अंबाजोगाईतील पुस्तक चळवळ


-heading बीड जिल्ह्याच्या  अंबाजोगाईमधील ‘अनुराग पुस्तकालय’ हे केवळ पुस्तकाचे दालन नाही, तर विविधांगी वाचणास प्रेरणा देऊ पाहणारे ठिकाण आहे. अभिजीत जोंधळे यांचे कुटुंब तेथेच राहते. त्यांचे कुटुंबच पुस्तकप्रेमी आहे. त्यांच्या घरी स्वत:ची पंधराशे पुस्तकांची ग्रंथसंपदा आहे. त्यांनी घरीच पुस्तकांचे दुकान थाटले आहे. त्यांना त्यांच्या शहरातील लोकांना साहित्यविषयक पुस्तके सहज उपलब्ध झाली पाहिजेत असे मनोमन वाटे. म्हणून हा उद्योग. त्यांनी ‘अनुराग पुस्तकालय’ सुरू 2006 साली केले. ते पुस्तकांचे नुसते दुकान नाही, तर पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या माणसांचा कट्टाच आहे. पुस्तके हाताळावी असे वाटणाऱ्या चिमुकल्यांसाठी तो एक खजिनाच आहे. अभ्यास करणाऱ्यांसाठी ते ज्ञानभांडार आहे.

अंबाजोगाईला  मराठी साहित्याची मोठी परंपरा आहे. तेथे मराठीचे आद्यकवी मुकुंदराज यांची समाधी आहे. संत सर्वज्ञ दासोपंत यांचेही वास्तव्य तेथे होते. अंबाजोगाईत अनेक प्रकारची साहित्य संमेलने होत असतात. तेथे व्यंकटेश माडगूळकर यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय साहित्य संमेलन 1983 साली भरले होते. त्या शिवाय मराठवाडा साहित्य संमेलन, ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’च्या अंबाजोगाई शाखेची साहित्य संमेलने वेळोवेळी होत असतात. अन्य अनेक सांस्कृतिक कार्यक्रमही नेहमी चालू असतात. तेथे अनेक नामवंत साहित्यिक आणि वक्ते यांची ये जा असते.

अभिजीत शिक्षण आणि व्यवसायानिमित्त औरंगाबाद येथे काही काळ होते. त्यानंतर ते अंबेजोगाईला आले. ते पुण्याच्या ‘ज्ञान प्रबोधिनी’च्या अंबेजोगाईतील विस्तार केंद्राचे काम पूर्ण वेळ पाहू लागले. अभिजीत यांचे संगोपन पुस्तकांच्या सोबतीने झाले आहे. त्यांचे वडील पुस्तकप्रेमी होते. अभिजीत यांना त्यांच्याबरोबर मोठ्या अक्षरातील ‘श्रीमान योगी’ वाचल्याची आठवण आहे. त्यामुळे पुस्तकांची विक्री एवढेच उद्दिष्ट त्यांच्या नजरेसमोर नव्हते तर त्यामागे संस्कारशील काम करण्याचा विचार होता. सर्व क्षेत्रांतील लोकांना लागणारी विविध पुस्तके त्या त्या लोकांपर्यंत पोचली पाहिजेत, अभ्यास करणाऱ्यांनी संदर्भ ग्रंथाचा आधार घेतला पाहिजे, शिक्षकांना त्यांच्या विषयाची ग्रंथसंपदा उपलब्ध झाली पाहिजे, अंबेजोगाई आणि परिसरातील शाळा-महाविद्यालये ग्रंथसंपदेने नटली पाहिजेत; इतकेच नाही, तर घराघरात पुस्तके मुलांसोबत रेंगाळली पाहिजेत, असे विविध उद्देश कम स्वप्ने अभिजीत यांच्या मनात होती. तो प्रत्येक उद्देश पंधरा वर्षांनंतर साध्य होताना स्पष्टपणे दिसतो. 

पुस्तकालयात ‘बुक क्लब’ सुरू करण्याची कल्पना प्रा. आर. डी. जोशी यांची. पुस्तके वाचणाऱ्या लोकांनी एकत्र यावे हा त्यामागील उद्देश होता. त्यांतील सभासदांनी प्रत्येकी दरमहा शंभर रूपये जमा करून हवी ती पुस्तके घ्यावीत आणि ती सर्व पुस्तके गटातील सभासदांना वाचण्यास उपलब्ध असावीत ही त्यामागील कल्पना. अशा प्रकारे प्रत्येक वाचक दरमहा एक पुस्तक घेत असे, पण तो अनेक पुस्तके वाचू शकत असे. त्यातून प्रत्येकाचा ग्रंथसंग्रह वाढेच, पण वाचनाची प्रेरणा मिळे. चर्चेने कुतूहल वाढे. त्यातून इतरांच्या आवडीची पुस्तकेही प्रत्येक सभासदाला कळून येत. त्यातून वाचकांना आवडलेली पुस्तके हप्त्या हप्त्यात खरेदी करण्याची सोयही मिळते. क्लबमुळे वाचनप्रेमींचे गट तयार झाले आणि विविध पुस्तकांवर सकारात्मक चर्चा होऊ लागली. शिक्षक, प्राध्यापक, पत्रकार, अभ्यासू वाचक असे मिश्र गट ‘बुक क्लब’मुळे एकत्र बसून चर्चा करू लागले.

-bookclubअभिजीत यांचे निरीक्षण असे आहे, की ‘रोहन’, ‘राजहंस’, ‘मनोविकास’ हे सध्या अग्रगण्य प्रकाशक आहेत. त्यांच्या विशेष पुस्तकांच्या दोनशे-तीनशे प्रती बीड जिल्ह्यात जाऊ शकतात. अच्युत गोडबोले हा सध्या सर्वांत जास्त वाचला जाणारा लेखक आहे. वाचकांना लेखक, व्यावसायिक व माणूस म्हणून त्यांच्याबद्दल कुतूहल आहे. अभिजीत यांनी वाचकांच्या चांगल्याण प्रतिसादामुळे पुस्तकांची सवलत योजना आणली. पुस्तके उपलब्ध करून देतानाही काही सवलत योजनांमधील पुस्तके त्या त्या वाचकांपर्यंत पोचवण्याचे काम त्या योजनेमधून सुरू झाले. खास सवलतीत असलेली ‘यांनी घडवलं सहस्रक’, ‘राजा शिवछत्रपती’, ‘सत्याचे प्रयोग’, ‘1857 चे स्वातंत्र्य समर’, सावरकरांच्या पुस्तकांचा संच, ‘श्यामची आई’, ‘लिहावे नेटके’ अशी पुस्तके मोठ्या प्रमाणावर वाचकांपर्यंत पोचवली गेली. काही पुस्तकांच्या दोनदोनशे प्रती या योजनेद्वारे वाचकांच्या घरापर्यंत पोचल्या असे अभिजीत यांनी सांगितले. 

त्याच ओघात ‘बुके नव्हे बुक’ ही अभिजीत यांची अफलातून कल्पना. त्यामधून लग्न, मुंज, वाढदिवस आणि विविध समारंभ यांमध्ये भेटवस्तू म्हणून बुके किंवा इतर वस्तू देण्यापेक्षा पुस्तके देण्याची संस्कृती अंबेजोगाईत रूजवली गेली आहे. संक्रांतीचे वाण म्हणून श्री नंदकिशोरजी मुंदडा यांनी ‘प्रिय आईबाबा’ या पुस्तकाच्या चार हजार प्रतींचे वाटप लोकांना केले.

‘अनुराग पुस्तकालया’त बाल साहित्यापासून ते संदर्भग्रंथांपर्यंत आणि बालकथांपासून ते कोश साहित्यापर्यंतची पुस्तके उपलब्ध आहेत. त्याखेरीज मागणीप्रमाणे पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. 

वाचनासोबत वाचकांनी लिहितेही झाले पाहिजे असेही अभिजीत यांना वाटले. त्यामधून सुरू झाला ‘अनुराग’चा दिवाळी अंक. त्यामध्ये सामाजिक, शैक्षणिक; तसेच, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची आणि त्यांच्या कार्याची ओळख करून देणारे ‘उत्तर शोधणारी माणसे’ हे सदर, चालू घडामोडींवर भाष्य करणारे मान्यवर लेखकांचे लेख, भटकंती, कथा, कविता आणि विशेष विषयावर तीन विविध दृष्टिकोनातील लेख असे विविध साहित्य असते. साधारण दोन हजार वाचक तो दिवाळी अंक तेरा वर्षांपासून आवर्जून वाचतात. कधीही काहीही न लिहिलेल्या लोकांना त्या अंकाने लिहिते केले. त्या अंकाच्या संपादनात ‘मैत्री गटा’चे सहकार्य नेहमी लाभत आले आहे.

पुस्तक वाचन चळवळीतील महत्त्वाचा टप्पा म्हणजे ‘पुस्तकपेटी’ योजना. नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या श्री विनायक रानडे यांच्याकडून प्रेरणा घेऊन ‘पुस्तकपेटी चळवळ’ अंबेजोगाईत सुरू केली गेली. ग्रामीण भागातील मुलांनी चांगली पुस्तके पाहिलेलीही नसतात. तशा ग्रामीण शाळांतील मुलांपर्यंत ‘पुस्तकपेटी’तून पुस्तके पोचवली जातात. मुलांनी पुस्तके वाचली पाहिजेत या एकमेव अटीवर ती पेटी पुरवली जाते. एका पुस्तकपेटीतील पुस्तके वाचून झाली, की ती पेटी परत देऊन दुसरी पुस्तकपेटी घेऊन जायची असते. एका पेटीत साधारण सत्तर ते ऐंशी वेगवेगळी पुस्तके असतात. पुस्तकपेटीसाठी प्रायोजक शोधले जातात. शाळेतील मुले प्रायोजकांना, वाचलेल्या पुस्तकांच्या लेखकांना पत्रे लिहितात; शालेय परिपाठामध्ये वाचलेल्या पुस्तकांविषयी माहिती देतात. त्या योजनेमधून मुले लिहिती झाली, व्यक्तही होऊ लागली आहेत.

‘अनुराग’तर्फे विविध कार्यक्रमांप्रसंगी, संमेलने, व्याख्यानमाला अशा ठिकाणी पुस्तकांची प्रदर्शने मांडली जातात. महाविद्यालयातील काही मुलांना तशा प्रदर्शनात पुस्तक विक्री करण्याचा अनुभव देण्यात येतो. त्यासाठी त्या मुलांना मानधन दिले जाते. त्या मुलांना वाचनासाठी प्रोत्साहित केले जाते. महिलांसाठी पुस्तकभिशीसारख्या योजना चालवल्या जातात. आसपासची वाचनालये पुस्तकांनी समृद्ध करण्यात ‘अनुराग चळवळी’चा मोठा सहभाग आहे. प्रवीण दवणे, विवेक घळसासी, शिवाजीराव भोसले, इंद्रजीत भालेराव, प्रसाद कुलकर्णी, वीणा गवाणकर, गिरीश कुबेर, दीपा देशमुख, अशोक राणे अशी मंडळी पुस्तकालयात येऊन गेली आहेत.

-mula-pustakपुस्तक चळवळ ही गावातील इतर सामाजिक, सांस्कृतिक संस्थांना जोडली गेली आहे. ‘मैत्री गटा’च्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून दिली जाते. अभिजीत अनेक सामाजिक विषयांवर व्याख्याने देऊन युवकांना प्रेरित करत असतात. पुस्तकांतील विचारांचे विश्व मुलांच्या मनाला समृद्ध करील आणि उद्याच्या सुसंस्कृत समाजामध्ये ती मुले नव्या प्रेरणा घेऊन येतील या विश्वासावर दृढ राहून ही ‘पुस्तक वाचन चळवळ’ पावले पुढे टाकत आहे.

अशोक राणे यांनी ‘अनुराग’ला भेट देऊन गेल्यावर लिहिले आहे - एकदा हृषीकेश मुखर्जी म्हणाले होते, तुम्हे दूध बेचना है तो घरघर जाना होगा, शराब बेचोगे तो लोग तुम्हारे पास आयेंगे. अभिजित जोंधळे घरोघर दूधाचा रतीब घालत आहेत.

जोंधळे त्यांच्या कलाप्रेमी मित्रांसह एक अनौपचारिक उपक्रम राबवतात. ती मंडळी महिन्यातून दोनदा जमतात आणि देशविदेशातील लक्षणीय चित्रपट प्रयत्नपूर्वक मिळवून पाहतात आणि त्यावर सर्वांगांनी चर्चा करतात. त्यातून त्यांची कलात्मक आणि सभोवतालाची जाण अधिक सखोल होते असा त्यांचा अनुभव आहे.

अभिजित जोंधळे नावाचा माणूस आणखीही बरेच उपक्रम राबवतो. त्यांपैकी महत्त्वाचा म्हणजे परिसरातील गरीब होतकरू मुलांना शोधून त्यांच्या संपर्कातील लोकांकरवी त्यांना आर्थिक मदत करणे. त्या उपक्रमातून इंजिनीयर झालेल्या एका मुलाने नोकरी लागताच पैसे फेडण्याचा विषय काढला, तेव्हा त्याला सांगण्यात आले, ‘तुला जमेल तसा तू दुसऱ्या गरजू मुलाचा भार उचल’ आणि ते तो करत आहे. गावागावात जेव्हा हे असे पाहण्यास मिळते तेव्हा जग अजूनही सुंदर आहे असा विश्वास वाटतो.

- अभिजीत जोंधळे 9423471070    

- किरण राउतमारे 9421336873

krautmare@gmail.com

 

हे ही लेख वाचा-

‘ग्रंथ तुमच्या दारी’ योजना आणि विनायक रानडे
भूगोल झाला सोप्पा!
आदर्श मोठे - विकसनशील छोट्यांसाठी

 

लेखी अभिप्राय

एकदम छान व उत्तम उपक्रम.

श्री उपेंद्र जोशी05/06/2019

अनुराग पुस्तकालय म्हणजे पुस्तकप्रेमींसाठी मोठी मेजवानीच आहे जणू.

Aarya Sabnis05/06/2019

सर, खूपच छान उपक्रम राबवला आहे.

महेश06/06/2019

खूपच छान आहे.

Omprakash Kesh…06/06/2019

खूप छान.

Kedar kulkarni06/06/2019

अतिशय उत्कृष्ट चळवळ. मला त्यातून प्रेरणा मिळाली, की मी ही चळवळ माझ्या घरी चालवावी. आपणांसखूप धन्यवाद व शुभेच्छा.

काळे विलास12/06/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.