निसर्गोपचार सेवक – (डॉ.) गिरीधर काळे (Giridhar Kale)


-giridhar-kaleगिरीधर काळे हे शिक्षणाने डॉक्टर नाहीत. पण, त्यांना बिबीगाव परिसरातील समाज डॉ. गिरीधर काळे या नावाने ओळखतो. त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वसामान्य आहे, पण ते करत असलेले कार्य असामान्य आहे. त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे, परंतु त्यांच्या हातात निसर्गोपचार चिकित्सापद्धतीने अस्थिरुग्णांना उपचार करून दिलासा देण्याचे उत्तम कसब आहे. ते दररोज शंभरेक लोकांना निःशुल्क आणि निःस्वार्थ सेवा देत आहेत. त्यांच्या समाजकार्यामुळे ‘बिबी’ गावाची ओळख सर्वदूर होत आहे. त्यांचे वय फक्त एकोणपन्नास वर्षें आहे.

‘बिबी’ गाव चंद्रपूर जिल्ह्याच्या कोरपना तालुक्यात आहे. ते जिल्ह्याच्या ‘राजुरा’ तालुक्यातील गडचांदूरजवळ आहे आणि जिल्हा ठिकाणापासून पन्नास किलोमीटर अंतरावर येते. तेथे काळे राहतात. त्यांच्याकडे सकाळपासून लोकांची रांग लागलेली असते. त्यांच्याकडे कोणी हात मोडला म्हणून, कोणी पाय मोडला म्हणून, कोणी लचक भरली म्हणून, कोणी पाठ आखडली म्हणून, कोणाचा खांदा घसरला म्हणून, तर कोणी मनगट दुखावले म्हणून उपचारासाठी आलेले असतात. बहुतेकांचे दुखणे हाडाशी संबंधित असते.

काळे यांचा सेवादरबार चालतो. काळे यांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. ते त्यांचे दैनंदिन सेवाकार्य आटोपले, की भोजनोपरांत काळ्या आईची सेवा करतात. तेवढेच नव्हे; तर तातडीचे कोणी रुग्ण आल्यास, त्यांची तयारी त्या ठिकाणी, म्हणजे शेतावरही उपचार करण्याची असते.

रुग्ण त्यांच्याकडे उपचारासाठी दूरवरून येत असतात. जवळपासच्या राज्यांतूनही येणारे रुग्ण आहेत. त्यांच्याकडे इटालीतील महिलेने उपचार घेतल्याचे वर्तमानपत्रांतून वाचण्यास मिळाले व माझे औत्सुक्य जागे झाले. काळे यांची माफक अपेक्षा अशी, की त्यांच्या हाताला लोकांचे दुखणे कमी करण्याची कसब-कला आहे, ती लोककल्याणार्थ झिजावी! तो अवलिया हसतमुखाने आलेला दिवस उपचाराच्या सेवेत घालवतो. त्यांच्या अशा सेवार्थी स्वभावामुळे त्यांच्या मित्रमंडळात एका हाकेला धावून जाणाऱ्यांची संख्या कमी नाही. ‘गिरीधर काळे मित्रमंडळ’ रक्तदान शिबिरांचे आयोजन करत असते. अविनाश पोईनकर हे गिरीधर काळे यांच्या मित्रपरिवारातील सदस्य पूर्व विदर्भातील युवाकवी आहेत.

हे ही लेख वाचा - 
निवृत्ती शिंदे - खडकमाळेगावचे बेअरफूट डॉक्टर
मी कराडची होऊन गेले – सुलभा ब्रम्हनाळकर

सच्चे मानवतावादी मानवटकर डॉक्टर दांपत्य
 

मी त्यांच्याकडे उपचारार्थ आठेक वर्षांपूर्वी गेलो होतो. माझा डावा हात नेहमीपेक्षा कमी कार्यक्षम वाटत होता. त्यांनी तेव्हा चाचपणी करून व्यायाम व मालिश असा सल्ला दिला होता. मी दुचाकीवरून त्याच हातावर श्वान मध्ये आल्याने दोन वर्षांपूर्वी पडलो. बाह्य दुखापत नव्हती, पण खांदा घसरला (डिसलोकेट) होता. तेव्हा त्यांच्याकडे दोनदा जाणे झाले. ते कोठलीही भूल न देता उपचार करतात. ते बोलता-बोलता केव्हा झटका देतात ते लक्षातही येत नाही. अगदी बेमालूम. मात्र बघ्यांना रुग्णांच्या ‘आई गं’, ‘बाप रे’, ‘मेलो रे, बाप’ अशा आवाजांनी खुदकन हसू आल्याशिवाय राहत नाही. उपचाराचा कार्यक्रम घरापुढील टेबलवर किंवा दरवाज्यात बसून खुलेआम चालू असतो. प्रत्येक रुग्णाला त्याचा नंबर येईल तेव्हा तो माणूस काय करेल असेच वाटत असते. काही म्हातारे किंवा कमी वयाचे रूग्ण तर शिव्यासुद्धा हासडतात. कधी गंमत वाटते तर कधी धडकी भरते. मला तर ते सगळे पाहून माझा उपचार सुरू होण्याआधीच भोवळ आली होती. ते जर रुग्णावर उपचार शक्य असेल तर ‘हो’ म्हणून त्याला थांबण्यास सांगतात, नाहीतर त्याला डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला देऊन मोकळा करतात. काळे म्हणाले, की चंद्रपूर जिल्ह्यातील दोन-तीन ऑर्थोपेडिक सर्जन त्यांच्या संपर्कात आहेत. ते चेहरा पाहून उपचार करत नाहीत. त्यांचे लक्ष फक्त वेदनेवर अर्जुनासारखे असते.

गिरिधर काळे यांचे त्यांच्या वयाच्या सोळाव्या वर्षापासून अस्थी रुग्णांची सेवा करणे चालू आहे. त्याला तेहतीस वर्षें झाली. त्या कालावधीत सुमारे चार लाखांपेक्षा अधिक रुग्णांनी त्यांच्या उपचाराचा निःशुल्क लाभ घेतला आहे. ‘बिबी’ गावाच्या ग्रामसभेने त्यांना डॉक्टर या उपाधीने सन्मानित करून तसा ठराव 26 जानेवारी 2015 ला पारित करून घेतला. भारतातील ग्रामसभेने सन्मानित झालेले कदाचित ते पहिलेच ‘डॉक्टर’ असावे.

गिरीधर जी काळे 9823913542

- गोपाल शिरपूरकर gshirpurkar@gmail.com

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.