त्यांच्या लिखाणात स्पेसिफिक अशी आजकालची न्यूज-ओरिएंटेड घटना किंवा सिच्युएशन नसतेच. त्यांनी निर्माण केलेली ‘आमादमी’ पात्रे आपापले सामान्य जीवन जगत असतात. त्यांच्या जगण्याचे, समस्यांचे, संभाषणांचे, भाष्यांचे ते फक्त चित्रिकरण करतात. त्यात ते त्यांची जी भाषा वापरतात व संभाषणातून जे नेहमीचे विषय चर्चिले जातात, त्यातून आपोआप सौम्य विनोदनिर्मिती होत असावी. लेखकाच्या नकळत! सुरुवातीला ‘धम्माल’, ‘अफलातून’, ‘जबरा’, ‘तुफान’, ‘डेडली’ वगैरे विशेषणे काही ठिकाणी वापरली आहेत. ती बब्रूवान यांना अपेक्षित नसावीत. त्या त्या वेळी दाद देण्यासाठी ती वापरावीशी वाटतातच; पण खदाखदा हसवणारा अंगविक्षेपी असा त्यांचा विनोद नव्हे, की कोटीबाजही नव्हे. त्यांना शब्दांवर कोट्या करण्याची हौसही दिसत नाही. विनोदी लेखक सहसा, एरवी दैनंदिन आयुष्यातही पावलोपावली कोट्या करण्यासाठी प्रसिद्ध असतात. परिचय नसल्याने बब्रूवान यांचे आपल्याला माहीत नाही. खरे मनापासून सांगायचे, तर त्यांचा विनोद मन उत्फुल्ल करतो असेही नाही. वाचून थोडे मनातल्या मनात हसण्यास होते हे खरे. चेहऱ्यावर स्मितही उमटते; पण बव्हंशी विषादयुक्त स्मित उमटते. वाचक अस्वस्थ होतो. एखादा विचित्र सामाजिक, सांस्कृतिक पेच, त्यातून निर्माण होणाऱ्या सिच्युएशन्स व त्यांचा औपहासिक अथवा औपरोधिक अन्वयार्थ याची चर्चा दोन मित्रांमध्ये होते. त्यामध्येच हा अदृश्य विनोद लपलेला असतो.

वर उल्लेखल्याप्रमाणे संगणक-डिजिटल तंत्रज्ञानाने मनुष्याच्या दैनंदिन जीवनात, माणसाच्या भावविश्वात, विचार करण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल करत आणले आहेत. मराठी भाषादेखील त्यामुळे वेगाने बदलू लागली आहे. बदलती जागतिक परिस्थिती, मार्केटचा जगड्व्याळ व्याप, सगळ्या जगाला गिळंकृत करणारा मार्केटचा पसारा, त्यातून बदलणारी जागतिक समीकरणे, जीवनमूल्यांची दाणादाण, नीतिअनीति संकल्पनांची तोडफोड आणि माणसांची विस्कटलेली मनःशांती... या सगळ्या खळबळींची छाया बबऱ्या आणि दोस्ताच्या मनस्थितीवर, त्यांच्या संसारावर, त्या छोट्या शहरातील नजीकच्या परिसरावर पडली आहे. त्याचे पडसाद त्या मित्रांच्या डायलॉग्जमध्ये, दोन कुटुंबांच्या संबंधांमध्ये, शहरातील समाजाशी होणाऱ्या इंटरअॅक्शनमध्ये उमटताना दिसतात (तुलना करायची नाही; परंतु जगातील बरेचसे पुरातन तात्त्विक वाङ्मय गुरू-शिष्यांच्या अथवा दोन व्यासंगी तत्त्वज्ञांच्या डायलॉग्जमधून येते. जसे, की औपनिषदिक किंवा सॉक्रेटिस-प्लेटो यांचा डायलॉग). त्या साऱ्या खळबळी व्यक्त करण्यासाठी बब्रूवान यांनी तो फॉर्म निवडला असावा.
खरोखर, चोवीस तास टीव्ही, इंटरनेट, फेसबुक, व्हॉट्सअॅप इत्यादी गोष्टींनी मनुष्यजीवनात केवढी उलथापालथ केली आहे! त्या सगळ्यांशी जुळवून घेताना धाप लागते. बबऱ्या आणि त्याचा दोस्त त्यांच्या कुटुंबीयांसह त्या वावटळीत सापडले आहेत. वाचकांना त्यांची धावपळ या संवाद-सत्रांमध्ये, एकमेकांना सांगितलेल्या किश्श्यांमधे वाचून थोडी मौज वाटते खरी; पण मन अंतर्मुख होते, विषण्णही होते. किंबहुना; मौजेपेक्षा विषण्णता आणि कारुण्य यांचे प्रमाण अधिकच. गंमत, टवाळी आहे खरी; पण त्या आड हे कारुण्य. बाईकवर फुलांचे हार व फुलांनी गच्च भरलेली टोपली घेऊन जाणारा माणूस खड्ड्यात पडतो व फुलांखाली गाडल्यासारखा होतो. लोक त्याला हसतात. शहरात घडलेला हा किस्सा बबऱ्या गंभीरपणे, उदास चेहऱ्याने दोस्ताला सांगतो. दोस्त मनकवडा. तो ओळखतो, हा खड्ड्यात पडलेला माणूस म्हणजे बबऱ्याच! हसणारे बघे म्हणजे आपण वाचक तर नव्हे? वाचकांनीच ठरवावे. वर सुचवल्यानुसार बब्रूवानांच्या लिखाणाला सामाजिक व राजकीय परिमाण आहे. उपरोध व विनोद तर आहेच; पण त्यापेक्षा विषण्णता, कारुण्य व दुःख यांची मात्रा किंचित जास्त आहे. म्हणूनच ते हलवून सोडते. प्रत्येक लेखाच्या शेवटची कंसातील भाष्ये अंतर्मुख होऊन विचार करण्यास लावतात. म्हणूनच त्यांचे लिखाण विनोदाचे आवरण फोडून वरची उंची गाठते.

धनंजय चिंचोलीकर 9850556169
c.dhanu66@gmail.com

-अरुण मार्तंड साधू 

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.