महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती नवे दालन - खाद्यदालन


खाद्यपदार्थांचे अनेक प्रकार काळानुसार, ठिकाणानुसार, वातावरणानुसार, धार्मिक घटकांनुसार तयार होत गेले. त्याची झलक ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर असलेल्या ‘भारताच्या खाद्यसंस्कृतीचा इतिहास’ आणि ‘खाद्यसंस्कृती महाराष्ट्राची’ या दोन लेखांतून जाणवते. त्यामुळेच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर ‘खाद्यदालन’ नावाचे नवे ‘पान’ सुरू करावे असे योजले आहे. त्यामध्ये मुख्यत: महाराष्ट्राच्या खाद्यजीवनासंदर्भातील सर्व काही मजकूर येऊ शकेल.

-heading

महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीत विशिष्टता आहे. मुळात भारतीय संस्कृतीत आहाराचा विचार सर्वांगीण म्हणजे पोषण, चव, रसास्वाद अशा अंगांनी केला गेला आहे – त्यातही महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृती विविध संस्कारांनी आणि मूलभूत विचाराने प्रभावित झालेली जाणवते. त्यामुळे जसे महाराष्ट्रात केळीचे पान डावीकडे व उजवीकडे असे पोषक, चवीष्ट अन्नपदार्थांनी सजवले जाते तसे आधुनिक काळात ‘मिसळ महोत्सव’ व ‘वशाट महोत्सव’ही होतात! महाराष्ट्राच्या खाद्यजीवनात सर्वाधिक विविधता आढळून येते. पदार्थांचे प्रकार – त्यांच्या पाककृती – त्यांतील मसाले – त्यांची नावे यांमध्ये प्रदेशांनुसारच नव्हे तर तालुका तालुक्यांत भिन्नता आढळून येते. उदाहरणार्थ - मुंबईतील भेळ ही चुरमुरे, कांदा, शेंगदाणे अशी मिश्रित असते. तर यवतमाळमध्ये भेळ कच्च्या तेलात परतलेले चुरमुरे आणि मसाला मिश्रित असते. उपम्याला काही भागांत उपीट म्हणतात, तर काही ठिकाणी शिरा आणि त्यात सूक्ष्म फरक असतो. 

मानवाला अन्न हे केवळ शरीराला आवश्यक म्हणून सेवन करायचे असते तर त्याने आदिमकाळाप्रमाणेच कंदमुळे खाऊन आजही पोट भरले असते. पण मानवाने त्यात वेगवेगळे प्रयोग करून त्यात पोषण मूल्ये आणली, चव आणली, विविधता आणली. खाद्यपदार्थांचे अनेक प्रकार काळानुसार, ठिकाणानुसार, वातावरणानुसार, धार्मिक घटकांनुसार तयार होत गेले. त्याची झलक ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर असलेल्या ‘भारताच्या खाद्यसंस्कृतीचा इतिहास’ आणि ‘खाद्यसंस्कृती महाराष्ट्राची’ या दोन लेखांतून जाणवते. त्यामुळेच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर ‘खाद्यदालन’ नावाचे नवे ‘पान’ सुरू करावे असे योजले आहे. त्यामध्ये मुख्यत: महाराष्ट्राच्या खाद्यजीवनासंदर्भातील सर्व काही मजकूर येऊ शकेल.

अन्न ही मानवाची मूलभूत गरज आहे. परंतु ती केवळ गरज नसून ते आर्थिक साधनही आहे. त्याचे प्रमुख उदाहरण मुंबई. मुंबईसारख्या ठिकाणी अनेक प्रांतांतील लोक एकवटल्याने त्यांच्या खाद्यप्रकारांचेही एकत्रिकरण झाले आहे. स्त्री-पुरुष दोघेही नोकरी-व्यवसायानिमित्त घराबाहेर पडत असल्याने, त्यांना न्याहरीपासून ते रात्रीच्या जेवणापर्यंतचे सर्वकाही पदार्थ कमी किंमतीत उपलब्ध झाले आहेत. त्यांचे ‘स्टॉल’ रस्त्यारस्त्यांवर पाहण्यास मिळतात. त्यातूनच ‘खाऊगल्ली’ हा प्रकार उदयास आला. तसेच, काही उपहारगृहे केवळ त्यांच्याकडे प्रसिद्ध असलेल्या विशिष्ट पदार्थामुळे ओळखली जाऊ लागली. एवढ्या झपाट्याने विकसित होत गेलेले संस्कृतीचे दुसरे अंग नसेल!

‘थिंक महाराष्ट्र’वरील ‘खाद्यदालन’ या सदरामध्ये महाराष्ट्राच्या जीवनाचा हा पैलू सर्व बाजूंनी व सर्व प्रकारांनी सर्व तपशिलांनिशी प्रदर्शित व्हावा असे वाटते. तेथे महाराष्ट्रातील जंगलात शिजवलेल्या पदार्थापासून ते पंचतारांकित उपहारगृहातील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यास मिळावा. मुळात ती माहिती सच्ची असावी. सांस्कृतिक खाद्याप्रमाणे स्ट्रीट फूड, खाऊ गल्ली, फास्ट फूड तसेच अन्नव्यवस्था, खाद्याबाबतची निरीक्षणे-अनुभव, बदलत चाललेली खाद्यसंस्कृती, लोकांची आवड, सकस आहार अशा सर्व बाबींचा समावेश असावा. महाराष्ट्राच्या खाद्यपदार्थाचे वैशिष्ट्य त्यातून प्रतीत व्हावे, तत्संबंधी माहिती समग्र रूपाने लोकांना प्राप्त व्हावी अशी आहे. त्यामुळे, खाद्यदालनाचा प्रमुख उद्देश तालुक्या तालुक्यांतील आणि वेगवेगळ्या समाजगटांतील अन्नपदार्थांची विविधता व त्यांची वैशिष्ट्ये जाणवून देणे हा आहे. त्या दृष्टीने माहिती संकलन करण्याची इच्छा आहे. कृपया तुम्हीदेखील तुमची माहिती, तुमचे अनुभव असे साहित्य पाठवावे.

- नेहा जाधव 8692051385, 9653229179
थिंक महाराष्ट्र डॉट कॉम

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.