कल्हणाची राजतरंगिणी – कवितेची लज्जत


कल्हणाच्या राजतरंगिणी या ग्रंथाचे वैशिष्ट्य असे, की तो इतिहासग्रंथ आहेच, पण त्यातील काव्याचा आस्वाद घेता येतो! ग्रंथात काव्य दोन प्रकारे विकसित होते – एकात ते शिवस्तुतीच्या स्वरूपात येते. ग्रंथात आठ तरंग म्हणजे प्रकरणे आहेत. कल्हण प्रत्येक प्रकरणाची सुरुवात शिवस्तुतीने करतो. त्याने प्रत्येक प्रकरणातील शिवस्तुती वेगवेगळ्या पद्धतीने खुलवली आहे. तो उत्तम काव्याचा नमुना आहे. त्यांतील काही उदाहरणे पाहणे रंजक ठरेल.

1. ज्याची आभूषणे सर्पांची आहेत आणि जो सर्पमण्याच्या तेजाने शोभत आहे अशा शिवमहेशाला वंदन असो. ज्याच्या ठायी मुक्तात्मे विसावतात असा तो कल्पवृक्ष आहे.

तिचा केशराचा टिळा लावलेला भालप्रदेश, तिने कानात मिरवलेला चंचल, हलत्या कर्णफुलांचा गुच्छ, तिचा समुद्रजन्य शंखासारखा शुभ्र धवल कंठ आणि निर्दोष कंचुकीने आवृत्त केलेले वक्षस्थळ, त्याच्या भाळावरची तृतीय नेत्राची अग्निज्वाला, कानाजवळ खेळकरपणे मुखे उघडणाऱ्या सर्पांचा समूह, सागरातून वर आलेला -हलाहलाच्या रंगाने नीलज्वल दिसणारा कंठभाग आणि नागराज वासुकीने वेढलेली छाती अशा त्या अर्धनारी नटेश्वराचा उजवा अथवा डावा देहभाग सर्वांना कल्याणप्रद होवो.

2. शैलसुतेच्या अर्धांगांनी युक्त, निर्विघ्न, सिद्धिदायक, नागेंद्रपत्नीच्या कांतियुक्त अशा वळशांनी वेढलेल्या, जटाजुटांनी शोभणारा श्रीशंकराचा त्रिकालाबाधित देह मानवाच्या अरिष्टांचा नाश करो.

कल्हणाच्या काव्यात दुसऱ्या प्रकारात विचार व चिंतन आहे. त्यामुळे त्याचे काव्य अनेकदा सुभाषितांच्या स्वरूपात येते. काव्यात दृष्टांतही जागोजागी आढळतात. कल्हण भाषेचा, राजकारणाचा व भौगोलिक क्षेत्राचा अभ्यास बारकाईने करतो. त्याच्या सुभाषितांमधून मानवी स्वभावांचे व वैशिष्ट्यांचे मनोहारी दर्शन घडते. त्याची जीवनाविषयीची प्रगल्भ जाणीव त्याने दिलेल्या दृष्टांतांतून जागोजागी आढळते. तो निसर्गवर्णने कमी करतो, पण त्याने जी वर्णने केली आहेत ती फार सुंदर आहेत. काही नमुने देत आहे. त्याचा संदर्भ कळणार नाही. कारण ते प्रसंगानुरूप आहेत. पण त्यातील काव्यसौंदर्य अनुभवता येईल.

1. एखादा राजा सज्जन असला तरी त्याच्यावर विश्वास ठेवता येत नाही, कारण दुष्ट मंत्रिगण त्याच्या कानाशी, मधमाश्यांनी हत्तीच्या कानात गुणगुणावे तसे कुजबुजत असतो.

2. सिंह गुडघ्यावर बसलेला असला तरी फाडून खातो, अजगर मिठीत घेऊन आवळून जीव घेतो आणि राक्षस हसत हसत मारतो, त्याचप्रमाणे राजा कौतुक करत असतानाही ठार मारतो.

3. वृक्ष त्याच्या आश्रयाला आलेल्यांना जसे छाया देऊन सुखी केल्यानंतर फळे देऊन तृप्त करतात. तसेच, उदार पुरुष याचकांना सर्व प्रकारच्या देणग्यांनी भूषवल्यानंतरही त्यांच्यावर संपूर्ण कृपा करतात.

4.नदी तिचा गाळ वाटेतील खडकावर सोडून सागराला जशी निर्मळपणे मिळते, तशी लक्ष्मीही तिचे सगळे दोष इतर राजांवर सोपवून शुद्ध स्वरूपात त्या राजाच्या आश्रयाला आली होती.

5. या जगात जन्मलेल्या प्रत्येक जिवाचे नाशवंत शरीरवस्त्र अहंकार व ममत्व या दोन खुंट्यांनी टिकवून धरलेले असते.

6. उंट काटेरी झाड खाता खाता केवड्याच्या झुडपाचाही घास जसा घेतो तसे पापी लोक दुष्कर्माची तद्जन्य फळे उपभोगताना श्रेष्ठ गुणसंपन्न माणसांचाही नाश करतात.

7. गरुडभयाने सर्प बिळामध्ये जसे घुसतात, तसे उत्तर कुरू देशातील राजे संकटकालात त्याच्यापुढे आश्रय देणाऱ्या वृक्षांमध्ये दडून बसले.

8. वारा वेगवेगळ्या वृक्षांवर फुललेल्या फुलांना जसा गोळा करतो (वास) तसे गुणग्राही राजाने अनेक देशांमधील विद्वान लोक बोलावून गोळा केले होते.

9. मस्त हत्ती जवळपास असल्याचे वाहत्या वाऱ्यावरून येणाऱ्या मदगंधावरून ओळखता येते, ढगांचे अस्तित्व गडगडाट आणि वीज यांवरून कळते. तसेच, विचारी आणि सूक्ष्मदर्शी विद्वानांना एखाद्याच्या वागण्यावरून त्याच्या पूर्वजन्मातील संस्कारांनी घडलेले स्वभावाचे वळण नेमके कळून येते.

10. मनस्वी पुरुष स्त्रीचा विचार विजयाची इच्छा पूर्ण होत नाही तोवर करू शकत नाही. सूर्य संध्यादेवीची जवळीक सगळ्या जगाची परिक्रमा केल्यानंतरच भोगतो.

11. ज्यांना भावनांची उन्नत अशी जाण नाही, ज्यांना खऱ्या रूचीची जाण नाही असे राजे आंधळ्या बैलाप्रमाणे फक्त पोटभरू असतात. त्यांना दुसरे काय कळणार?

12. दैव आणि मेघ यांच्या अनुकूलतेचा काही भरवसा नसतो. दैव थोडी कृपा दाखवून प्राणिमात्रावर भयंकर आपत्ती आणू शकते आणि मेघ असह्य उष्म्याच्या दीर्घ उन्हाळी दिवसांनंतर करपलेल्या वृक्षाला थोडा दिलासा देऊन नंतर विजेच्या आघाताने नष्ट करतात.

13. पौर्णिमेची रात्र आणि चंद्र यांचे नाते जसे घट्ट असते तद्वतच शंकरवर्मनचा जीव उत्तरेकडील महान राजा स्वमिराज यांची कन्या असलेल्या सुगंधाराणीवर खूपच जडला होता.

14. मी माझे काव्य मोठ्या कष्टाने पुढे नेत आहे. कारण या राजाच्या दुष्ट कहाणीला स्पर्श करण्याच्या भयाने माझे हात भ्यालेल्या अश्विनीप्रमाणे (घोडीप्रमाणे) मागे मागे सरकत आहेत.

15. वेदना आणि चिंता यांवर मात करण्याचे प्रयत्न निरर्थक ठरल्यानंतर, मूर्ख लोक त्यांचे आयुष्य क्षणभंगुर असल्याचे कळूनही चंचल लक्ष्मीच्या हव्यासापायी त्यांची कृत्ये सोडत नाहीत.

16. गुप्तचरांकरवी त्याच्या स्वत:च्या तसेच अपरिचित लोकांच्या हालचालींवर लक्ष ठेवत असल्यामुळे प्रजाजनांना रात्री पडणारी स्वप्नेच तेवढी त्याला ज्ञात नव्हती.

17. खेकडा स्वत:च्या पित्याला ठार मारतो, पांढरी मुंगी तिच्या मातेला नष्ट करते, पण सत्ता जेव्हा हाती येते तेव्हा कृतघ्न कायस्थ सगळ्यांचा नाश करतो.

18. नदीद्वारे सागराला जाऊन मिळालेले जल मेघांना परत प्राप्त होते, पण व्यापाऱ्याच्या हातात दिलेली वस्तू कधीच परत मिळत नाही.

19. मैत्री हितसंबंधांकडे पाहून नसावी, सामर्थ्यामध्ये उद्दामपणा नसावा. स्त्रीचे पावित्र्य प्रवादांपलीकडे असावे, वाणीतील औचित्य सर्वांचे समाधान करणारे असावे, ज्ञानाने सत्तेवर अंकुश ठेवावा, तारुण्य ध्येयाधिष्ठित असावे आणि राजाला कोठेही लांछन नसावे. या अखेरच्या युगात (कलीयुगात) या सर्व गोष्टी बरोबर विपरीत झालेल्या आढळतात.

20. शेपटाला दोर बांधलेला पक्षी ज्याप्रमाणे आगीपासून पळू शकत नाही, तद्वतच मनुष्य त्याच्या नियतीपासून पळू शकत नाहीत.

21. कणखरपणा, औदार्य, कुलीनता, सुज्ञपणा आणि मनुष्याची अन्य गुणवैशिष्ट्ये अद्भुत प्रवाह असलेल्या या ऐहिक जीवनामध्ये चिरस्थित राहू शकत नाही.

22. सूर्यदेखील त्याचे अवघे स्वरूपच प्रखरतेपासून सौम्यपणापर्यंत प्रत्येक दिवशी बदलत असतो. मग मानवी क्षमतांची काय कथा?

23. ‘ते माझ्यावर भ्रमर सोडून क्षतविक्षत करेल, त्याच्या पुंकेसरांनी मला अंध करून टाकेल’ असा विचार करून गजाला कमलपुष्पाच्या कल्पित सामर्थ्याचे भय वाटत असेल तर तो त्याचे पाय अजस्र असूनही भयग्रस्ततेमुळे कमलपुष्प उन्मळून टाकू शकणार नाही.

24. तो डोंगर पाणबुड्या पक्षी नदीतील मासे गिळण्याकरता खाली वाकला आहे असा दिसत होता.

इतिहास सांगणाऱ्या ग्रंथाचा काव्यास्वादही घेता यावा यासारखी अनुठी गोष्ट नसेल.

- विद्यालंकार घारपुरे 9420850360, vidyalankargharpure@gmail.com

(चालना, ऑक्टोबर 2018 अंकामधून उद्धृत, संस्कारित-संपादित )
 

 

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.