पोवार समाजाची कर्तबगारी


-powar-samajache-bridvakyaपरमार वंशाचा उदय इसवी सन पूर्व २५०० च्या आसपास राजस्थानमधील अबू पर्वतावरील अग्निकुंडामधून झाल्याचा उल्लेख भविष्यपुराणामध्ये मिळतो. हे ‘प्रमार’ परमार वंशाचे प्रथम शासक होते व त्यांची राजधानी अवंतिका (उज्जैन) होती. परमार राजवंशामध्ये सम्राट विक्रमादित्य व चक्रवर्ती राजा भोज यांच्यासारखे महान, वीर, पराक्रमी, विद्वान राजे होऊन गेले. परमार राजवंशाचा अस्त इसवी सन ७१० मध्ये शक आणि हूण यांनी केला. ‘कृष्णराज (उपेंद्र)’ यांनी परमार राजवंशाची राजधानी उज्जैन पुन्हा इसवी सन ८९७ मध्ये जिंकली व परमार साम्राज्य उभे केले. चक्रवर्ती राजा भोज यांचा जन्म ९८० मध्ये झाला. राजा भोज त्यांच्या वयाच्या चौदाव्या वर्षी उज्जैनीचे शासक बनले. त्यांनी त्यांची राजधानी उज्जैनवरून धारमध्ये स्थलांतरित केली. त्यांनी त्यांच्या शासनकाळामध्ये शंभरपेक्षा जास्त लढाया जिंकल्या. त्यामध्ये भीम, कर्णाट, लाट, चालुक्य, अहिरात, तोग्गल, महमुद गजनवी ह्या लढाया मुख्य होत. त्यांनी हिमालय ते सागर व द्वारका ते बंग देश अशा चतुर्भुज दिशांमध्ये शासन केले. चक्रवर्ती राजा भोज साहित्य, लोककला, संस्कृती यांचे पुरस्कर्ता होते. त्यांनी स्वत: चौऱ्याऐंशी ग्रंथ लिहिले. त्यामध्ये चंपु रामायण, आयुर्वेद, रसायनशास्त्र, विमानशास्त्र, वाग्देवी स्तुती हे प्रमुख आहेत. तसेच, राजा भोज यांना मालव साम्राज्याच्या रयतेने मालव नायक, अवंती नायक, मालवाधीश, महाराजाधिराज परमेश्वर, लोकनारायण, कृष्ण, रंगमल्ल, आदित्यराज, मालवमांडन, धारेश्वर, त्रिभुवन नारायणन, विदर्भराज, अहिराज, अहिंद्र चक्रवर्ती अशा चौऱ्याऐंशी उपाध्यांनी अलंकृत केले आहे. त्यांचा उल्लेख सी.व्ही. वेंकटचलम यांनी ‘धार स्टेट गॅजेटियर’मध्ये केलेला आहे (पृष्ठ क्रमांक १०७).

 राजा भोज यांचे निधन १०५५ मध्ये दीर्घ आजाराने झाले. त्यानंतर धारच्या गादीवर उदयादित्य पंवार विराजमान झाले. उदयादित्य यांनी त्यांचे साम्राज्य मजबूत केले. परमार साम्राज्याचे शासन माळवा व विदर्भ या क्षेत्रांमध्ये होते. उदयादित्य यांनी त्यांचे दोन लहान भाऊ लक्ष्मणदेव व जगदेव यांना विदर्भामधील नगरधन किल्ला (रामटेक) व चांदा किल्ला (चंद्रपूर) येथे सुभेदार नियुक्त केले. उदयादित्यानंतर मात्र परमार राजवंश खचत गेला. परमार राजवंशाचा अस्त अल्लाउद्दिन खिलजीच्या शासन काळापर्यंत झाला. माळवा हा प्रांत मोगलांनी जिंकला. सुभेदार साबुसिंह याच्या नेतृत्वाने हजारोंच्या संख्येने पंवार शिवाजी महाराज यांच्या आश्रयान्वये१६६४ मध्ये अहमदनगर-मधील सुपे या गावामध्ये स्थलांतरित झाले. त्यांचे वंशज मराठा साम्राज्याचे स्तंभ बनले. पेशवा बाजीरावाच्या काळामध्ये माळवा प्रांत मराठ्यांनीच काबिज केला. उदाजीराव पवार यांना धारचे सुभेदार म्हणून १७२७ मध्ये नियुक्त करण्यात आले आणि धारच्या गादीवर परमार/पवार वंशाचा ध्वज पुन्हा लहरला! आनंदराव पवार धारच्या गादीवर; तसेच, तुकोजीराव पवार देवासच्या गादीवर १७३२ मध्ये विराजमान झाले.

-udhajirav-pawarपवारांचे अनेक क्षेत्रांमध्ये स्थलांतर पुन्हा औरंगजेबाच्या दहशतीमुळे झाले, त्यामधील एक स्थलांतर गोंडवाना (विदर्भ) मध्ये आहे. गोंडवाना प्रांताचे राजे बख्त बुलंदशाह होते. त्याची राजधानी देवगढ होती. पवारांनी बख्त बुलंदशाह याच्या आश्रयामध्ये नगरधन किल्ल्यामध्ये आश्रय घेतला. बख्त बुलंदशाह याने त्याची राजधानी देवगढवरून नागपूरला १७०२ मध्ये हलवली. पेशवा बाजीराव यांच्या साहसामुळे नागपूर मराठा साम्राज्यामध्ये विलीन झाले. पवारांचे वंशज मराठा साम्राज्याचे आधारस्तंभ बनले. पवारांनी नागपूरचे राजे रघुजी भोसले यांच्या आदेशाने चांदा, देवगढ, छत्तिसगढ ते कटक शहरापर्यंत क्षेत्र मराठ्यांना १७४३ मध्ये जिंकून दिले. रघुजी भोसले त्या विजयाने अती हर्षित झाले व त्यांनी पवारांना वैनगंगा नदीचे खोरे भेट म्हणून प्रदान केले. पवारांनी वैनगंगा नदीकाठी नापीक क्षेत्राला सुपीक क्षेत्रामध्ये बदलवले. मुधोजी भोसले व ब्रिटिश यांच्यामध्ये युद्ध नागपूर येथील सीताबर्डी येथे १८१७ मध्ये झाले. मुधोजी त्या युद्धामध्ये पराभूत झाले. ते युद्ध मराठ्यांसाठी कलाटणी देणारे ठरले. त्या युद्धानंतर ब्रिटिशांनी नागपूर शहर काबिज केले. ब्रिटिशांनी राघोजी (द्वितीय) यांचे नातू राघोजीच्या (तृतीय) डोक्यावर राजमुकुट ठेवला. राघोजी तृतीय यांनी पवारांना मलपुरी - तिरखेडी (भंडारा जिल्हा) १८१८ मध्ये एकशेनव्वद गावांची जमीनदारी बहाल केली. तसेच, ब्रिटिशांनी महागाव - बडद (साकोली/भंडारा जिल्हा) ही जमिनदारी पवारांना १८४० मध्ये बहाल केली. नंतर, पवार ब्रिटिश शासनाचे आधारस्तंभ बनले. ब्रिटिशांनी पवारांना चारशेहून अधिक गावांची मालगुजारी, पाटिलकी व महाजनी बहाल केली.

हरिचंद चौधरी पवार यांनी जॉर्ज पंचम यांच्या विरोधामध्ये नारेबाजी १९११ मध्ये केली. त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात भंडारा जिल्ह्यामध्ये संघटन तयार केले, म्हणून त्यांना अटक करण्यात आली. तेव्हा पवार समाजामध्ये स्वातंत्र्याची चाहूल निर्माण झाली. पवार समाज शेकडोंच्या संख्येमध्ये गांधीजींच्या असहकार आंदोलन, जंगल सत्याग्रह, चले जाव आंदोलन यांमध्ये सामील झाला.
‘पवार’ या नावामध्ये १९५१ मध्ये बदल होऊन ‘पोवार’ असे झाले. पोवार समाज राजपूत जातिव्यवस्थेतून विभक्त होऊन स्वतंत्र जात म्हणून आला. मराठा समाजामध्ये शहाण्णव कुळ व राजपूत समाजामध्ये एकशेचोपन्न कुळ आहेत. तसेच, पोवार जातीमध्ये छत्तीस कुळ आहेत. पोवार जातीतील वैवाहिक संबंध या छत्तीस कुळांमध्येच होऊ शकतो. धार, उज्जैन, रतलाम, राजस्थान, गुजरात येथील परमार/पंवार/पँवार हे राजपूत समाजामध्ये तर पश्चिम महाराष्ट्रामधील पवार कुळ मराठा समाजामध्ये समाविष्ट झालेले आहेत. पण सर्व पंवार, परमार, पँवार, पोवार, पवार विभक्त नसून एकच आहेत.

- नितेश भगत    
niteshbhagat40@gmail.com

लेखी अभिप्राय

खुप छान माहिती मिळाली

Pavan kate pawre18/04/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.