केतकी चितळेचे मराठी काय चुकले?


-ketaki-chitaleसध्याच्या काळात ‘ट्रोल करणे’ ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. ट्रोल करणे या संकल्पनेमागचा हेतू वाईट नाही. त्यामागे समाजातील चुकीच्या अभिव्यक्तीला अद्दल घडवणे, सामाजिक माध्यमांमार्फत न्याय मिळवणे हा हेतू शुद्ध आहे. परंतु त्याच्या गैरवापरामुळे समाजाचे संस्कार आणि संस्कृती यांचा पाया मोडत आहे व त्याचे भान तरुण पिढीला उरलेले नाही.

ट्रोलचे असेच एक प्रकरण सध्या महाराष्ट्रात गाजत आहे, ते म्हणजे केतकी चितळे. केतकी चितळे ही मराठी अभिनेत्री आहे. तिला मी ‘स्टार प्रवाह वाहिनी’वरील ‘आंबट-गोड’ या मालिकेत प्रथम पाहिले. ती त्या मालिकेत ‘अबोली’ ही भूमिका साकारत होती. विनोदी मालिकेतही अबोली नावाची सून संसारातील आंबट-गोड प्रसंगांत सर्वांना एकत्र आणते. त्यामुळे अबोली सर्व प्रेक्षकांची लाडकी झाली. त्यानंतर तिने ‘झी मराठी वाहिनी’वरील ‘तुझं-माझं ब्रेकअप’ मालिकेत किल्ल्यांवर जाऊन तेथे तोफांवर बसून केलेल्या शूटिंगमुळे ती वादात सापडली. तो प्रसंग वर्षाआधी घडला असला, तरीही ते प्रकरण जास्त शिगेला पोचले नाही. ती तिच्या स्वतःच्या ‘फेसबुकवरील पेज’वर मुंबईला ‘बॉम्बे’ उच्चारणे, मराठीचा आग्रह धरणाऱ्या व्यक्तींचा अपमान करणे, शुद्धलेखन सांगतानाही घाणेरड्या शब्दांचा प्रयोग करणे या वर्तनामुळे सतत मराठी भाषेच्या वापरासंबंधी वादात राहिली आहे.

तिने काही दिवसांपूर्वी फेसबुक लाईव्हवरून श्रोते-प्रेक्षक यांच्याशी गप्पा मारल्या होत्या. तिला प्रेक्षकांचा मराठीतून बोलण्याचा आग्रह सतत असूनही ती अनेकदा हिंदीत आणि इंग्रजीत संवाद साधते. त्यापूर्वी तिने ती हिंदी आणि इंग्रजी भाषांतून का बोलणार आहे त्याचा खुलासा करताना म्हणाली, - “मी माझ्या मराठी बांधवांना सुरुवातीलाच सांगू इच्छिते, की मला फक्त मराठी भाषिक लोकं फॉलो करत नाहीत, तर इतर भाषिकही फॉलो करतात. त्यामुळे मला त्यांच्याशी संवाद साधावा लागतो. त्यामुळे त्या दिवशीचा व वेळेचा व्हिडिओ हिंदी आणि इंग्लिश भाषांमध्ये असेल. त्यामुळे कृपया मराठीचे झेंडे फडफडवू नका. हिंदी आपली राष्ट्रीय भाषा आहे. कमीत कमी ती तुम्हाला येणे अपेक्षित आहे. म्हणून कृपया कमेंटमध्ये ‘मराठी विसरलीस का?’ ‘मी मराठी आहे म्हणून मराठीच बोलायला हवे’ असे सल्ले देऊ नका. तिच्या त्या वादग्रस्त टोमण्यामुळे मराठी प्रेक्षकवर्ग रागवला. तिच्यावर फेसबुकवरून वापरकर्त्यांनी टीकेची झोड उठवली. खरे तर, मीही तिच्या त्या वर्तनावर नाराज होऊन त्या उद्धटपणास विरोध केला. आणखीही काही ठिकाणी माझ्या प्रतिक्रिया दिल्या. पण बघता बघता, तो वाद इतका टोकाला गेला, की तिला वैयक्तिक बलात्कार करण्याच्या धमक्या दिल्या गेल्या. तिला वादग्रस्त विधानाबाबत टीकेला सामोरे जावे लागलेच, पण अश्लील आणि अपशब्दात्मक धमक्यांनाही तोंड द्यावे लागले. पण त्या टीकेचे उत्तर तिने जे दिले ते सर्व टीका करणाऱ्या, मराठीवर उथळ प्रेम दाखवणाऱ्या तरुणांच्या डोळ्यांत अंजन घालणारे आहे. विशेषत: मराठीसाठी विविध साहित्य संस्थांनी गाऱ्हाणे घातलेले असताना तिचे म्हणणे फार महत्त्वाचे ठरते.

केतकीने ट्रोलर्सच्या प्रतिक्रियांना उत्तर पुन्हा फेसबुक लाईव्ह संभाषण करूनच दिले. त्यात तिने प्रेक्षकांच्या काही निवडक घाणेरड्या कमेंटच्या अशुद्ध लिखाणाचा शुद्ध उच्चार बिनदिक्कत सांगितला. खरे तर, ते शब्द तिला लागणारे होते. त्यात तिने प्रेक्षकांना ‘देतास का नाही रे म्हणायचे देतेस का?’ असे लिहितात! अशा शैलीत उत्तरे दिली. त्यात ती पुढे जे म्हणाली ते विचार करण्यासारखे होते. ती म्हणते, “मी एका व्हिडिओत मराठीविषयी बोलले नाही, जाहीर प्रेम दाखवले नाही, मी मराठीचा बाणा लावला नाही, झेंडे फडफडवले नाही, तर माझी मातृ आणि पितृ भाषा मोडकळीला लागेल, एवढी ती तकलादू नाही. मला माझ्या भाषेवर प्रेम दाखवावे लागत नाही. परंतु आता तुम्हा लोकांची शिवीगाळ व अपमानास्पद टीका ऐकल्या-वाचल्यानंतर मला लाज वाटते, महाराष्ट्र माझा म्हणायला! एका स्त्रीचा निषेध करण्यासाठी तिच्यावर अश्लील भाषेत शेरेबाजी करावी लागते, शिवीगाळ करावी लागते, तिचा बलात्कार करावा लागतो, असा महाराष्ट्र माझा नाही”.

हे ही लेख वाचा-
आग्रह मराठी भाषेच्‍या शुद्धतेचा!

मराठी भाषा आणि मराठी माणूस
सुरेश भट, आयुष्यभर लढतच राहिले!

 

मी म्हणणार नाही, की तिची चूक नव्हती. पण तिला अश्लील शब्दांत उत्तरे देणाऱ्या तरुणांची चूक जास्त आहे हे नक्की. आपण आपल्या नावापुढे इंग्रजी शब्द लावतो आणि दुसऱ्याला मराठीचा अभिमान करण्यास सांगतो. ज्यांनी धमक्या आणि शिव्या दिल्या त्यांना स्वतःच्या प्रतिक्रियाही शुद्ध मराठीत लिहिता आल्या नाहीत!  अशांनी समोरच्या व्यक्तीला मराठीत व्यवहार कर असे सांगणे म्हणजे वेडेपणाचे लक्षण आहे. रामदास स्वामी म्हणतात, अभ्यासे प्रगट व्हावे । नाहीतरी झाकोनी असावे । प्रगट होवोनी नासावे । बरे नव्हे ॥’. मराठीचा अभिमान असायला हवा. पण आधी ती नीट उच्चारता आणि लिहिता आली पाहिजे. ते तितकेच महत्त्वाचे नाही का? स्वत:च्या मायमराठीवर प्रेम करण्यासाठी कोणत्यातरी स्त्रीवर बलात्कार करावा वाटतो हा मराठीचा पोकळ अभिमान कशाला हवा?

सध्याचा काळ हा सामाजिक माध्यमांचा काळ म्हणून नावारूपाला येत आहे. मोबाईल हाताळता येणाऱ्या लहान बालकापासून ते वय वर्षें ऐंशी उलटलेल्या वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत बरेचजण सामाजिक माध्यमांच्या अधीन झाले आहेत. युट्युबवर कोणत्याही विषयासंबंधात तंत्रज्ञानाच्या शिक्षणापासून घरात भात कसा शिजत घालावा अशी सर्व माहिती सहजच मिळते. त्यामुळे जग जरा जास्तच हुशार झाले आहे. दूरचित्रवाणीवर जे पाहण्यास मिळत नाही, जी प्रसिद्धी मिळत नाही, ते सर्व युट्युब चॅनलच्या माध्यमातून सहज मिळू लागल्याने ‘लाईक’ मिळवण्याच्या नादात झालेल्या चुकांबद्दल अनेक मालिका चालकांना (युजर्स) ट्रोलचा सामना अनेकदा करावा लागत आहे. त्यातच महाराष्ट्रातील दुसरी समस्या म्हणजे युट्युबवर जास्त प्रेक्षकवर्ग मिळवायचा असेल, तर अनेक मराठी व्यक्ती इंग्रजी आणि हिंदी भाषांचा पर्याय निवडतात. त्याचे कारण म्हणजे, मराठी भाषा बोलणारे आणि समजणारे सीमित असल्याने त्यांना हिंदी आणि इंग्रजी भाषांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे माध्यमांमध्ये मराठी भाषा मागे पडत आहे. त्या कारणाने मराठी भाषिक तरुण मंडळींनी मराठीमध्ये बोलण्याचा आग्रह धरला आहे. हा आग्रह अजिबात गैर नाही.

पैसे कमावण्याच्या नादात करिअर आणि व्यवसाय यांसाठीचा पर्याय म्हणून सामाजिक माध्यमे असली तरीही त्यात अनेक गोष्टी समाजस्वास्थ्याला घातक आहेत. त्याचे दर्शन वेळोवेळी घडते. ‘केतकी चितळे प्रकरण’ हे त्याचेच एक उदाहरण आहे.

मराठी भाषेचे सौंदर्य अमाप आहे. तिला केवळ शिव्यांमध्ये आणि अपशब्दांमध्ये अडकवू नका. माध्यमांतून महाराष्ट्राच्या कणाकणात, रगारगात, धमन्यांमधून, नभातून, पिकांतून, फुलांतून, नदीतून तिला सुरेश भट यांच्या कवितेसारखी वाहू द्या, गर्जू द्या, न्हाऊ द्या. आजच्या तरुण पिढीने मराठीला शिव्याशापामध्ये न अडवता मराठी भाषेला प्रगल्भ होऊ द्या. तरुणांनी आज ‘मराठी बोला चळवळ’सारख्या अनेक चळवळी उभारणे व मराठीला टिकवण्याच्या प्रयत्नात सहभागी होणे गरजेचे आहे.

 - नेहा जाधव 8692051385
nehajadhav690@gmail.com

लेखी अभिप्राय

Good article.

anilkulkarni66…27/06/2019

अगदी योग्य लेखन.

Pravin27/06/2019

तो विषय छान हाताळला.

सुनिल पवार 27/06/2019

छान लेख.

Mahesh Gawas27/06/2019

तुझा लेख वाचला. दोन्ही बाजूंचा समन्वय साधून महाराष्ट्रातील सुज्ञ वाचकांस विचार करण्यास लावणारा आहे. केतकी चितळे या त्यांची चित्रफित करताना साफ चुकल्या हे मान्य आहे. त्यांनी मराठीबद्दल तसे बोलायला नको होते. पण त्यांना ट्रोल करताना ट्रोलर्सनी स्वतःच्याच भाषेचा पुनश्च अपमान केला आहे. ही जाणीव ठेवली पाहीजे. मराठी प्रेमाची परिणती अशी होऊ नये, की आपल्याच भाषेतून त्यांचा अपमान व्हावा. शेष, लेख उत्कृष्ट! मन:पूर्वक अभिनंदन! धन्यवाद.

सुधांशू सुधीर …27/06/2019

छान लिहिलेस. मुद्दे चांगले मांडले आहेत. मला आणखी एक मुद्दा मांडायचा आहे.
केतकी चितळे यांनी त्यांना दिलेल्या चांगल्या टिप्पण्यांना उत्तर न देता त्या डिलीट केल्या. यावरून त्यांचा हेतू स्पष्ट होतो. त्याबद्दल मी मते मांडली आहेत. ती सोबतच्या दुव्यावर वाचू शकता. https://www.inmarathi.com/second-side-of-ketaki-chitale-conspiracy/

चंदन तहसीलदार27/06/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.