राजतरंगिणी - काश्मीरच्या इतिहासाचा लेखाजोखा


अरूणा ढेरे व प्रशांत तळणीकर यांनी ‘कल्हण पंडित यांच्या ‘राजतरंगिणी’ या नावाच्या मूळ संस्कृत भाषेतील ग्रंथाचा मराठीत केलेला अनुवाद सरहद (संजय नहार), खडके फाऊंडेशन व चिनार प्रकाशन यांनी 2017 साली प्रकाशित केला आहे. इतिहासाचे कुतूहल व काव्याची जाण असणाऱ्यांनी तो ग्रंथ वाचणे जरूरीचे आहे. भारताच्या प्राचीन इतिहासाचा एकमेव लिखित लेखाजोखा म्हणून त्याला आंतरराष्ट्रीय महत्त्व आहे. ‘राजतरंगिणी’ हे काव्य आणि इतिहास या दोघांचे बेमिसाल मिश्रण आहे. कल्हणाने त्या ग्रंथासाठी शेकडो ऐतिहासिक पुरावे धुंडाळले आहेत, तपासले आहेत. त्या सर्वांना एकत्र करून ते सुसंगतपणे लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने ऐतिहासिक घटनांना कालक्रमात बसवले आहे. त्याने सप्तर्षी शक ही कालगणना वापरली आहे. सप्तर्षी हे एका नक्षत्रावरून दुसऱ्या नक्षत्रावर शंभर वर्षांनी जातात. ती पद्धत बृहत संहिताकार वराहमिहिर यानी कालगणनेची शोधली असे कल्हण नोंदवतो. त्याने स्वतः ग्रंथ कोणत्या काळात सुरू झाला, त्याचे लेखन कधी झाले हे नमूद करून ठेवले आहे. त्यामुळे त्यात नंतर घुसडलेला मजकूर जवळजवळ नाही; तरीही काही इतिहासकारांना ग्रंथाचा शेवटचा भाग त्यात नंतर घुसडला गेल्याची शंका आहे. या ग्रंथाची ऐतिहासिक ग्राह्यता भारतीय ग्रंथसंपदेत सर्वात जास्त आहे हे मात्र नक्की.

भारताच्या इतर कोणत्याही एका प्रदेशातील एका विशाल कालपटातील सत्ताकारणाचे, राजकारणाचे, राजे-रजवाडे-सरदार-मंत्री यांचे इतके विस्तृत व विश्वासार्ह लिखित चित्रण झालेले नाही. कल्हण काश्मिरी राजांची सलग अशी साखळी एका विशिष्ट समयबिंदूपासून प्रस्तुत करतो. कोणता राजा कोणत्या राजघराण्याचा आहे, कोण कोणाचे राणी-मुलगा-नातू-पणतू आहेत हे सुस्पष्टपणे मांडतो. तो त्या राजवंशांमध्ये कोठे साखळी तुटली आहे, कोठे ती परत सांधली गेली आहे हेसुद्धा दाखवतो. राजांच्या वंशावळी व नामावळी वाचकाला व्यवस्थित समजतात. तो प्रामुख्याने राजघराण्यांचा इतिहास आहे. त्यात राजघराण्यांतील व्यक्तींमधील जीवघेणा सत्तासंघर्ष, राजांच्या मानसिक धारणा, त्यांच्यातील व्यभिचार, भ्रष्टाचार, मंत्री-कारकून यांची मनमानी, नोकरशाहीतील कायस्थांनी केलेले सर्वसामान्य जनतेचे शोषण, ब्राह्मणांनी दाखवलेले धार्मिक वर्चस्व, स्थानिक आदिवासी-डोंगरी जमातींनी केलेले कडवे विद्रोह, संपूर्ण कालखंडभर होणाऱ्या आपापसांतील सततच्या लढाया- त्यांतून होणारी अपरिमित वित्तहानी, मनुष्यहानी- त्यातून निर्माण होणारी सर्वसामान्य माणसांच्या जीवनातील अस्थिरता हे सारे समजते.

कल्हणाच्या कथनात चमत्कृतिजन्य घटनांचा उल्लेख काही ठिकाणी येतो. त्याने मेघवाहन व ललितादित्य या राजांच्या राजवटींच्या कथनात तशा चमत्कृतिजन्य घटना सांगितल्या आहेत. उदाहरणार्थ, राजाच्या मंत्र्याने राजासाठी व राजाच्या सेनेसाठी जादूचा मणी फेकून नदीचे पाणी दुभंगवले आहे. एखाद्या पिशाच्च्याने त्याचा पाय नदीच्या एका तीरावरून दुसऱ्या तीरावर पसरून राजासाठी सेतू निर्माण केला आहे. योगिनींनी स्वतःच्या विलासासाठी मेलेल्या माणसाच्या सांगाड्यात प्राण फुंकून त्या माणसाला पुन्हा जिवंत केले आहे. राजा, राणी, मंत्री यांनी काळी जादू, मंत्रतंत्र, जादूटोणा करून काही वेळा मारले आहे. वाचकाला तशा घटना चाळून घेऊन त्यांतील वास्तविक व व्यावहारिक परिणाम लक्षात घ्यावे लागतात. कल्हण इतर काही चमत्कृतिजन्य घटना लोकप्रवाद म्हणून सांगतो. त्यामुळे त्याचाही त्या घटनांवर विश्वास बसलेला नसावा असे मानण्यास जागा मिळते. तो ज्या काळाचा साक्षी आहे त्या काळाच्या कथनात तर एकही चमत्कृतिजन्य घटना येत नाही. त्यावरून त्याला तो इतिहास लिहीत आहे याचे भान असल्याचे जाणवते. तो कहाण्या सांगत नाही. तो घटनांचे कथन करतो. म्हणून त्याच्या कथनात तोच तोपणा आल्यासारखे काही वेळा वाटत असले, तरी तो त्याचा दोष नाही. ‘इतिहासाची पुनरावृत्ती होते’ या विधानाला त्यातून पुष्टी मिळते.

कल्हण महाभारत काळापासून सुरुवात करतो व बाराव्या शतकाच्या मध्यापर्यंत म्हणजे 1159 सालापर्यंत येऊन थांबतो. आश्चर्य म्हणजे तितक्या प्रदीर्घ कालावधीच्या कथनात ‘हिंदू’ हा शब्द एकदाही येत नाही! शैव, वैष्णव, बौद्ध, ब्राह्मण, क्वचित जैन या धर्मांची व पंथांची व इतर स्थानिक नागा, दरद, डामर, खश वगैरे टोळ्यांची नावे येतात. म्हणजे हिंदू धर्म आज जो समजला जातो तो धर्म म्हणून निदान कल्हणाच्या काळापर्यंत रूढ नव्हता!

कल्हणाने इतिहासकथन आणि काव्य यांचा नेमका तोल साधला आहे. इतकी मोठी ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या या विद्वानाचा सविस्तर इतिहास मात्र उपलब्ध नाही! त्याच्या या ग्रंथावरूनच त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज लावावा लागतो. कल्हण हा अकराव्या शतकात होऊन गेलेला काश्मीरचा राजा हर्ष याचे महाअमात्य श्रीचंपक किंवा चंपकदेव यांचा मुलगा इतकीच अधिकृत चरित्रमाहिती मिळते.भारताच्या इतिहासाच्या कालगणनेची वर्गवारी साधारण इसवी सन 1000 पर्यंत हिंदुकाळ म्हणजे प्राचीन काळ, इसवी सन 1001ते इसवी सन 1757 मुस्लिमकाळ म्हणजे मध्ययुगीन काळ व इसवी सन 1757 च्या पुढील काळ म्हणजे ब्रिटिश काळ व 1947 च्या पुढील स्वतंत्र्योत्तर काळ अशी केली जाते. हिंदुकाळात भारतात सुबत्ता, आनंदीआनंद होता व तेव्हा सोन्याचा धूर निघत होता असा एक समज भारतीयांच्या डोक्यात पक्का झालेला आहे. कल्हण बाराव्या शतकापर्यंत पोचतो व त्यात वर्णन केवळ हिंदू राजांचे येते (सोयीसाठी वैष्णव, शैव, बौद्ध राजांना हिंदू मानुया). म्हणजे ती वर्गवारी तकलादू आहे हे दिसते. त्याने वर्णन केलेल्या काळात तथाकथित हिंदू राजांच्या त्यांच्या त्यांच्यातच असंख्य व प्रदीर्घ लढाया झाल्या आहेत. त्या काळात सर्वसामान्य जनता कायम युद्धाच्या छायेत, जीवघेण्या असुरक्षिततेत, उपासमार आणि आर्थिक दैन्य यांत पुन्हा पुन्हा भरडली गेली आहे. त्या काळाला भरभराटीचा, सुबत्तेचा, सोन्याचा धूर निघणारा काळ कसे काय म्हणता येईल?

काश्मीरमध्ये शैव, वैष्णव, बौद्ध आणि ब्राह्मण संप्रदाय एकाच वेळी त्यांचा त्यांचा कमीअधिक प्रभाव टिकवून राहिले. तेथील राजांनी त्यांच्या त्यांच्या श्रद्धांबरोबर अन्य सांप्रदायिक स्थळांचीही उभारणी केली. ती प्रथा कोणा एका राजापुरती सीमित न राहता ती काश्मीरच्या राजगादीचीच विशेषता राहिली. त्याचप्रमाणे तेथील राजांनी युद्धकाळात (काही वेळा शांतताकाळातही) ती प्रार्थनास्थळे, धर्मस्थळे, मंदिरे, विहार प्रच्छन्नपणे पाडले व त्यांची अगणित संपत्ती लुटली. राजाच्या कोषागारात जेव्हा खडखडाट होत असे, सततच्या लढायांचा होणारा खर्च भागवावा लागत असे, तेव्हा ती मंदिरे राजे लोक लुटत. राजा हर्षाने तर धनसंपत्ती लुटून झाल्यावर देवाच्या मूर्तीदेखील मिळवण्याकरता उदयराज याला ‘देवमूर्ती उच्चाटन प्रमुख’ म्हणून नेमले होते! हर्षराजाच्या आज्ञेवरून मंत्री गौरक याने ‘वित्तप्रमुख’ हे पद आणि त्याबरोबर सर्व मंदिरे आणि गाव यांची संपदा लुटण्याचे कार्य स्वीकारले. इतरही अनेक राजांनी मंदिरांचा, बुद्धविहारांचा विध्वंस केला होता. म्हणजेच राजांनी एकमेकांच्या प्रदेशांतील धर्मस्थळे युद्धकाळात लुटणे ही त्या काळाची पद्धत व परंपरा होती आणि तो राजकारणाचा भाग होता.

दामोदर राजानंतर हुष्क, जुष्क आणि कनिष्क हे तीन तुर्की राजे होऊन गेले. त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. त्यांच्या काळात नागार्जून हा बौद्ध तत्त्वज्ञानी काश्मिरात वास्तव्य करून होता. बौद्धांचे प्राबल्य प्रावज्यक भिक्षूंमुळे निर्माण झाले. ते वेदविरोधी होते. त्यांनी सर्व पंडितांना वादात प्रकटपणे पराभूत करून नीलमतपुराणातील धार्मिक कृत्यांची मुळेच उखडून टाकली. बौद्ध धर्म राजाश्रयी असल्यामुळे ब्राह्मणांचे हितसंबंध दुखावले गेले. यज्ञयाग, होमहवन बंद पडले. त्यांचे चरितार्थाचे साधन निसटले. चंद्रदेवाच्या नेतृत्वाखाली ब्राह्मणांनी बौद्धांशी संघर्ष केला. गोनंद तृतीय हा राजा राज्यपदावर आला तेव्हा त्याने चंद्रदेवाची बाजू उचलून धरली. बौद्धांचा राजाश्रय नष्ट झाला. ब्राह्मणांचे वर्चस्व पुन्हा निर्माण झाले. कल्हण ते कथन करत असताना बौद्धांचे प्राबल्य कमी झाल्याबद्दल आनंद व्यक्त करतो. त्यावरून तो ब्राह्मणांचा पक्षपाती होता व बौद्धांविरूद्ध होता हे दिसून येते.

हूण, तुर्क, ब्राह्मण, बौद्ध आणि डोंब हे अपवादात्मक स्वरूपात का होईना काश्मीरच्या राजगादीवर बसलेले आढळतात. काश्मीरच्या राजांच्या सत्तेचा अंमल कोणत्या व किती भूप्रदेशावर होता त्याचा नेमका अंदाज त्या ग्रंथाद्वारे करता येत नाही. कारण जवळच्या भूप्रदेशावरील इतर राजांचे त्यांनी काश्मीरच्या राजांविरूद्ध केलेल्या बंडांचे, उठावांचे, लढायांचे सतत संदर्भ येतात. राजांनी टोळीयुद्धांत म्लेंच्छांचा पराभव केल्याचे तर काही वेळा, म्लेंच्छांनी काही राजांना युद्धात मदत केल्याचे उल्लेख येतात. जयसिंहाच्या संजपाल या मंत्र्याने त्याचा तळ एका जंगलात यवनांना घेऊन उभारला असा त्याच्या कारकिर्दीच्या वर्णनात उल्लेख येतो. म्लेंच्छ व यवन मुस्लिम असतील तर त्यांचे त्यावेळी हिंदू राजांशी असे परस्परविरोधी संबंध होते आणि ते प्राचीन काळापासून होते. तसेच, परस्परविरोधी संबंध काश्मिरातील हिंदू राजे व आदिम डोंब, नागा, डामर, खश या टोळ्यांबरोबरही होते असे दिसून येते.

काश्मिरी राजांच्या भौगोलिक व राजकीय सीमा कल्हणाच्या कथनातून फारशा स्पष्ट होत नाहीत. मला काश्मिरी राजांनी सार्वभौम सत्ता गाजवली म्हणजे नक्की काय केले हे समजलेले नाही. एक शक्यता अशी आहे, की राज्यांच्या भौगोलिक व राजकीय व्यवस्था नगरे, ग्रामे (गावे) व जंगल अशा तीन अस्तित्वात असाव्यात. राजांनी नगरे वसवली होती. त्यामुळे राजांची त्यांवर निरंकुश सत्ता असावी. नगरापासून खेडी दूरवर पसरली होती. त्यावरही राजांचा अंमल त्या गावांवर असावा, पण तो फार प्रभावी नसावा. राजांच्या नोकरशाही प्रतिनिधींचा वचक व अंमल असावा. राजांचे नियंत्रण नगरे व गावे यांमधील आणि गावांपलीकडील जंगल व पहाडी प्रदेशांवर मात्र फार कमी असावे. आदिवासी जमातींच्या टोळ्यांचे वर्चस्व त्या प्रदेशांमध्ये असावे. कारण त्या लोकांनी राजांविरूद्ध बंड केल्याच्या; तसेच, त्यांतील काही टोळ्या काही वेळा राजांच्या बाजूने लढल्याच्याही घटना कल्हणाच्या कथनात येतात. तसेच, छोटी छोटी अनेक राज्ये असून त्यांचे राजे काश्मिरी राजांचे मांडलिक म्हणून राहत असावेत. ते काश्मिरी राजांना धनसंपत्ती नजराण्यांच्या स्वरूपात देत असावेत व त्यांच्या राज्यात निरंकुश सत्ता उपभोगत असावेत.

राजे कोणतेही असोत, मंत्रिगणांमध्ये व वरिष्ठ नोकरशाहीत ब्राह्मण व कायस्थ लोकसमुहांचे प्राबल्य व वर्चस्व ठळकपणे दिसून येते. ब्राह्मण त्यांच्या जन्मदत्त हक्काने धार्मिक अधिकार उपभोगत होते, शिवाय ते राजकीय अधिकारही उपभोगत होते. जे ब्राह्मण प्रत्यक्ष राज्य प्रशासनात नव्हते, ते धार्मिक, सामाजिक व आर्थिक अधिकार मंदिरांच्या माध्यमातून उपभोगत होते. काश्मिरी राजांच्या काळात अमाप मंदिरे बांधली गेली, ती लुटलीही गेली. कारण देवळांकडे प्रचंड धनसंपत्ती होती. काही राजांच्या काळात, ब्राह्मणांनी मंदिरात आमरण उपोषणाचा (प्रायोपवेशनाचा) मार्ग अवलंबून राजांकडून अधिक लाभ मिळावा म्हणून राजांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. कल्हण त्याची वर्णने बरेच वेळा करतो.

कारकूनी करणारे कायस्थ, त्यांचाही एक नोकरशहा वर्ग काश्मिरी राजांच्या काळात प्रस्थापित झालेला दिसतो. कायस्थांनी सर्वसामान्यांना नाडले, खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक भ्रष्टाचार केला. कल्हण ते दोन सामाजिक वर्ग सोडल्यास इतर सामाजिक वर्गांच्या परिस्थितीवर प्रकाश फार टाकत नाही. हर्ष राजाच्या कारकिर्दीतील पदच्युत मंत्री कंदर्प वाराणसी येथे निघून गेला. कल्हण लिहितो, “त्याने (कंदर्पाने) गया येथे एका सामंताला ठार मारून त्याच्या जागी दुसऱ्याला नियुक्त केले आणि काश्मिरी लोकांना श्राद्धासाठी जो कर लावण्यात येत होता तो मागे घेण्यास त्याला भाग पाडले.” त्याचा अर्थ, तेव्हा हिंदू सरदार/राजे हिंदूंकडून तसे धार्मिक कर वसूल करत होते!

तो इतिहास राजांचा असला तरी राजे हीदेखील माणसेच आहेत. माणसांचे सर्व गुणावगुण त्या इतिहासात प्रतिबिंबित होतात. कल्हणाने राजा हर्षाचा इतिहास सांगण्यापूर्वी केलेले पुढील भाष्य विचारार्ह आहे. “राजा हर्षाची कथा मी कशी सांगू? तिच्यात उद्योगांची भरभराट आहे, पण ती अपयशांचेही कथन करते. ती सर्व सुनियोजित योजनांवर प्रकाश टाकते, पण धोरणांचा अभावही दर्शवते. ती सत्तेच्या सामर्थ्याचा अतिरेकी वापर दाखवते, पण तिने अज्ञानाचे घोर उल्लंघनही पाहिले आहे. ती उदारतेचा अतिरेक सांगतेच, पण अत्याचारांच्या अतिरेकी प्रयोगाचेही तेवढेच वर्णन करते. ती अपार करूणेच्या विपुल प्रदर्शनाने आनंद देते, पण ती त्याहीपेक्षा विपुल प्रमाणात झालेल्या हत्यांमुळे भयचकितही करते. ती सत्कृत्यांच्या समृद्धीमुळे आल्हाददायक बनते तर अतिपापकृत्यांमुळे मलिनही होते. ती सर्व बाजूंनी आकर्षित करून घेणारी आहे, तरीही अतिबीभत्स आहे…” कल्हणाचे हे भाष्य प्रदीर्घ राजसत्ता उपभोगलेल्या जवळजवळ सर्व कर्तृत्ववान राजांच्या बाबतीत खरे ठरावे असे आहे.

- विद्यालंकार घारपुरे 9420850360,vidyalankargharpure@gmail.com

(चालना, ऑक्टोबर 2018अंकामधून उद्धृत)
 

 

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.