संकासुर… एक प्रवास असुराचा… लोककलेकडे


एका असुराने ज्ञानाचे भांडार सर्वसामान्य जनांसाठी खुले केले, म्हणून त्याचा वध झाला! वध होण्यापूर्वी, तो ज्ञानाचे ते संचित घेऊन समुद्रातील एका शंखात लपला होता. तेव्हा विष्णूने देवांच्या विनंतीवरून माशाचा अवतार घेतला आणि समुद्रात जाऊन शंखात लपलेल्या त्या असुराचा वध केला! तो शंखात लपला म्हणून शंखासुर. त्याचा झाला संकासुर. तो डोक्यावर शंकूच्या आकाराची टोपी घालतो म्हणूनही शंकासूर. काही कोकणवासी त्या असुराला दानशूर राजा म्हणूनही मान देतात. काहीजण संकासुराला ग्रामदेवतेचे प्रतीक मानतात. त्यामुळे नमनांच्या खेळांत संकासुरासह त्याचे दोन रक्षक असतात. तो लोककलेच्या रूपाने जिवंत राहिला आहे. शिमग्यात नमनखेळे येतील तेव्हा त्यांच्याबरोबर संकासुरही येईल.

संकासुराची नमन मंडळे त्यांचे अस्तित्व दापोली, दाभोळ, गुहागर, असगोली, हेदवी, पालशेत, पालपेणे, निवोशी, वेळंब; तसेच वरवेलीमधील रांजाणेवाडी व शिंदेवाडी वगैरे गावांमध्ये सांभाळून आहेत. ती लोककला शिमगोत्सवाच्या पंधरा दिवसांत पंचक्रोशीतील वाड्यावाड्यांतून सादर होते. तो आषाढात भातलावणीच्या काळात गुडघाभर चिखलातदेखील अवतरतो. ती शेतकऱ्यांची कष्टाच्या कामांतील करमणूक असते. संकासुर हा पुराणातील राक्षस,तो शिमगोत्सवात मात्र देव होऊन प्रकटतो! तो राधा किंवा गोमू या सोंगांसह नाचतो. तो दशावतारी खेळातही संकासुर म्हणून केव्हाही भेटू शकतो.

संकासुर अंगात निळा किंवा काळा कापडी पूर्ण अंगरखा घालतो, कमरेला सुमारे पंधरा किलो वजनाचा घुंगुरांचा वजनदार पट्टा बांधतो आणि नमन मंडळींसह सादर होतो; तो कलाकार प्रथम ग्रामदेवतेच्या मंदिरात दाखल होतो. मागील वर्षी देवीसमोर उतरवलेला पांढरी दाढी, टोपीवरील गोंड्यांची शोभा व जाड कापडाचा मुखवटा कलाकाराच्या चेहर्‍यावर चढवला जातो. तालवाद्यांच्या आणि टाळांच्या घनगंभीर घुमेदार आवाजात सजून पूर्ण झालेला संकासुर देवीच्या चरणी लीन होतो. नमन मंडळींसह नाचू लागतो. हातातील वेताने भक्तांना हळूच मारतोदेखील.

संकासुराला देव मानले गेले असल्याने त्याची पूजा होते. त्याला नवस बोलला जातो. मागच्या वर्षीचा नवस पूर्ण झाला असेल तर तो फेडलाही जातो. असुराचा देव का झाला? कधी झाला? हे नक्की सांगता येणे कठीण आहे. पण एवढे मात्र सांगता येईल, की निसर्गाच्या सहवासात राहणार्‍या भाबड्या कोकणी शेतकर्‍याने त्याला देवत्व दिले. कालांतराने संकासुर दशावतारात येणारे विनोदी पात्रही बनला.

कोणी म्हणते, की तो विष्णूचा अवतार आहे तर कोणी आणखी काही... कोणी प्रसंगी त्याची चेष्टा करून त्याला भंडावूनही सोडते. संकासुर त्याचा वजनदार पेहराव सावरत अनवाणी पायांनी या खोडसाळांच्या मागे पळत सुटतो, प्रसंगी पडतो, ठेचकाळतो. पण संकासुराचे पात्र करणारा कलाकार त्या भूमिकेत पूर्णतया समरस झालेला असतो… त्याला दुःखाची जाणीवही नसते.

नमनांच्या खेळात संकासुरासह राधा, नकटा, पखवाजवादक, गोमू अशीही पात्रे असतात. होळीचे पंधरा दिवस खेळ करत, संतांच्या रचना म्हणत थकले-भागलेले ते जीव त्यांच्या त्यांच्या गावी शिधा-दक्षिणेसह परत जातात. शेवटचा खेळ पुन्हा ग्रामदेवतेसमोर सादर होतो. संकासुराचा मुखवटा, मोठी पांढरी दाढी सगळे देवीला सादर केले जाते… त्यात त्याच्या अनेक भावभावना गुंतलेल्या असतीलच!

संकासुर मालवणी दशावतारात आधुनिक बाजाच्या गाण्यांवर नृत्य करतानाही दिसू लागला आहे. संकासुराचा प्रवास सुरू आहे… एका होळीपासून पुढील होळीपर्यंत…. आपल्या देवत्वाला लोककलेची झालर चढवून तो नाचतच राहणार आहे.

(मेहेंदळे मोशन पिक्चर्सने ‘संकासुर’ या विषयाला केंद्रस्थानी ठेवून एक माहितीपटही तयार केला आहे.)

- आर्या जोशी 9422059795/ धनंजय मेहेंदळे 9552526361, jaaryaa@gmail.com
 

 

लेखी अभिप्राय

Excellent information came to know

Tepan21/03/2019

छान माहितीपुर्ण व वेगळा लेख

Anjana karnik21/03/2019

छान माहिती दिली आहे .
.

Chandrakant Vochare23/03/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.