अख्ख्या भारताचे मोजमाप - द ग्रेट इंडियन आर्क


-headingविज्ञान जगताच्या इतिहासात दोनशे वर्षांपूर्वी भारतात घडलेली घटना म्हणजे लेफ्टनंट कर्नल विल्यम लॅम्बटन (1753-1823) आणि सर जॉर्ज एव्हरेस्ट (1790-1866) यांनी कन्याकुमारीपासून हिमालयापर्यंत, काही अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांच्या आधारे केलेली जमिनीची मापणी. लॅम्बटन हे त्या काळात काम करत असताना वर्धा शहराजवळच्या हिंगणघाट येथे मृत्यू पावले. त्यानंतर सर जॉर्ज एव्हरेस्ट यांनी ते काम 1843 साली पूर्णत्वाला नेले आणि हिमालयाची उंची मोजली. त्या कामाला ‘द ग्रेट इंडियन आर्क ऑफ द मेरिडियन’ हे नाव आहे. ‘द ग्रेट आर्क’ हे पुस्तक लिहिणारे इतिहासकार जॉन के म्हणतात, ‘ते काम जगाच्या इतिहासातील सगळ्यात लांबीच्या मोजमापणीचे होऊन गेले!’

इंग्रज हे मापणी करणारे पहिलेच होते असे नाही. थेट मुघल काळातही सर्व्हे आणि सेटलमेंट खाते होते. पण ते सगळे प्रादेशिक आणि एकेक परगण्यापुरते असे. भारतीय उपखंडावर एकछत्री अंमल फक्त इंग्रजांचा होता. त्यांना ते केवढ्या प्रदेशावर राज्य करतात हे माहीत असणे अत्यावश्यक होते. 

जमीनमापणीला आणि शेतसारा वसुलीला पद्धतशीर रूप देण्याचे श्रेय राजा तोडरमलला जाते. तोडरमल हे अकबराच्या नवरत्न दरबारातील प्रमुख व्यक्ती होते. ते आधी शेरशहाच्या पदरी होते. पण अकबराने त्याची विद्वत्ता जाणून त्याला स्वीकारले आणि मानाची गादी दिली. त्याने पाडलेली पद्धत नंतर पुढे चालू राहिली. त्यांचे काम मर्यादित असले तरी खूप मोठे होते. त्याने मुघल राज्याचे पंधरा सुभे व त्यांचे तीन हजार तीनशे सदुसष्ट महाल किंवा परगणे (भाग) बनवले. ‘इलाही गज’ ही मापन पट्टी अमलात आणली. त्यामुळे मापणीत सारखेपणा आला. बिघा हे माप सोळाशे इलाही गजांचे होते. एका इलाही गजाची लांबी तेहतीस इंच म्हणजे एक मीटर इतकी. शेतकरी त्याच्याकडे किती बिघे जमीन आहे हे सांगतो; किती एकर आहे असे म्हणत नाही. गुजरातेत विंघू (बिघा) हे जमिनीच्या क्षेत्रफळाचे माप प्रचारात आहे. ते पंचवीस हजार सहाशे चौरस फूट असते. ते इतर प्रांतांत वेगवेगळे असते. अहमदाबादेत जमिनीचे क्षेत्रफळ अमूक ‘वार’ असे  सांगत. तर बडोद्याला अजूनही चौरस फुटात जमिनीचे मोजमाप सांगितले जाते. बंगळुरू येथे सेंट हे क्षेत्रफळाचे माप वापरले जाते. पन्नास सेंटची जमीन म्हणजे अर्धा एकर. 

सिंधू संस्कृतीत धोलावीरा व धोलेरा येथे सापडलेल्या अवशेषांवरून स्पष्ट कळते, की त्या लोकांना तितक्या जुन्या काळी मापनशास्त्राची जाण होती. अकबर गेला, राजा तोडरमल गेला. मुघल गेले. शिवाजीराजे, पेशवे गेले, पण मुघलांच्या काळातील महसूल विभाग आणि जमीनमोजणी यांत वापरलेल्या अरबी किंवा फारसी संज्ञा त्याच राहिल्या. अंमलदार, अर्ज, असली, आया, खातरजमा, मुश्किल, रियाज, तहसीलदार, मामलेदार, मनसबदार वगैरे. महाल हा शब्द अरबी आहे. महाल बडोदे राज्यात होते. महाल नागपुरातही आहे. इंग्रजांनी त्यांच्या हाती सत्ता आल्यावर रूढ भाषेत ढवळाढवळ केली नाही, म्हणून त्या संज्ञा जिवंत राहिल्या आहेत.

ईस्ट इंडिया कंपनीने भारताच्या एकेका प्रदेशावर ताबा मिळवत संपूर्ण उपखंडावर कब्जा केला. दुर्बल समाज नेहमी पारतंत्र्यात राहतो, तसे भारतीय लोक राहिले. त्यामुळे वर्णसंकर, भाषासंकर, सांस्कृतिक संकर भारतात झाले. भारतीय जनतेने ते सहन करत आत्मसात केले. रॉबर्ट क्लाइव्ह याने नकाशे बनवण्यासाठी एक संस्था 1767 साली स्थापन केली. कारण, संपूर्ण देशाचा आकार-उकार माहीत असणे कंपनीच्या गरजेचे होते.

बोटांची पेरे, वीत, हात किंवा पावले यांनी कोणत्याही वस्तूची मापे घेण्याची पद्धत भारतात पारंपरिक आहे. कुकरमध्ये ठेवण्याच्या पातेल्यातील तांदुळात किती पाणी टाकले तर ते बरोबर असेल याचा अंदाज बोटाची पेर बुडवून खात्री केली जाते. पूर्वी गावोगावी विहिरी होत्या. तेव्हा विचारले, की तुमची विहीर किती खोल आहे? तर उत्तर मिळायचे ‘पाच पुरुष’. माणसाची उंची हे खोली मोजण्याचे परिमाण होते! ‘वीतभर आहेस पण तोरा किती?’ असेही म्हटले जायचे. 

-todarmalमी आणि माझ्या मित्राने बऱ्याच वर्षांपूर्वी मध्यप्रदेशातील मांडवगडावर एक आठवडा  मुक्काम केला होता. तेथील दोन इमारतींमधील माप शंभर फुटी टेपने घेत होतो. एका रखवालदाराने सांगितले, की टेपने मोजायचे नाही. आम्ही टेप ठेवून दिली आणि पावले मोजून अंतर नोंदवू लागलो. त्याला काही बोलता येईना. आमचे काम झाले. कारण प्रत्येक माणसाची चालण्याची ठरावीक लय असते. ती चुकत नाही. काही ढेंगा टाकत चालतात तर काही हळू. गुढगेदुखी असणारे लेझीम खेळत असल्यासारखे चालतात. काहींच्या दोन पावलांमधील अंतर दोन फूट अथवा सव्वादोन फूट असते. ते एकदा माहीत असले, की कोणत्याही जागेचे माप टेपशिवाय घेता येते. बडोद्यात आल्यावर महेंद्र मिस्त्री नावाचा मित्र होता. त्याचे काका नर्मदा इरिगेशन खात्यात नकाशे एन्लार्जिंगचे काम करत. तो त्यांच्याकडे घेऊन गेला. तेथे एक मोठे यंत्र होते. त्यांच्याकडे नर्मदा कमांड एरियाचे नकाशे होते. ते पाहून डोळे विस्फारले. असे कधी पाहिलेच नव्हते! त्यात इतका गुंगून गेलो, की मला हलवून ‘चल’ म्हणावे लागले. तेव्हा ‘सर्व्हे ऑफ इंडिया’ची ओळख झाली. त्यानंतर कोलकाता येथे जाऊन ‘सर्व्हे ऑफ इंडिया’चे ईस्ट इंडिया कंपनीने स्थापलेले सव्वादोनशे वर्षें जुने मूळ कार्यालय पाहिले. तेथे आत जाऊ दिले जात नाही व छायाचित्रेही घेऊ दिली जात नाहीत. 

दुसरा संदर्भ म्हणजे बडोद्यात जयसिंहराव सार्वजनिक वाचनालय 1882 साली बांधले आहे. वाचनालयाच्या जोत्यावर जीटीएस झिरो बीएम (ग्रेट ट्रिग्नॉमेट्रिकल सर्व्हे झिरो बेंच मार्क) असे कोरून काढले आहे. ते आजतागायत जसेच्या तसे आहे. सर्व्हेची सुरुवात वाचनालयापासून करून संपूर्ण गाव इंच इंच मोजून काढले होते. तो अफलातून नकाशा, 1886  साली बनवला गेलेला पाहण्यास मिळाला. तो नकाशा म्हणजे पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटणारी  कादंबरीच होती. तो एक इंच म्हणजे दोनशे फूट या मापात होता. जयसिंहराव सार्वजनिक वाचनालय सगळ्यात उंच जागी आहे. बडोद्याचा अद्ययावत नकाशा1886 नंतर बनलेला नव्हता. म्हणून जयपूरला पश्चिम भारताच्या सर्वेक्षण कार्यालयात गेलो. प्रमुखांशी बोललो. त्यांना ती कल्पना आवडली. ते म्हणाले, की आम्ही ते काम करू. ते मराठी भाषिक होते. मला पाहून त्यांना आनंद झाला. त्या खुर्चीत बसण्यास एम एससी (मॅथेमॅटिक्स) असावे लागते. पुढे माझी बदली बडोद्याच्या त्या खात्यातून झाली आणि नंतर कोणी त्याचा पाठपुरावा केला नाही. ते काम सरकारी फडताळात राहिले. 

हा ही लेख वाचा-

 आणि भारताचा नकाशा साकार झाला!

 

मोजमापणीच्या अशा सगळ्या गोष्टी मनात असताना मापणीच्या क्षेत्रातील एक महान घटनास्थळ कधीपासून बोलावत होते. औत्सुक्य आणि उत्कंठा शिंकेसारख्या असतात. त्या दाबता येत नाहीत. आम्ही नवराबायको चेन्नर्इला पोचलो. ज्या जागेवरून संपूर्ण भारताची मोजणी करण्याची सुरूवात झाली, तो ‘सेंट थॉमस माउंट’ पाहायचा होता. चेन्नई स्टेशनपासून सोळा किलोमीटरवरील माउंट (टेकडी) चढण्यास पायऱ्या होत्या. तसेच, टेकडीवर जाण्यास रस्ताही होता. दोघातिघा रिक्षावाल्यांना विचारले. कोणी येण्यास तयार नव्हते. शेवटी, एक तयार झाला. तो म्हणाला, ‘जाण्यायेण्याचे भाडे द्यावे लागेल’. आम्ही म्हटले, ‘तेथे थांबलास तर आम्हाला हरकत नाही.’ तो तयार झाला. रिक्षा टेकाडावर पोचली. ती टेकडी ख्रिश्चनांच्या मालकीची असून ते संपूर्ण शांतता क्षेत्र आहे. तेथे कोणी बोलत नाहीत. आम्ही दोघे अर्धा तास मौनात होतो. तेथे लॅम्बटन याचा अर्धपुतळा व काळ्या दगडात सोनेरी अक्षरांत त्यांच्यासंबंधी लिहिलेले आहे.

लॅम्बटन वयाच्या बेचाळिसाव्या वर्षी भारतात आला तर जॉर्ज सोळाव्या वर्षी. तो कॅडेट म्हणून नोकरीला लागला. त्याला लॅम्बटनच्या हाताखाली नेमले गेले. इंग्लंडमधील मुली भारतात आलेल्यांशी लग्न करायला उत्सुक नसत. त्यामुळे लॅम्बटनला स्थानिक स्त्रीशी लग्न करावे लागले. त्याने एकोणपन्नासाव्या वर्षी, 1802 साली भारताच्या कन्याकुमारीपासून हिमालयापर्यंतच्या मापणीला सुरुवात केली. त्या दोघांचे काम 1843 ला संपले. तेव्हा एव्हरेस्ट सर्व्हेयर जनरल ऑफ इंडिया या, त्या खात्यातील सर्वोच्च पदावर होता. साधारणपणे त्या पदावर सैन्याधिकारी असतो. तो त्याची नोकरी पूर्ण करून इंग्लंडला परत गेला.

त्यांनी आधी तेरा अक्षांशावर असलेल्या सेंट थॉमस माऊंट समोरच्या मंगलोर किनाऱ्यावरची पाचशेऐंशी किलोमीटर आडवी रेषा त्रिकोणमितीने मापत जाऊन कायम केली. भारताच्या मोजमापणीत सेंट थॉमस माऊंट आणि नागपूर ही महत्त्वाची ठिकाणे आहेत. कारण नागपूरला शून्य मैलाचा दगड आहे. तेथून सगळ्या गावांची अंतरे मोजली जातात. सर जॉर्ज एव्हरेस्ट यांनी हिमालयातील सर्वोच्च शिखराची उंची एकोणतीस हजार दोन फूट नक्की केली. म्हणून त्या शिखराला पुढे एव्हरेस्ट नाव दिले गेले. त्याचे मसूरीला घर आहे. पहिल्यांदा एव्हरेस्टवर पाऊल ठेवणारे एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनसिंग हे होते.

-samadhi-lambtonलॅम्बटन त्याच्या सहकाऱ्यांसोबत थिओडोलाइट घेऊन कन्याकुमारी ते हैदराबादपर्यंत एक हजार किलोमीटर तेरा वर्षांच्या काळात चालत गेला होता आणि तो महाराष्ट्रात हिंगणघाट येथे ऑन ड्युटी वारला. त्याला दोन बायका होत्या. एक स्थानिक होती. तिला तीन मुले झाली. दुसऱ्या पत्नीला दोन मुले होती. तो वारल्यावर त्याच्या मुलाला सर्व्हे खात्यात नोकरी मिळाली. एकदा हिंगणघाटला भेट द्यायची आहे. त्याच्या दुर्लक्षित समाधीवर फूल वाहायचे आहे. त्याला अशी विराट कामे करण्याची प्रेरणा कोठून मिळाली असेल?

लॅम्बटन व एव्हरेस्ट यांच्या टीमसाठी भारताच्या दक्षिण टोकापासून हिमालयापर्यंत एकाच रेखांशावर किंवा अक्षांशावर चालत जायचे म्हणजे किती कठीण काम! वाटेत किती पर्वत, गहन जंगले पार करत जावे लागले असेल! त्याकाळी सगळ्या नद्या मुक्तपणे वाहत असणार. कोठेच धरणे नव्हती. हिंस्त्र श्वापदे, सगळ्या प्रकारचे सर्प यांचा सामना करत सर्व्हे करावा लागला असेल. आम्ही नर्मदेच्या खोऱ्यातील शूलपाणीश्वराच्या जंगलातून काही किलोमीटर हातात फक्त कॅमेरा घेऊन चालत गेलो होतो. तेव्हा जंगलातून पायवाटांवरून चालणे काय असते याचा अनुभव घेतला होता. असे सांगितले जाते, की युद्धात जितकी माणसे शहीद झाली नसतील त्याहून जास्त माणसे सर्व्हेचे काम करताना दगावली होती. गाडीत बसून आसेतुहिमालय फिरताना सुखाने खिडकीतून बघताना आपल्या विशाल देशाचे सौंदर्य आणि विविधता कळते. पण वजनदार साधने घेऊन, चालत जाऊन शास्त्रोक्त पद्धतीने मोजणी करणे हे येरा गबाळ्याचे काम नाही.

- प्रकाश पेठे 094277 86823
 prakashpethe@gmail.com

लेखी अभिप्राय

अप्रतिम.

Gopal Sabnis 03/06/2019

फारच सुंदर आणि माहितीपूर्ण लेख. प्रत्येकवेळी माझी एकच मागणी असते असे लेख पुस्तक रूपात एकत्र करून प्रकाशित करावेत.

रामचंद्र गोडबोले 06/06/2019

छान माहितीपूर्ण लेख! पण एव्हरेस्ट हे नाव ज्या शिखराला दिले आहे, त्याची मोजणी एका बंगाल्याने केली होती असे वाचले आहे, पण कोठे वाचले हे आता आठवत नाही.

दिलीप दामले15/06/2019

Excellent.

prasad B17/06/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.